भाजपकडून मुंबईमध्ये ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या प्रतिमेला ‘जोडे मारा’ आंदोलन !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक ‘ट्वीट’ केल्याचे प्रकरण
मुंबई – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक ‘ट्वीट’ करणारे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या प्रतिमेला भाजपच्या वतीने २२ ऑक्टोबर या दिवशी ‘जोडे मारा’ आंदोलन करण्यात आले. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांच्या कांदिवली येथील कार्यालयाच्या बाहेर हे आंदोलन करण्यात आले.
या वेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी नितीन राऊत यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. राऊत यांनी २१ ऑक्टोबर या दिवशी हे आक्षेपार्ह ‘ट्वीट’ केले होते; मात्र राष्ट्रप्रेमी नागरिकांकडून विरोध झाल्यावर राऊत यांनी ‘ट्वीट’ ‘डिलीट’ (काढून टाकले) केले.
नितीन राऊत यांच्या विरोधात गुन्हा नोंद करावा ! – आमदार अतुल भातखळकर, भाजप
महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून असे प्रकार वाढत आहेत. हिंदुत्वनिष्ठांच्या श्रद्धास्थानांना लक्ष्य करण्याचे प्रकार वारंवार होत आहेत. या प्रकरणी राऊत यांनी तात्काळ क्षमा न मागितल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवावा.