६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) प्रमिला रामदास केसरकर (वय ६६ वर्षे) यांचे अद्वितीयत्व सिद्ध करणारे त्यांच्या पार्थिवाच्या संदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले आध्यात्मिक संशोधन !
‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. प्रमिला रामदास केसरकर (वय ६६ वर्षे) मागील ६ वर्षे कर्करोगाने रुग्णाईत होत्या. गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांचा हा रोग बळावत गेला; पण त्याच वेळी त्यांची आंतरिक साधनाही तितक्याच तीव्रतेने वाढत गेली. त्यांच्या खोलीत गेल्यावर ‘प्रसन्न वाटणे, त्यांचा तोंडवळा आनंदी दिसणे’, या स्थुलातील लक्षणांमधून त्यांचा आध्यात्मिक स्तर वाढल्याचे प्रकर्षाने लक्षात येत होते. १८.१०.२०२१ या दिवशी रात्री १०.३० वाजता त्यांचे निधन झाले. त्यानंतर दुसर्या दिवशी सकाळी ९ वाजताही ‘त्यांच्या पार्थिवाचा श्वासोच्छ्वास चालू आहे’, असे जाणवत होते. त्यांच्या खोलीत प्रसन्नता जाणवत होती. त्यांचे आध्यात्मिक स्तरावरील वेगळेपण लक्षात आल्यामुळे संशोधक वृत्तीचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांच्या पार्थिवाचे आध्यात्मिक स्तरावरील संशोधन केले.
|
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी कै. (सौ.) केसरकरकाकूंच्या पार्थिवावर केलेले विविध प्रयोग, त्या वेळी जाणवलेली सूत्रे आणि त्यांनी त्यामागील सांगितलेले शास्त्र
परात्पर गुरु डॉ. आठवले कै. (सौ.) केसरकरकाकूंच्या खोलीत आल्यावर त्यांना काकूंचे आध्यात्मिक स्तरावरील वेगळेपण लक्षात आले. तेव्हा त्यांनी विविध प्रयोग केले.
१ अ. कै. (सौ.) केसरकरकाकूंच्या टाळूला (डोक्याच्या वरील भागाला) हात लावणे
प्रथम त्यांनी काकूंच्या टाळूला (डोक्याच्या वरील भागाला) हात लावून तेथे जाणवणार्या स्पंदनांचा अभ्यास केला. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांना स्वतःचा भाव जागृत होत असल्याचे जाणवले; म्हणून त्यांनी कै. (सौ.) केसरकर यांचे पती अधिवक्ता रामदास केसरकर (वय ६८ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) आणि साधक श्री. भानु पुराणिक (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) यांनाही तो प्रयोग करायला सांगितला. तो प्रयोग केल्यावर अधिवक्ता केसरकर यांना स्वतःच्या छातीत चांगल्या संवेदना जाणवल्या आणि श्री. भानु पुराणिक यांना ध्यान लागल्यासारखे जाणवले. या प्रयोगातून काकूंचे अद्वितीयत्व लक्षात आल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांनी आणखी खोलात जाऊन विविध प्रयोग केले. हे प्रयोग करत असतांना परात्पर गुरु डॉक्टरांचे अधिवक्ता केसरकर आणि श्री. भानु पुराणिक यांच्याशी पुढीलप्रमाणे संभाषण झाले.
१ आ. कै. (सौ.) केसरकर यांचा टाळू, नंतर दोन्ही हात आणि त्यानंतर तळपाय यांना स्पर्श करणे
परात्पर गुरु डॉ. आठवले : जिवंतपणी एखाद्या व्यक्तीमुळे दुसर्याचा भाव जागृत होणे कठीण असते; पण काकूंच्या पार्थिवाकडे पाहूनही भाव जागृत होत आहे. यांचे संपूर्ण शरीरच भावाने (भावाच्या स्पंदनांनी) भरले आहे. त्यांच्या तळपायांना स्पर्श केल्यावर सर्वाधिक भावजागृती होत आहे.
(अधिवक्ता रामदास केसरकर आणि श्री. भानु पुराणिक यांना उद्देशून) तुम्ही ‘काकूंचे डोके, हात आणि तळपाय यांना स्पर्श करून कोणत्या अवयवाला स्पर्श केल्यावर अधिक भाव जागृत होतो ?’, ते बघा अन् तुलना करा.
अधिवक्ता रामदास केसरकर (प्रथम काकूंचा टाळू आणि नंतर दोन्ही हात यांना स्पर्श केल्यावर) : ‘त्या जिवंत आहेत. त्यांचा श्वास चालू आहे’, असे जाणवते.
परात्पर गुरु डॉ. आठवले (अधिवक्ता रामदास केसरकर यांनी काकूंच्या तळपायांना स्पर्श केल्यावर) : तळपायांना स्पर्श केल्यावर सर्वांत जास्त भावजागृती होते ना ?
अधिवक्ता रामदास केसरकर : हो.
परात्पर गुरु डॉ. आठवले : त्यांच्या चरणांवर डोके ठेवल्यावर कुणाचीही शुद्धी होऊ शकते.
परात्पर गुरु डॉ. आठवले (अधिवक्ता केसरकर यांना उद्देशून) : यांची आध्यात्मिक पातळी किती होती ?
अधिवक्ता रामदास केसरकर : ६६ टक्के !
परात्पर गुरु डॉ. आठवले : म्हणजे त्या संतत्वाच्या जवळ आल्या होत्या !
श्री. भानु पुराणिक : तळपायांना स्पर्श केल्यावर सर्वांत अधिक भावजागृती होते.
१ इ. कै. (सौ.) केसरकर यांच्या पायांच्या बाजूला उभे राहून त्यांच्या डोक्यापासून पायांपर्यंत दृष्टी फिरवणे
परात्पर गुरु डॉ. आठवले (अधिवक्ता रामदास केसरकर आणि श्री. भानु पुराणिक यांना उद्देशून) : त्यांच्या पायांजवळ उभे राहून त्यांच्या डोक्यापासून पायांपर्यंत दृष्टी फिरवा आणि ‘काय जाणवते ?’, ते पहा.
अधिवक्ता रामदास केसरकर : त्यांच्या डोक्यापासून पायांपर्यंत चैतन्य जाणवते. पायांकडे अधिक चैतन्य जाणवते आणि ‘त्या जिवंत आहेत’, असे जाणवते.
परात्पर गुरु डॉ. आठवले : हो. पायांकडेच अधिक चैतन्य जाणवते. आता ‘चरणांना नमस्कार का करतात ?’, ते समजले ना ? भानु, तूसुद्धा पहा.
श्री. भानु पुराणिक : पायांकडे दृष्टी गेली की, पुष्कळ भावजागृती होऊन अंगावर शहारे येतात.
परात्पर गुरु डॉ. आठवले : हो. पुनःपुन्हा हेच सिद्ध होते. संतांची समाधी असली की, आपण त्यांच्या चरणांकडील भागावर डोके ठेवतो. त्याचे कारण आता लक्षात आले.
१ ई. कै. (सौ.) केसरकर यांच्या डोळ्यांकडे पहाणे
परात्पर गुरु डॉ. आठवले : त्यांचा उजवा डोळा उघडा आहे आणि डावा डोळा कमी उघडा आहे. त्यांच्या डोळ्यांकडे फार वेळ पहाता येत नाही, लगेच भावजागृती होते. तुम्हीही बघा.
अधिवक्ता रामदास केसरकर आणि श्री. भानु पुराणिक (काकूंच्या डोळ्यांकडे बघून) : आमचा भाव जागृत झाला.
१ उ. कै. (सौ.) केसरकर यांच्या पार्थिवाला प्रदक्षिणा घालणे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काकूंच्या पार्थिवाला एक प्रदक्षिणा घातली.
परात्पर गुरु डॉ. आठवले : ‘पार्थिवाला प्रदक्षिणा घालतांना डोके आणि पाय यांच्या बाजूला काय जाणवते ?’, ते पहा.
अधिवक्ता रामदास केसरकर (प्रदक्षिणा घालून झाल्यावर) : मंदिरात देवतेच्या मूर्तीला प्रदक्षिणा घालतांना भावजागृती होते. तसे जाणवले.
परात्पर गुरु डॉ. आठवले : डोक्याकडे गेल्यावर कसे जाणवले आणि पायांकडे गेल्यावर कसे जाणवले ?
अधिवक्ता रामदास केसरकर : डोक्याकडे गेल्यावर अल्प आणि पायांकडे आल्यावर अधिक भावजागृती झाली.
श्री. भानु पुराणिक : प्रदक्षिणा घालतांना काकूंच्या डोक्याकडे जातांना सहस्रारचक्रावर संवेदना जाणवतात, तर त्यांच्या पायांकडे येतांना अनाहतचक्रावर संवेदना जाणवतात.
१ ऊ. कै. (सौ.) केसरकर यांच्या डोक्यापासून पायांपर्यंत आणि पायांपासून डोक्यापर्यंत दृष्टी फिरवणे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काकूंच्या डोक्यापासून पायांपर्यंत आणि पायांपासून डोक्यापर्यंत दृष्टी फिरवली.
परात्पर गुरु डॉ. आठवले : त्यांचा प्राण सहस्रारचक्रातून बाहेर पडला; पण त्यांच्या पायांतून थोडे चैतन्य येत आहे. तुम्ही डोक्यापासून पायांपर्यंत आणि पायांपासून डोक्यापर्यंत दृष्टी फिरवा अन् ‘कुठे काय जाणवते ?’, ते पहा.
अधिवक्ता रामदास केसरकर : ‘चरणांकडून डोक्याकडे चैतन्य येत आहे’, असे जाणवले. पूर्वी बघतांना उलट जाणवले होते.
परात्पर गुरु डॉ. आठवले : हं. काकूंचा प्राण सहस्रारचक्रातून बाहेर पडून उच्च लोकात गेला. त्यांचे अंत्यदर्शन घ्यायला येणारे त्यांच्या पायांच्या बाजूला उभे राहूनच दर्शन घेतील. त्यांच्यासाठी पायांमधून चैतन्य प्रक्षेपित होत आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले : हं. यावरूनच ‘संतांची समाधी का बांधतात ?’, ते कळते. आपण संतांच्या समाधीवर त्यांच्या चरणांच्या ठिकाणी डोके ठेवतो; कारण त्यांच्या चरणांतून सतत चैतन्य प्रक्षेपित होत रहाते आणि ते सर्वांना मिळते. काकूंनी कमाल केली !
१ ए. कै. (सौ.) केसरकर यांच्या विविध अवयवांच्या हालचाली दिसणे
१ ए १. तोंडवळा – परात्पर गुरु डॉ. आठवले (काकूंच्या तोंडवळ्याकडे पहात) : त्यांच्या हनुवटीचा भाग हालतांना दिसतोय का ?
अधिवक्ता रामदास केसरकर आणि श्री. भानु पुराणिक : हो.
अधिवक्ता रामदास केसरकर : त्या जिवंत वाटतात. ‘अगदी झोपल्या आहेत’, असे जाणवते; पण ‘तोंडवळ्यावर हालचाल चालू आहे’, असे जाणवते.
परात्पर गुरु डॉ. आठवले : हो.
परात्पर गुरु डॉ. आठवले (काकूंच्या डोक्यावर हात धरून) : काकूंच्या डोक्याजवळ लहरी जाणवतात. ओठ आणि दात यांवरूनही त्यांची हालचाल लक्षात येते. त्यांच्या डोळ्यांची हालचाल अधिक जाणवते.
१ ए २. मान
परात्पर गुरु डॉ. आठवले (काकूंच्या छातीवर हात धरून) : त्यांची मानही हालतांना जाणवते.
१ ए ३. छाती आणि हात परात्पर गुरु डॉ. आठवले (काकूंच्या डोक्यावर हात धरून) : ‘त्यांचा श्वासोच्छ्वास वेगाने चालू आहे. त्यांचे हात हालत आहे’, असे जाणवते.
१ ए ४. पोट
परात्पर गुरु डॉ. आठवले (स्वतःच्या हाताची बोटे काकूंच्या छातीच्या दिशेने धरून) : ‘पोटाचा भाग वर-खाली होत आहे’, असे जाणवते. पुन्हा एकदा पहा. पोट हलतंय का बघा !
अधिवक्ता रामदास केसरकर आणि श्री. भानु पुराणिक : ‘काकूंच्या मानेची हालचाल होत आहे’, असे जाणवते. ‘पोटाचा भाग अधिक हलत आहे’, असे जाणवते.
२. कै. (सौ.) केसरकर यांचा तुळशीप्रती भाव !
अधिवक्ता रामदास केसरकर यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना खोलीतील तुळशीचे रोप दाखवले.
अधिवक्ता रामदास केसरकर : काकू या तुळशीला प्रतिदिन पाणी घालायच्या. काकूंना तुळशीविषयी फार जवळीक वाटायची. त्यांचा तिच्याविषयी फार भाव होता. त्या अगदी लहान बाळासारखी तुळशीची काळजी घ्यायच्या.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्या तुळशीला भावपूर्ण नमस्कार केला.
३. कै. (सौ.) केसरकर यांनी जन्माचे सार्थक केले असून त्या लवकरच संत होणार असल्याचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगणे
परात्पर गुरु डॉ. आठवले (काकूंच्या पार्थिवाला नमस्कार करून) : काकू, येतो आता ! (थोड्या वेळाने) अरे बापरे ! मी बोलायच्या आधीचे यांचे डोळे आणि बोलल्यानंतरचे डोळे यांत फरक आहे. मी बोलल्यानंतर यांच्या डोळ्यांत अधिक भाव जाणवतो.
परात्पर गुरु डॉ. आठवले (अधिवक्ता रामदास केसरकर यांना उद्देशून) : त्यांची पुढील साधना चालूच रहाणार आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले (काकूंच्या पार्थिवाला नमस्कार करून) : काकू, तुम्ही जन्माचे सार्थक केलेत ! आता असेच सर्वांवर लक्ष ठेवा आणि सर्वांना साधनेत साहाय्य करा. तुमची व्यष्टी साधना पूर्ण झाली. आता तुम्ही समष्टी साधना करायची आहे. येऊ ? येतो, नमस्कार !’
कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांची लक्षात आलेली अद्वितीय वैशिष्ट्ये
१. स्थूलदेहाच्या संदर्भात
अ. ‘सर्वसाधारणतः व्यक्ती मृत झाल्यानंतर लगेच तिचे हात-पाय कडक होतात. ते हालवणे शक्य नसते. कै. (सौ.) केसरकरकाकू यांचे निधन होऊन १० घंटे झाले, तरी त्यांचे हात-पाय सहजतेने हालवता येत होते.
आ. त्यांची त्वचा काही ठिकाणी पिवळी झाली होती.
इ. ‘त्यांचे ओठ आणि डोळे थोडे हालत आहेत, तसेच त्यांचा श्वासोच्छ्वास चालू आहे’, असे जाणवत होते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांचा हात काकूंच्या अनाहतचक्राच्या ठिकाणी, तसेच पायांकडे नेल्यावर ही हालचाल अधिक प्रमाणात होत असल्याचे जाणवले.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या बोलण्याला प्रतिसाद देत असल्याचे जाणवणे
अ. काकूंचे डोळे थोडे उघडे होते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘डोळे बंद करा’, असे काकूंना सांगितले. थोड्या वेळाने काकूंचे डोळे अधिक प्रमाणात बंद झाल्याचे लक्षात आले. या प्रतिसादावरून ‘काकूंना बोलणे कळत आहे’, असे लक्षात आले.
आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काकूंच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन निघतांना ‘काकू, येतो आता !’, असे म्हटल्यावर काकूंच्या डोळ्यांमध्ये पूर्वीच्या तुलनेत अधिक भाव जाणवू लागला.
३. काकूंच्या खोलीत एका कुंडीत तुळस लावलेली आहे. त्या तुळशीकडे पाहूनही भावजागृती होते.’
– अधिवक्ता रामदास केसरकर, सनातन संस्थेचे कायदेविषयक मानद सल्लागार (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.१०.२०२१)
‘कोणताही विचार स्वतःचा नसतो, तर तो देवच देत असतो’, याचे एक उदाहरण म्हणजे (परात्पर गुरु) डॉ. आठवले आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ या दोघांनीही कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांनी देहत्याग केल्यानंतर त्यांच्या देहाचे सूक्ष्म परीक्षण करणे !‘कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांनी देहत्याग केल्यानंतर मी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी गेलो. त्या वेळी मला त्यांच्या देहातून प्रक्षेपित होणार्या चैतन्याची जाणीव झाली आणि ‘त्यांच्या शरिरातून कोणत्या भागातून कशाची स्पंदने अधिक प्रमाणात बाहेर पडतात ?’, याचे विविध प्रयोग करून मी अभ्यास केला. त्यानंतर आदल्या रात्री सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनीही अशाच प्रकारे अभ्यास केला असल्याचे कळले, म्हणजे ‘कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांच्या देहातून प्रक्षेपित होणार्या चैतन्याचा अभ्यास करावा’, हा देवाचा विचार होता. मी आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ दोघांनीही तो ग्रहण करून कृतीत आणला होता.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१९.१०.२०२१) |
सौ. प्रमिला केसरकर यांचे देहावसान झाल्यानंतर त्यांच्या दर्शनाच्या वेळी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना आलेल्या अनुभूती
‘१८.१०.२०२१ या दिवशी रात्री साडेदहा वाजता सौ. प्रमिला केसरकर (वय ६६ वर्षे) यांचे आश्रमात देहावसान झाल्याचे कळले. मी त्यांचे दर्शन घ्यायला गेलो. त्यांना पाहिल्यावर मला पुढील अनुभूती आल्या.
१. सौ. केसरकरकाकूंमधील चैतन्याचा झालेला परिणाम
अ. त्यांचे मुख चैतन्यामुळे पिवळसर झाले होते, तसेच त्यांच्या हातांचे तळवेही पिवळसर दिसत होते.
आ. त्यांच्या हातांच्या नखांना चकाकी होती, तसेच त्यांची नखे गुलाबी दिसत होती.
इ. १४.१०.२०२१ या दिवशी त्यांचे पती अधिवक्ता रामदास केसरकरकाकांनी एका साधिकेला सांगितले, ‘केसरकरकाकूंनी अन्न आणि पाणी दोन्ही घ्यायचे बंद केले आहे.’ ते ऐकून ‘काकूंचा मृत्यू जवळ आला आहे’, असे मला वाटले. त्यामुळे मी ‘त्यांचा प्राण कुठपर्यंत आला आहे ?’, हे पाहिले, तर मला तो त्यांच्या कंठापर्यंत आला असल्याचे जाणवले. एखाद्या व्यक्तीचा प्राण कंठापर्यंत आला असल्यास ती व्यक्ती आणखी केवळ ४ – ५ घंटेच जगते, असा माझा अनुभव आहे; पण केसरकरकाकूंचा मृत्यू त्यानंतर ४ दिवसांनी झाला. यावरून ‘एवढे दिवस त्या चैतन्यावरच जगल्या’, असे माझ्या लक्षात आले.
ई. केसरकरकाकांना वरील सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘काकूंनी खरेतर ७.१०.२०२१ या दिवसापासूनच अन्न-पाणी घ्यायचे पुष्कळ अल्प केले होते. त्या दिवसभरात केवळ २-३ चमचेच अन्न घेत होत्या.’’ यावरूनही लक्षात आले, ‘काकू गेले १० दिवस एवढ्या अत्यल्प अन्नावर केवळ त्यांच्यातील चैतन्यामुळेच जगू शकल्या.’
२. देहाकडून अधिक प्रमाणात भावाची स्पंदने प्रक्षेपित होणे
अ. केसरकरकाकूंकडून वातावरणात भावाची स्पंदने प्रक्षेपित होत असल्याचे मला जाणवले.
आ. मी त्यांच्या देहावरून डोक्यापासून चरणांपर्यंत हात फिरवला, तेव्हा मला त्यांच्या चरणांतून स्पंदने अधिक प्रमाणात प्रक्षेपित होत असल्याचे जाणवले.
इ. त्यांच्या देहाकडून पुढीलप्रमाणे स्पंदने प्रक्षेपित होत होती. त्यांत भावाच्या स्पंदनांचे प्रमाण अधिक असल्याचे लक्षात आले.
३. केसरकरकाकूंच्या देहाकडे पाहिल्यावर शांत वाटत होते. ‘तेथे ध्यानस्थ बसूया’, असे वाटत होते.
४. केसरकरकाकूंचा प्राण आज्ञाचक्रातून गेल्याचे जाणवले. (नंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून कळले, ‘काकूंचा प्राण सहस्रारचक्रातून बाहेर पडला.’ हे मला ठाऊक नसूनसुद्धा माझ्याकडून काकूंच्या केसांचा काही भाग संशोधनासाठी घेतांना त्यांच्या सहस्रारचक्राच्या ठिकाणचेच केस घेतले गेले.)
५. मला जाणवले, ‘केसरकरकाकूंचा प्राण जातांना कुठलाच अडथळा आला नाही. तसेच त्यांचा पुढचा प्रवासही (प्रगतीही) विनाअडथळा जलद गतीने होईल.’
६. केसरकरकाकूंची आध्यात्मिकउन्नती जलद गतीने होत असणे
सौ. केसरकरकाकूंची आध्यात्मिक पातळी २३.७.२०२१ या गुरुपौर्णिमेच्या दिवशी ६६ टक्के असल्याचे घोषित झाले होते. आज मृत्यूच्या दिवशी त्यांची पातळी ६८ टक्के झाली असल्याचे मला जाणवले. यावरून गेल्या ३ मासांत (महिन्यांत) त्यांची आध्यात्मिक पातळी २ टक्क्यांनी वाढल्याचे, म्हणजेच त्यांची उन्नती जलद गतीने होत असल्याचे जाणवले; म्हणूनच त्यांना कर्करोगासारखा दुर्धर आजार झाला असूनही आणि या आजारात वेदना पुष्कळ प्रमाणात होत असूनही त्या शेवटपर्यंत आनंदी अन् ईश्वराच्या अनुसंधानात होत्या.’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१९.१०.२०२१)
‘सर्वसाधारण व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिच्या मृतदेहाच्या जवळपास जडपणा आणि त्रास जाणवतो; परंतु कै. (सौ.) प्रमिला केसरकर आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत (त्यांची आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) असल्यामुळे त्यांचे पार्थिव ठेवलेल्या परिसरात आनंद अन् भाव जाणवत होता.’ – अधिवक्ता रामदास केसरकर, सनातन संस्थेचे कायदेविषयक मानद सल्लागार (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.१०.२०२१) |
|