पुण्यातील ‘समृद्ध जीवन’चे महेश मोतेवार यांच्या ५ आलिशान गाड्या जप्त !
पुणे – येथील ‘समृद्ध जीवन’ आर्थिक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी महेश मोतेवार यांच्या ५ आलिशान गाड्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केल्या आहेत. जप्त केलेल्या गाड्यांमध्ये मायक्रा, स्वीफ्ट डिझायर, मिनी कूपर, पजेरो या वाहनांचा समावेश आहे. मोतेवार यांच्या विरोधात २२ राज्यांत २८ गुन्हे नोंद आहेत.
शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन आणि अन्य व्यवसाय यांची जोड देत त्यातून मोठा आर्थिक लाभ मिळवून देण्याचे आमीष दाखवत मोतेवार आणि त्यांचे साथीदार यांनी महाराष्ट्रासह देशभरातील अनेक शेतकरी, तसेच गुंतवणूकदार यांची फसवणूक केली आहे. त्यांनी गुंतवणूकदारांकडून ५ सहस्र २११ कोटी ६९ लाख रुपयांच्या ठेवी जमा केल्या असून त्यातील ४ सहस्र ७२५ कोटी ६४ लाख रुपयांचा अपहार करण्यात आला आहे.