बांबोळी येथील गाडेधारकांना १९ डिसेंबरपर्यंत गाडे (फिरती दुकाने) देण्याचे आमदार टोनी फर्नांडिस यांचे आश्वासन : गाडेधारकांचे आंदोलन मागे
बांबोळी येथील पूर्वीचे गाडे अनधिकृत नव्हते आणि गाडेधारकांना नवीन गाडे द्यायचे होते, तर नवीन गाड्यांची सिद्धता झाल्यावर पूर्वीचे गाडे का हटवले नाहीत ?
पणजी, २२ ऑक्टोबर (वार्ता.) – सांताक्रूझचे आमदार टोनी फर्नांडिस यांनी दिलेल्या आश्वासनानंतर बांबोळी येथील गाडेधारकांनी त्यांचे आंदोलन मागे घेतले आहे. आमदार टोनी फर्नांडिस यांनी १९ डिसेंबरपर्यंत गाडेधारकांना गाडे देण्याचे आणि १० नोव्हेंबरपर्यंत गाडे उभारले जाणार असल्याचे आश्वासन दिले. १० नोव्हेंबरपर्यंत गाडे उभारण्याचे काम चालू न झाल्यास ११ नोव्हेंबरपासून पुन्हा उपोषणाला बसण्याचा निर्धार गाडेधारकांनी केला आहे. आमदार टोनी फर्नांडिस यांनीही स्वत: गाडेधारकांसमवेत उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले आहे.
याप्रसंगी आमदार टोनी फर्नांडिस म्हणाले, ‘‘विधानसभेच्या अधिवेशनानंतर मी मुख्यमंत्र्यांना भेटलो. गाडेधारकांच्या विषयावर मुख्यमंत्री आणि अधिकारी यांच्यासमवेत बैठक झाली. या बैठकीत गाड्यांसाठी जागा निश्चित करण्यात आली. या ठिकाणी ७२ गाडे उभारण्याचे निश्चित झाले आहे. या बैठकीला आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांचीही उपस्थिती होती. गाड्यांचे उद्घाटन १९ डिसेंबर या दिवशी करून गाडे व्यावसायिकांना दिले जाणार आहेत. गाडे उभारणीसाठी विविध मान्यता घेण्यासाठी ८ दिवसांचा कालावधी लागणार आहे. दीनदयाळ योजनेअंतर्गतच्या गाड्यांचा यामध्ये समावेश करावा लागणार आहे. मामलेदारांनी जे गाडे हटवण्याचे आदेश दिले आहेत, त्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे. १९ डिसेंबरनंतर कधीही निवडणूक आचारसंहिता लागू होणार असल्याने गाडे उभारणीचे काम जलदगतीने केले जाणार आहे.’’