आसगाव (भंडारा) येथील सेंट्रल बँकेत दीड कोटी रुपयांची अफरातफर !
शाखा व्यवस्थापकासह ५ जणांवर गुन्हा नोंद !
कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार !
भंडारा – जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या आसगाव शाखेत दीड कोटी रुपयांची अफरातफर करण्यात आली असून या प्रकरणी शाखा व्यवस्थापकासह ५ कर्मचार्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मुख्य आरोपी प्रमोद पडोळे यांच्यासह शाखा व्यवस्थापक उमेश कापगते, साहाय्यक व्यवस्थापक आशिष आटे, कमलाकर धार्मिक आणि सी.एस्.सी. आस्थापनाचे विभाग व्यवस्थापक दुर्गेश भोंगाडे अशी गुन्हा नोंद करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपी प्रदीप पडोळे यांची सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत वर्ष २०१८ पासून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी कर्मचार्यांना हाताशी धरून ग्राहकांचे ‘बायोमेट्रिक’ यंत्रणेद्वारे बँकेत पैसे काढण्याचे आणि जमा करण्याचे काम चालू केले होते. बँकेच्या एका खातेदाराने ‘स्वतःच्या खात्यातून २ लाख ४९ सहस्र रुपयांची रक्कम काढण्यात आली आहे’, अशी तक्रार केली होती. या तक्रारीवरून सखोल चौकशी आणि लेखापरीक्षण केले असता आरोपी प्रमोद याने १ कोटी ५० लाख रुपयांची अफरातफर केल्याचे निदर्शनास आले.
अधिकोषात बसून स्वत:ला बँक कर्मचारी असल्याचे भासवून ग्राहकांकडून पैसे जमा करणे, एकाच वेळी अनेक पैसे काढायच्या चलनावर ग्राहकांची स्वाक्षरी आणि अंगठे घेऊन ठेवणे, या अर्जाच्या आधारे ग्राहकांच्या खात्यावरील पैसे स्वत:च्या खात्यावर ‘ऑनलाईन’ पद्धतीने वळते करणे, तसेच ‘बायोमेट्रिक’ यंत्रणेचा दुरुपयोग करून अधिकोषातील ग्राहकांच्या अंगठ्याचा अपवापर करत स्तत:च्या खात्यावर पैसे वळते करणे, तसेच स्वतःच्या खात्यावर ‘ऑनलाईन’ पद्धतीने वळवलेले पैसे खोट्या ठेव पावत्या सिद्ध करून खोटे ‘बीसी कोड’चे शिक्के मारून ग्राहकांची फसवणूक प्रमोद पडोळे यांनी केली होती. या सर्व प्रकारावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार असतांना अधिकोषातील वरील कर्मचार्यांनी कर्तव्यात कचुराई केल्याचे निर्दशनास आले. त्यामुळे बँक व्यवस्थापक हर्षकुमार जामगंडे यांनी पवनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.