समाजाने धर्माचरण केल्यास आजही महिलांना रामराज्याप्रमाणे निर्भयता अनुभवता येईल ! – नरेंद्र सुर्वे
आज आपल्या निधर्मी देशात राममंदिर जरी उभारले जात असले, तरी देशात मंदिरातील मूर्तींची तोडफोड, हिंदू युवतींची गोळ्या घालून हत्या, लव्ह जिहाद, आतंकवाद, युवकांची व्यसनाधीनता, गोहत्या, कोरोना महामारीत रुग्णांची लुटमार चालूच आहे. गेल्या ७४ वर्षांत जनतेला धर्माचरण न शिकवल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. याउलट रामराज्यात कुणीही व्यक्ती दु:खी, पीडित नव्हता. सर्वजण सुखी होते; कारण सर्वजण धर्माचरणी, परोपकारी आणि मर्यादांचे पालन करणारे होते. त्यामुळे त्यांना भगवान श्रीरामासारखा आदर्श राजा मिळाला. रामराज्यातील प्रजा धर्माचरणी होती. त्यामुळे रात्री १२ वाजताही महिला अलंकार परिधान करून एकट्या वावरू शकत होत्या. आज पाश्चात्त्यांचे अंधानुकरण केले जात आहे. महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. दुपारी १२ वाजताही महिलांना घराबाहेर पडणे असुरक्षित वाटते. आपल्यालाही श्रीरामासारखा आदर्श राजा हवा असेल, तर आपल्यालाही धर्माचरण आणि साधना करायला हवी. तसे झाले तर केवळ श्रीराम मंदिराच्या उभारणीचे नव्हे, तर संपूर्ण पृथ्वीवर ‘रामराज्य’ आणि रामराज्याप्रमाणे निर्भयता अनुभवता येईल.