तळजाई टेकडीवरील जैवविविधता नष्ट होऊ देणार नाही ! – शिवसेना उपनेते सचिन अहिर
पुणे – शहरांचा विकास करतांना निसर्गामधील विविध घटकांचा समतोल राखणे आवश्यक आहे. पर्यावरणाची हानी होऊ न देता त्याची काळजी घ्यायला हवी. तळजाई टेकडी म्हणजे पुण्याचा महत्त्वाचा भाग असल्याने तेथील जैवविविधता नष्ट होऊ देणार नाही, असे आश्वासन माजी राज्यमंत्री आणि शिवसेनेचे उपनेते सचिन अहिर यांनी दिले. तळजाई प्रकल्पाविषयी ‘माय अर्थ फाउंडेशन’चे अध्यक्ष अनंत घरत आणि शहर प्रमुख गजानन थरकुडे यांच्या माध्यमातून विविध पर्यावरणप्रेमी संस्था, ‘एन्व्हायरमेंट क्लब ऑफ इंडिया’चे सहकारी, ‘बायोशेफर्स संस्था’ आणि ‘सहकारनगर नागरिक मंचा’चे अधिकारी यांनी अहिर यांची भेट घेतली. ‘तळजाई वसुंधरा जैवविविधता प्रकल्प’ या नावाखाली निसर्गाचा र्हास होत असून तो थांबवण्यासाठी ‘माय अर्थ फाउंडेशन’ लोकांमध्ये प्रबोधन करत आहे. हा प्रकल्प रहित करण्यासाठी आम्ही शासकीय पातळीवर विरोध करत असून न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जाण्यास सिद्ध आहोत’, असे अनंत घरत यांनी सांगितले.