चिनी बनावटीचे फटाके घाऊक विक्रेत्यांनी विकू नयेत ! – करवीर शिवसेनेचे फटाके विक्रेत्यांना निवेदन
चिनी विद्युत् माळा, आकाशकंदिल आणि पणत्या दुकानदारांनी विक्रीसाठी ठेवू नयेत !
गांधीनगर (जिल्हा कोल्हापूर), २४ ऑक्टोबर (वार्ता.) – भारतात फोफावलेल्या चिनी वस्तूंच्या व्यापारात गेल्या काही वर्षांपासून चिनी फटाकेही मोठ्या प्रमाणात आले आहेत. त्यामध्ये विषारी पदार्थांचे प्रमाण पुष्कळ असते. त्यामुळे असे फटाके हे आरोग्यासाठी हानीकारक आणि भारतीय अर्थव्यवस्था कमकुवत करणारे असल्याने चिनी बनावटीचे फटाके विक्रेत्यांनी विक्रीसाठी ठेवू नयेत, तसेच देवता-राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले फटाके विक्रीसाठी ठेवू नयेत, या मागणीचे निवेदन गांधीनगर येथील घाऊक फटाके विक्रेत्यांना करवीर शिवसेनेच्या वतीने देण्यात आले. याच समवेत चिनी विद्युत् माळा, चिनी बनावटीचे आकाशकंदिल, पणत्याही दुकानदारांनी विक्रीसाठी ठेवू नयेत. (चिनी बनावटीचे फटाके, तसेच अन्य साहित्य विक्रीसाठी न ठेवण्याचे आवाहन करणारे करवीर शिवसेनेचे श्री. राजू यादव यांचे अभिनंदन ! प्रत्येक दुकानदाराने याची नोंद घेऊन चिनी वस्तूंची विक्री करण्याचे टाळणे अत्यावश्यक आहे ! – संपादक) इतके होऊनही विक्रेत्यांनी चिनी फटाके विक्रीसाठी ठेवल्यास त्यांना ‘शिवसेना पद्धती’ने धडा शिकवला जाईल, अशी चेतावणी करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांनी दिली आहे. या वेळी शिवसेनेचे गांधीनगरप्रमुख श्री. दिलीप सावंत, सर्वश्री वीरेंद्र भोपळे, दीपक पोपटाणी, बाळासाहेब नलवडे, अजित चव्हाण, योगेश लोहार, शिवाजी लोहार, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी यांसह अन्य उपस्थित होते.