कुडाळ येथे श्री दुर्गामाता दौड काढण्यास पोलिसांनी अनुमती नाकारल्याच्या निषेधार्थ ‘शिवप्रेमी सिंधुदुर्ग’ संघटनेचे जिल्हाधिकार्‍यांना पत्र

पोलीस आणि प्रशासन यांनी श्री दुर्गामाता दौड काढण्यास अनुमती नाकारल्याचे आणि ‘ईद ए मिलाद’ची फेरी काढण्यास विशेष गोष्ट म्हणून अनुमती दिल्याचे प्रकरण

या देशात कुणाचेही शासन आले, तरी ‘हिंदूंना वेगळा आणि अल्पसंख्यांकांना वेगळा कायदा’, असेच धोरण दिसून येते ! – संपादक

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांना निवेदन देतांना शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेचे पदाधिकारी

कुडाळ – शहरात श्री दुर्गामाता दौड काढण्यास पोलिसांनी अनुमती नाकारली होती; मात्र १९ ऑक्टोबरला ‘ईद ए मिलाद’निमित्त फेरी काढण्यास विशेष गोष्ट म्हणून पोलिसांनी अनुमती दिली, असा आरोप करत ‘शिवप्रेमी सिंधुदुर्ग’, या संघटनेच्या वतीने पोलीस आणि शासन यांच्या हिंदूंविषयीच्या दुटप्पी भूमिकेचा निषेध म्हणून २२ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. यापूर्वी २० ऑक्टोबरला शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेच्या वतीने कुडाळ पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगाडे यांनाही निषेधाचे पत्र देण्यात आले होते.

या निवेदनात म्हटले आहे की, ७ ऑक्टोबरला श्री दुर्गामाता दौड काढण्यासाठी अनुमती मागितली असता कुडाळ पोलिसांनी ‘दौड काढण्यासाठी अनुमती नाही’, असा शासनाचा निर्णय (जीआर्) आहे’, असे कारण सांगून अनुमती नाकारली; पण मंगळवार, १९ ऑक्टोबर या दिवशी ‘ईद ए मिलाद’च्या फेरीसाठी राज्यशासनाने विशेष शासननिर्णय काढून अनुमती दिली. (ज्या देशात धर्माच्या आधारे अल्पसंख्यांकांना सवलती, मुसलमानांच्या मिरवणुकांना अनुमती आणि हिंदूंच्या दौडला नाही, असे चालते, तो देश धर्मनिरपेक्ष कसा म्हणता येईल ? भारताला धर्मनिरपेक्ष म्हणणार्‍यांना याची लाज वाटायला पाहिजे ! – संपादक) त्यानुसार कुडाळ शहरातून भव्य मिरवणूक पोलिसांच्या संरक्षणात काढण्यात आली. ‘ईद ए मिलाद’निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीला आमचा मुळीच आक्षेप नाही; मात्र दुर्गामाता दौडला अनुमती नाकारण्याच्या पोलिसांच्या भूमिकेचा आणि महाराष्ट्र शासनाच्या हिंदूंना सतत दुजाभावाची वागणूक देण्याच्या भूमिकेचा निषेध करत आहोत.

या वेळी सर्वश्री प्रदीप घाडी, अनिष सावंत, प्रसाद नातू, नागेश नेमळेकर, किरण कुडाळकर, दैवेश रेडकर, प्रीतेश वराडकर, शिवा कोळी, प्रशांत सावंत, माधवजी भानुशाली यांच्यासह अन्य शिवप्रेमी उपस्थित होते.