आश्विन मासातील (२४.१०.२०२१ ते ३०.१०.२०२१ या सप्ताहातील) शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !
‘७.१०.२०२१ दिवसापासून आश्विन मास चालू झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
१. हिंदु धर्मानुसार ‘प्लव’नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४३, दक्षिणायन, शरदऋतू, आश्विन मास आणि कृष्ण पक्ष चालू आहे.
(संदर्भ : दाते पंचांग)
२. शास्त्रार्थ
२ अ. संकष्ट चतुर्थी : प्रत्येक मासातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला ‘संकष्ट चतुर्थी’, असे म्हणतात. ज्या दिवशी चंद्रोदयसमयी चतुर्थी तिथी असते, त्या दिवशी संकष्ट चतुर्थीचा उपवास करतात; कारण श्री गणपतीच्या या व्रतामध्ये चंद्रदर्शन होणे विशेष महत्त्वाचे आहे. २४.१०.२०२१ या दिवशी संकष्ट चतुर्थी आहे. या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री ८.४४ आहे. या दिवशी श्री गणेश मंत्राचा जप करावा. या दिवशी गणपति अथर्वशीर्ष, श्री गणेशस्तोत्र, श्री गणेश अष्टोत्तरशत नामस्तोत्र वाचतात. या उपासनेने सर्व कार्ये सिद्ध होतात.
२ आ. करक चतुर्थी : आश्विन कृष्ण पक्ष चतुर्थी या दिवशी करक चतुर्थी म्हणजे ‘करवा चौथ’ हे व्रत देहली, हरियाणा, राजस्थान, पंजाब, उत्तरप्रदेश, जम्मू, हिमाचल प्रदेश आणि मध्यप्रदेश येथे केले जाते. विवाहित स्त्रिया आपल्या पतीचे दीर्घायुष्य आणि समृद्धी यांसाठी पूर्ण दिवस उपवास करून प्रथम चंद्र अन् नंतर पती यांचे दर्शन घेतात. या दिवशी भगवान शिव, देवी पार्वती आणि कार्तिकेय यांची पूजा केली जाते. या दिवशी मातीचे घडे पाण्याने भरून त्यांची पूजा केली जाते. या मातीच्या घड्यांना ‘करवा’ असे म्हणतात. २४.१०.२०२१ या दिवशी करक चतुर्थी आहे.
२ इ. घबाड मुहूर्त : हा शुभ मुहूर्त आहे. २४.१०.२०२१ या दिवशी उत्तररात्री १.०१ पासून दुसर्या दिवशी पहाटे ५.४४ पर्यंत आणि ३०.१०.२०२१ या दिवशी दुपारी २.४४ पासून ३१.१०.२०२१ या दिवशी दुपारी १.१६ पर्यंत घबाड मुहूर्त आहे.
२ ई. अमृतयोग : वार आणि नक्षत्र यांच्या संयोगाने अमृतयोग होतो. अमृतयोगावर कोणतेही शुभ कार्य केल्यावर यश प्राप्त होते. २५.१०.२०२१ या दिवशी हा योग सूर्याेदयापासून उत्तररात्री ४.११ पर्यंत आहे. या दिवशी सोमवार आणि मृग नक्षत्र आहे.
२ उ. दग्ध योग : रविवारी द्वादशी, सोमवारी एकादशी, मंगळवारी पंचमी, बुधवारी तृतीया, गुरुवारी षष्ठी, शुक्रवारी अष्टमी आणि शनिवारी नवमी ही तिथी असेल, तर दग्धयोग होतो. दग्धयोग हा अशुभ योग असल्याने सर्व कार्यांसाठी निषिद्ध मानला आहे.
१. २६.१०.२०२१ या दिवशी मंगळवार असून सकाळी ८.२४ पर्यंत पंचमी तिथी असल्याने ‘दग्धयोग’ आहे.
२. २९.१०.२०२१ या दिवशी शुक्रवार असून दुपारी २.१० पर्यंत अष्टमी तिथी असल्याने ‘दग्धयोग’ आहे.
३. ३०.१०.२०२१ या दिवशी शनिवार असून दुपारी २.४४ पर्यंत नवमी तिथी असल्याने दग्धयोग आहे.
२ ऊ. यमघंटयोग : रविवारी मघा, सोमवारी विशाखा, मंगळवारी आर्द्रा, बुधवारी मूळ, गुरुवारी कृत्तिका, शुक्रवारी रोहिणी आणि शनिवारी हस्त नक्षत्र एकत्र आल्यास ‘यमघंटयोग’ होतो. हा अनिष्ट योग आहे. प्रवासासाठी या योग पूर्णतः वर्ज्य करावा. मंगळवारी २६.१०.२०२१ या दिवशी सूर्याेदयापासून अहोरात्र आर्द्रा नक्षत्र असल्याने यमघंट योग आहे.
२ ए. भद्रा (विष्टी करण) : ज्या दिवशी ‘विष्टी’ करण असते, त्या काळालाच ‘भद्रा’ किंवा ‘कल्याणी’, असे म्हणतात. भद्रा काळात शुभ आणि मंगल कार्ये करत नाहीत; कारण त्या कार्यांत विलंब होण्याचा संभव असतो. २७.१०.२०२१ या दिवशी सकाळी १०.५१ पासून रात्री ११.५४ पर्यंत विष्टी करण आहे, तसेच ३०.१०.२०२१ या दिवशी उत्तररात्री २.४२ पासून दुसर्या दिवशी दुपारी २.२८ पर्यंत विष्टी करण आहे.
२ ऐ. कराष्टमी : आश्विन कृष्ण पक्ष अष्टमी तिथीला ‘कराष्टमी’ म्हणतात. आश्विन कृष्ण पक्ष अष्टमी या दिवशी कुमारिका गंगोदकाने भरलेला करा (मडके) हातांत घेऊन देवीची पूजा करतात. ‘कराष्टमी पूजन केल्याने वंशरक्षण, सुख, शांती आणि समृद्धी यांची प्राप्ती होते’, असे मानले जाते.
२ ओ. कालाष्टमी : प्रत्येक मासातील प्रदोषकाळी असलेल्या कृष्ण अष्टमीला ‘कालाष्टमी’ म्हणतात. कालाष्टमीच्या दिवशी शिवोपासना करतात. या दिवशी शिवाच्या भैरव स्वरूपाची उपासना करतात. २८.१०.२०२१ या दिवशी दुपारी १२.५० पासून अष्टमी तिथी आहे.
२ औ. गुरुपुष्यामृतयोग : गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्यास ‘गुरुपुष्यामृतयोग’ होतो. २८.१०.२०२१ या दिवशी सकाळी ९.४१ पासून दुसर्या दिवशी सूर्याेदयापर्यंत गुरुपुष्यामृतयोग आहे. या दिवशी ‘सुवर्ण खरेदी करणे आणि शुभकार्ये करणे’, असा प्रघात आहे. हा योग रात्री असल्याने सुवर्ण खरेदी करणे शक्य नाही; परंतु साधकांनी ‘गुरुपुष्यामृतयोगा’वर अधिकाधिक साधना करणे आवश्यक आहे. या योगावर प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचे पुरश्चरण केल्यास बुद्धीची वाढ होते. याविषयी सविस्तर लेख दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये दिला आहे. (दैनिक ‘सनातन प्रभात’च्या संकेतस्थळाची लिंक : https://sanatanprabhat.org/marathi/435530.html)
२ अं. मृत्यूयोग : रविवारी अनुराधा, सोमवारी उत्तराषाढा, मंगळवारी शततारका, बुधवारी अश्विनी, गुरुवारी मृग, शुक्रवारी आश्लेषा आणि शनिवारी हस्त नक्षत्र एकत्र आल्यास ‘मृत्यूयोग’ होतो. हा योग प्रयाणास किंवा कोणत्याही शुभ कार्यास वर्ज्य करावा. शुक्रवार, २९.१०.२०२१ या दिवशी सकाळी ११.३८ पासून आश्लेषा नक्षत्र असल्याने मृत्यूयोग आहे.
टीप १ – ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याेदयानंतर वार पालटतो.
टीप २ – प्रदोष, दग्ध योग, घबाड मुहूर्त, भद्रा (विष्टी करण), कुलधर्म, अन्वाधान, इष्टि, दुर्गाष्टमी, एकादशी,आणि क्षय दिन यांविषयीची अधिक माहिती पूर्वी प्रसिद्ध केली आहे.
टीप ३ – वरील सारणीतील शुभ / अशुभ दिवस पाहून ‘दिवस अशुभ आहे’, हे कळल्यावर ‘प्रवास किंवा इतर सेवा केल्यास त्याचे अशुभ परिणाम भोगावे लागतील’, अशी शंका साधकांच्या मनात निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा साधकांनी संतांची पुढील वचने लक्षात ठेवावीत.
१. हरिचिया दासा हरि दाही दिशा ।
भावें जैसा तैसा हरि एक ।। – संत एकनाथ
अर्थ : भक्ताला सर्वत्र देवाचेच दर्शन होते. भक्ताचा जसा भाव असतो, त्या स्वरूपात त्याला देव दिसतो.
२. तुका म्हणे हरिच्या दासा ।
शुभ काळ दाही दिशा ।। – संत तुकाराम
अर्थ : तुकाराम महाराज म्हणतात, ‘भक्तासाठी सर्व दिशा आणि वेळ ही शुभच असते.’
ज्या व्यक्तीच्या मनात सतत ईश्वरप्राप्तीचा ध्यास आहे, अशा भक्ताची काळजी ईश्वर घेतो.’
– सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद, वास्तू विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित आणि हस्ताक्षर मनोविश्लेषणशास्त्र विशारद), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१४.१०.२०२१)