वास्को मासळी मार्केटबाहेर पोलिसांचे संचलन (परेड) : बाजारातील व्यापारी आणि विक्रेते यांच्यामध्ये तणावाचे वातावरण
वास्को मासळी मार्केटबाहेरील फळ-भाजी विक्रेत्यांनी दुसर्या तात्पुरत्या ‘शेड’मध्ये स्थलांतर होण्यास नकार दर्शवल्याचे प्रकरण
वास्को, २२ ऑक्टोबर (वार्ता.) – वास्को मासळी मार्केटबाहेरील फळ-भाजी विक्रेत्यांना दुसर्या ठिकाणी उभारलेल्या तात्पुरत्या ‘शेड’मध्ये स्थलांतर होण्यास सांगूनही ते तेथे गेलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर २२ ऑक्टोबर या दिवशी पोलिसांनी मासळी मार्केटबाहेरील परिसरातून संचलन केले. यामुळे बाजारातील विक्रेते, व्यापारी आणि बाहेर फळे आणि भाजी यांची विक्री करणारे व्यापारी यांच्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले.
सध्याचा बाजार पाडून नवीन बाजार प्रकल्प उभारण्याचा सरकारचा विचार आहे. तत्पूर्वी तेथे असलेल्या आणि बाहेरील बाजूस बसणार्या विक्रेत्यांसाठी दुसरीकडे शेड उभारण्यात आली आहे. त्या ठिकाणी त्यांना स्थलांतरित केले जाणार आहे. मुरगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकार्यांनी पोलिसांची सुरक्षा घेऊन मासळी मार्केटबाहेरील विक्रेत्यांना तात्पुरत्या शेडमध्ये स्थलांतरित होण्यास सांगितले, तसेच मासळी विक्रेत्यांनाही याच ‘शेड’मध्ये स्थलांतर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वास्को येथे अयोग्य पद्धतीने घाऊक मासेविक्री करण्यासमवेतच अनधिकृतपणे विविध ठिकाणी बसून मासेविक्री केली जाते. याला मासळी मार्केटमधील व्यापार्यांचा विरोध आहे. ‘घाऊक मासेविक्री बंद करा नंतरच आम्ही स्थलांतरित होऊ’, असे विक्रेत्यांनी पालिका प्रशासनाला कळवले आहे. त्यावर हा प्रकार बंद करण्याचे आश्वासन पालिका प्रशासनाने दिले आहेत. मुरगाव नगरपालिकेच्या अधिकार्यांनी सांगूनही फळ-भाजी विक्रेते शेडमध्ये स्थलांतरित न झाल्याने पोलिसांनी संचलन केले. नवीन मासळी मार्केटच्या विषयावर तोडगा काढण्यासाठी २२ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी उशिरा मुरगावच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयात बैठक चालू होती. यामध्ये महिला विक्रेत्यांनाही बोलावण्यात आले होते.