निवती-मेढा येथे सिलिंडरच्या स्फोटात घर आणि साहित्य यांची ८ लाख रुपयांची हानी
सुदैवाने जीवितहानी टळली
वेंगुर्ले – तालुक्यातील निवती-मेढा येथे तुकाराम शामसुंदर मेथर यांच्या घरात २३ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात मेथर यांची ८ लाख रुपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. स्फोट झाल्याचे लक्षात येताच घरातील व्यक्ती वेळीच बाहेर पडल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला.
मेथर यांची पत्नी स्वयंपाकघरात नेहमीप्रमाणे सकाळी गॅसवर दूध गरम करत होती. या वेळी अचानक सिलिंडरच्या पाईपमधून धूर येऊन सिलिंडरचा स्फोट झाला. या वेळी प्रसंगावधान राखत मेथर पत्नी आणि २ मुले यांच्यासह बाहेर पडले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या स्फोटाने स्वयंपाकघरासह घराच्या अन्य भिंतींना तडे गेले आहेत. स्फोटामुळे झालेला आवाज ऐकून शेजारी घटनास्थळी आले; मात्र तोपर्यंत घरातील वस्तू जळून गेल्या होत्या. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तलाठी व्ही.आर्. ठाकूर यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.