महाराष्ट्र सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक अमली पदार्थ माफियांचे ‘ब्रँड अॅम्बेसिडर’ आहेत का ? – आमदार नितेश राणे, भाजप
कणकवली – महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक हे पाकिस्तानचे दलाल (एजंट) झाले आहेत. पाकिस्तानसाठी ते काम करत आहेत. पाकिस्तानमधून येणारे अमली पदार्थ मुंबईसह महाराष्ट्रात पुरवणारे जे अमली पदार्थ माफिया आहेत, त्यांचे ते ‘ब्रँड अॅम्बेसिडर’ आहेत का ? असा प्रश्न भाजपचे आमदार नितेश राणे यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
शहरातील ‘प्रहार भवन’ येथे आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत, भाजप कृषी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष उमेश सावंत, कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री आदी उपस्थित होते. आमदार राणे पुढे म्हणाले,
‘‘१. ‘ए.सी.बी.’ने मंत्री मलिक यांच्या जावयाला अशाच एका प्रकरणात अटक केली होती. त्यामुळे ते या खात्याची आणि अधिकार्यांची अपकीर्ती करत आहेत.
२. असे असले, तरी स्वत:ला मराठी माणसांची संघटना म्हणवून घेणार्या शिवसेनेला याची लाज वाटली पाहिजे. अमली पदार्थविरोधी पथकाचे अधिकारी वानखेडे कोण आहेत ? ते मराठी नाहीत का ? त्यांची पत्नी क्रांती रेडकर मराठी नाही का ?
३. तुमचा मंत्री मलिक मराठी माणसाला प्रतिदिन धमकी देतो, तरीही तुम्ही काहीच बोलणार नाही ? शिवसेनेची मराठी अस्मिता कुठे गेली ?
४. आज राज्यात अमली पदार्थ माफिया शांत झोपत आहेत; कारण नवाब मलिक त्यांची पाठराखण करत आहेत. राज्याची भावी पिढी नष्ट करण्यात मंत्री मलिक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
५. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी हिंमत असेल, तर मराठी अस्मिता, हिंदुत्व आदी मंत्री मलिक यांना शिकवावे.
६. मराठी माणसाला लक्ष्य केले जात असल्याचे उत्तम उदाहरण म्हणजे अधिकारी वानखेडे होय. अशा वेळी पक्ष, नेते, मुख्यमंत्री मराठी असतांना एकही शिवसैनिक प्रश्न विचारत नसेल, तर ही शिवसेना कसली ?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वनिष्ठ विचारांशी अप्रामाणिक असणारे सरकार ! – राणेया वेळी आमदार राणे म्हणाले, ‘‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वनिष्ठ विचारांशी अप्रामाणिक असणारे, मराठी माणसाकडे दुर्लक्ष करून अमली पदार्थ माफियांची पाठराखण करणारे, राज्यासह कोकणातील शेतकर्यांची फसवणूक करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार सत्तेत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार हे नाव पालटून ‘अप्रामाणिक सरकार’, असे नाव ठेवण्याची वेळ आली आहे. शेतकरी, मासेमार, कष्टकरी यांना अद्याप एक रुपयाही हानीभरपाई मिळालेली नाही. त्यामुळे त्यांच्यावर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी शेतकर्यांना २५ सहस्र रुपये हानीभरपाई देण्याची घोषणा केली होती, त्याचे काय झाले ? कोकणातील शेतकरी पुन्हा उभा कसा रहाणार ? |