५७ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली मिरज येथील चि. अनुश्री संजय जगताप (वय १ वर्ष) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. अनुश्री संजय जगताप एक आहे !
भाद्रपद शुक्ल पक्ष द्वादशी (१८.९.२०२१) या दिवशी मिरज येथील चि. अनुश्री संजय जगताप हिचा प्रथम वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिच्या आईला गर्भारपणात आलेल्या अनुभूती आणि तिच्या आई-वडिलांना अन् मोठ्या भावाला जाणवलेली अनुश्रीची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. गरोदरपण
‘मला गरोदरपणात शारीरिक त्रास होत नव्हता. उलट उत्साह जाणवत होता. त्या कालावधीत मी श्री विष्णुसहस्रनाम, श्री चंडीकवच आणि श्री बगलामुखीस्तोत्र ऐकत होते अन् ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजपही करत होते.
१ अ. पहिला आणि दुसरा मास – सनातनच्या मिरज येथील आश्रमात जाऊन सेवा करणे, तिथे मिळणार्या चैतन्यामुळे सेवा करूनही थकवा न वाटता उत्साह जाणवणे : पहिल्या आणि दुसर्या मासात मी मिरज येथील सनातनच्या आश्रमात जाऊन सेवा करत होते. आश्रमातील चैतन्यामुळे सेवा करतांना मला कुठलाही शारीरिक त्रास होत नव्हता. एके दिवशी मी आश्रमात दिवसभर लाडू बनवण्याची सेवा केली. तेव्हा बराच वेळ स्वयंपाकघरात उभे राहूनही मला काही त्रास झाला नाही. तो संपूर्ण दिवस मला आनंदी आणि उत्साही वाटत होते. अन्य वेळी बाहेरून घरी आल्यानंतर मला पुष्कळ थकवा जाणवतो.
१ आ. तिसरा मास – साधिकेला स्वप्नात दिसलेले दृश्य आणि आलेली अनुभूती
१ आ १. साधिकेला स्वप्नात वाईट शक्ती दिसून त्यांनी ‘आम्ही गर्भाला त्रास द्यायला आलो आहे’, असे म्हणणे, तेव्हा साधिका नामजप करून लागल्यावर तिच्या गर्भातून तेजस्वी पांढरा गोळा बाहेर येऊन त्याने वाईट शक्तींशी युद्ध करणे : तिसरा मास चालू असतांना एकदा मी घरी एकटीच होते आणि दुपारी झोपले होते. त्या वेळी मला स्वप्नात दिसले, ‘काही वाईट शक्ती माझ्यापासून थोड्या अंतरावर उभ्या असून त्या ओरडत आहेत. त्या मला म्हणत होत्या, ‘आम्ही या गर्भाला त्रास द्यायला आलो आहे.’ त्या रागावलेल्या दिसत होत्या आणि त्यांचे तोंडवळे पुष्कळ विचित्र दिसत होते. ‘त्या माझ्या दिशेने काळी शक्ती सोडत आहेत’, असे मला जाणवले. त्यांनी माझे शरीर आणि हात-पाय बांधून ठेवले होते. त्यामुळे मला उठता किंवा बोलता येत नव्हते. मी मोठ्याने नामजप करू लागले, तरी त्यांचे त्रास देणे चालूच होते. ‘त्या क्षणी माझ्या गर्भातून एक तेजस्वी पांढरा गोळा बाहेर आला आणि ‘त्या गोळ्याबरोबर वाईट शक्तींचे सूक्ष्म-युद्ध चालू झाले’, असे मला दिसले.
१ आ २. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या नावांचा जयघोष केल्यावर त्या दोघांचे सूक्ष्मातून अस्तित्व जाणवून वाईट शक्ती पळून जाणे : त्या वेळी मी मोठ्या आवाजात ‘परात्पर गुरु डॉक्टरांचा विजय असो’, ‘प.पू. दादाजींचा (योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांचा) विजय असो’, असा जयघोष केला. तेव्हा ‘परात्पर गुरु डॉक्टर आणि योगतज्ञ प.पू. दादाजी तेथे सूक्ष्मातून आले’, असे मला जाणवले. ‘तेच माझे आणि गर्भाचे रक्षण करत आहेत’, असे मी अनुभवले. त्यांच्या सूक्ष्म अस्तित्वाने आणि त्यांचे नाव उच्चारल्याने वाईट शक्ती तेथून पळून गेल्या.’
१ आ ३. जाग आल्यावर साधिकेला हलकेपणा जाणवणे आणि वाईट शक्तींनी पुष्कळ आक्रमणे करूनही साधिकेला त्रास न होता उत्साही वाटणे : जाग आल्यानंतर मला माझ्या देहात हलकेपणा जाणवला. स्वप्नात वाईट शक्तींनी माझ्या देहावर पुष्कळ आक्रमणे केली होती, तरी मला काहीच त्रास झाला नाही. उलट मला ताजेतवाने आणि उत्साही वाटत होते. तेव्हा मला परात्पर गुरु डॉक्टरांप्रती कृतज्ञता वाटली. देवानेच आमचे रक्षण केले आणि त्याच्या अस्तित्वाची मला अनुभूती घेता आली.
१ इ. सहावा मास – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांचा सत्संग चालू असतांना गर्भाने पुष्कळ हालचाल करून प्रतिसाद देणे : मला सहावा मास चालू असतांना मी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये घेत असलेला एक सत्संग ऐकत होते. सत्संगात सद्गुरु स्वातीताईंचे मार्गदर्शन चालू झाले. त्या क्षणी पोटातील बाळाची वेगाने हालचाल चालू झाली. तेव्हा मला आतून आनंद होत होता. ‘गर्भालाही सद्गुरु स्वातीताईंच्या वाणीतील चैतन्य मिळाले’, असे मला जाणवले. त्यांचे बोलणे थांबल्यावर बाळाची हालचाल बंद झाली. अशी अनुभूती मी २ – ३ वेळा घेतली.
१ ई. सातवा आणि आठवा मास – साधिकेच्या मोठ्या मुलाने (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) पोटावर हात ठेवून नामजप केल्यावर गर्भाने आतून पुष्कळ हालचाल करून प्रतिसाद देणे : सातव्या आणि आठव्या मासांत माझा मोठा मुलगा कु. अवधूत (वय ८ वर्षे आणि आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) माझ्या पोटावर हात ठेवून नामजप अन् प्रार्थना करायचा. त्या वेळी गर्भाची हालचाल जलद गतीने व्हायची. ज्या ज्या वेळी अवधूत माझ्या पोटावर हात ठेवून नामजप करायचा, त्या वेळी गर्भ आतून प्रतिसाद द्यायचा. ‘जणू गर्भाला अवधूतचे बोलणे कळते’, असे वाटायचे.
१ उ. नववा मास – अकस्मात् साधिकेची प्रकृती बिघडणे आणि नामजपादी उपाय केल्यावर तिचा त्रास न्यून होणे : प्रसुतीची वेळ जवळ येऊ लागली आणि शेवटच्या ८ – १० दिवसांत माझी प्रकृती अकस्मात् बिघडली. त्या वेळी मी ५ घंटे नामजपादी उपाय नियमित केल्याने माझा बराचसा त्रास न्यून झाला आणि मला उत्साह जाणवू लागला. त्यामुळे ठरलेल्या दिवशी प्रसुती करण्याचे आधुनिक वैद्यांनी निश्चित केले.
२. प्रसुती
प्रसुतीसाठी शस्त्रकर्म कक्षात जाण्यापूर्वी माझा श्री दुर्गादेवीचा नामजप चालू झाला. त्यामुळे मला कसलीही भीती वाटत नव्हती. मला पुष्कळ उत्साह जाणवत होता. ३०.८.२०२० या दिवशी माझी प्रसुती होऊन मला मुलगी झाली.’
– सौ. वेदिका संजय जगताप (चि. अनुश्रीची आई), मिरज, जि. सांगली.
३. जन्मानंतर
३ अ. जन्म ते ४ मास
३ अ १. बालिकेला हातात घेतल्यावर मन निर्विचार होणे : ‘परिचारिकेने बालिकेला माझ्या हातात आणून दिले. तेव्हा मला पुष्कळ शांत वाटत होते. माझे मन पूर्णपणे निर्विचार झाले होते. मला तिचा तोंडवळा पुष्कळ तेजस्वी दिसत होता. ती हसत असतांना मला ‘तिच्याकडे बघतच रहावे’, असे वाटत होते.’ – श्री. संजय जगताप (चि. अनुश्रीचे वडील), मिरज
३ अ २. बालिकेने हाताच्या बोटांच्या मुद्रा करणे : ‘बालिकेचा जन्म झाला, त्या दिवशी तिने नमस्काराची मुद्रा केली होती. ती झोपेत आणि जागी असतांना हाताच्या बोटांच्या वेगवेगळ्या मुद्रा करायची.
३ अ ३. आम्ही बालिकेचे नाव ‘अनुश्री’ असे ठेवले. तिला पाळण्यात ठेवल्यावर ती तेजस्वी दिसत होती आणि तिच्या तोंडवळ्यावर चैतन्य जाणवत होते.
३ अ ४. ‘अनुश्री आणि अवधूत यांच्यात आध्यात्मिक नाते आहे’, असे जाणवणे : अनुश्री अवधूतकडे पाहून हसायची आणि त्याच्या बोलण्याला प्रतिसादही द्यायची. त्या दोघांमध्ये ‘आध्यात्मिक ऋणानुबंध आहे’, असे मला बर्याच प्रसंगांतून जाणवते.
३ आ. वय – ५ ते १० मास
३ आ १. चि. अनुश्रीला देवता आणि संत यांच्या प्रती असलेली ओढ
अ. चि. अनुश्री सनातन पंचांगमध्ये असलेली देवतांची चित्रे आणि संतांची छायाचित्रे पाहून त्यांच्याकडे झेप घेते. ती देवतांची चित्रे आणि संतांची छायाचित्रे यांवर डोके टेकून नमस्कार करतांना पुष्कळ हसते.
आ. ती परात्पर गुरु डॉक्टर आणि योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या छायाचित्रांवरून हात फिरवते. तेव्हा ती पुष्कळ आनंदी असते आणि तिच्या तोंडवळ्यावर निरागस हास्य असते. तेव्हा तिचा तोंडवळा तेजस्वी दिसतो.’
– सौ. वेदिका संजय जगताप
इ. ‘अनुश्रीला देवतांची चित्रे पुष्कळ आवडतात. ती रडत असतांना तिला देवतांची चित्रे दाखवली की, ती शांत होते.’ – श्री. संजय जगताप
३ आ २. ‘चि. अनुश्रीचे हास्य निखळ आहे. तिच्या तोंडवळ्यावर पुष्कळ निरागसपणा जाणवतो.
३ आ ३. अनुश्री ५ मासांची असतांना तिच्या तोंडवळ्यावर दैवी कण दिसायचे.’
– कु. अवधूत संजय जगताप (चि. अनुश्रीचा मोठा भाऊ, वय ८ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), मिरज (५.९.२०२१)
३ इ. वय – १० मास ते १ वर्ष
१. ‘मी नामजप केल्यावर अनुश्री पुष्कळ हसते. मी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप मोठ्या आवाजात केल्यावर ती हुंकार देते. तेव्हा ती पुष्कळ आनंदी असते.’ – सौ. वेदिका संजय जगताप
२. ‘अनुश्रीकडे पाहिल्यावर ती आपल्याकडे बघून हसते. तेव्हा मनाला पुष्कळ प्रसन्न वाटते.’ – श्री. संजय जगताप
३. ‘आम्ही दोघे पुष्कळ छान खेळतो. तिच्याशी खेळतांना मला पुष्कळ आनंद मिळतो.
४. एकदा मी तिला परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र दाखवले. तेव्हा तिने त्याकडे धाव घेतली. तिने त्यांच्या तोंडवळ्यावरून हात फिरवला. ती त्यांच्या छायाचित्राकडे पाहून हुंकार देत होती.’
– कु. अवधूत संजय जगताप
४. स्वभावदोष
‘राग येणे – ‘अनुश्रीच्या हातातील एखादी वस्तू काढून घेतल्यास तिला राग येतो.’
– सौ. वेदिका संजय जगताप (चि. अनुश्रीची आई), मिरज,जि. सांगली. (५.९.२०२१)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |