गोवा ‘विकासाचा आदर्श नमुना (मॉडेल)’ म्हणून ओळखला जाणार ! नरेंद्र मोदी, पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ऑनलाईन’ पद्धतीने गोमंतकियांशी साधला संवाद
पणजी, २३ ऑक्टोबर (वार्ता.) यापूर्वी गोव्याची ओळख म्हणजे निसर्ग, पर्यटन आणि आनंद लुटण्याचे एक ठिकाण अशीच होती; परंतु यापुढे गोवा ‘विकासाचा आदर्श नमुना (मॉडेल)’ म्हणून ओळखला जाणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ ऑक्टोबर या दिवशी ‘स्वयंपूर्ण गोवा’ अभियानाची माहिती घेण्यासाठी गोमंतकियांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, ‘‘आत्मनिर्भर भारत’ योजनेच्या अंतर्गत गोवा राज्याने केंद्राच्या विविध योजनांचा लाभ घेतला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली गोव्याची वाटचाल विकासाकडे होत आहे. गोवा राज्याचा विकास राज्यशासन आणि केंद्रशासन म्हणजे ‘डबल इंजिन’च्या माध्यमातून होत आहे. गोवा राज्याचा विकास हा एक ‘विकास मॉडेल’ आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणात गोवा राज्य अग्रेसर असणे, ही एक कौतुकास्पद गोष्ट आहे. यामुळे जगभरातील पर्यटकांना गोव्यात पर्यटनाला येण्यासाठी सुरक्षित वाटेल आणि दिवाळीनंतर गोव्यातील पर्यटन बहरेल.’’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘व्हर्च्युअल’ (ऑनलाईनची एक पद्धत) पद्धतीने अवर सचिव इशा सावंत, बेताळभाटीचे सरपंच कॉन्स्तांसियो मिरांडा, फुटबॉलपटू कुंदन फळारी, मासेमार व्यावसायिक लुईस कार्दोज, एक गाडा (फिरते दुकान) व्यावसायिक, पेरा टेबल टेनिसपटू रूबी अहमद, डेअरी व्यावसायिक दुर्गेश शिरोडकर आणि स्वयंसेवी गटाच्या सदस्या निशिता गावस यांच्याशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकारी, सरपंच आणि लाभार्थी यांच्याशी संवाद साधतांना प्रत्येकाला निरनिराळे प्रश्न विचारले, तसेच प्रत्येक लाभार्थीला ‘सरकारी योजनांचा लाभ घेतांना अडचणी आल्या का ?’ आणि ‘त्यासाठी कुणी पैसे वगैरे मागितले का ?’ हे दोन समान प्रश्न विचारण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सरकारचे सहकार्य मिळाले का ?’ असा प्रश्नही लाभार्थ्यांना विचारला असता सर्वांनी याला सकारात्मक उत्तर दिले.