‘कला अकादमीच्या नूतनीकरण कामासाठी निविदा न मागताच कंत्राट कसे दिले ?’, याचे प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्टीकरण देण्याचे उच्च न्यायालयाकडून सरकारला निर्देश
पणजी, २२ ऑक्टोबर (वार्ता.) – ‘कला अकादमीच्या नूतनीकरण कामासाठी निविदा न मागताच कंत्राट कसे दिले ?’, यावर प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्टीकरण देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने सरकारला दिले आहेत. कला अकादमीच्या नूतनीकरण कामासाठी दिलेल्या कंत्राटात मोठा घोटाळा झालेला आहे. त्यामुळे हे कंत्राट रहित करण्याची मागणी करणारी जनहित याचिका ‘गोवा फॉरवर्ड’चे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात प्रविष्ट केली आहे. त्यावरील सुनावणीच्या वेळी गोवा खंडपिठाने हे निर्देश दिले.
सरकारकडून सध्या कला अकादमीच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे; मात्र कामाचे कंत्राट देतांना आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली नाही. ही प्रक्रिया पारदर्शक नव्हती. कंत्राट देण्यापूर्वी निविदा मागवणे आवश्यक असते; मात्र थेट कंत्राट देऊन सरकारने सर्व नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले आहे. त्यामुळे ‘हे कंत्राट रहित करून नव्याने निविदा प्रक्रिया पूर्ण करावी, तसेच संबंधित कंत्राटदाराला काम त्वरित बंद करण्याचे आणि कंत्राटदाराला देयकाची रक्कम न देण्याचे आदेश सरकारला द्यावेत’, अशी मागणी याचिकाकर्त्याने न्यायालयाकडे केली आहे.