लोणी (जळगाव) येथे अतिक्रमण काढण्याची कारवाई चालू असतांना पोलीस निरीक्षकासह पोलीस कर्मचार्याला ग्रामस्थांची मारहाण !
• मारहाण करणार्यांना अटक !
• पोलीस निरीक्षक घायाळ !
पोलिसांवर हात उगारण्याचा उद्दामपणा केला जातो, यावरून नागरिकांना कायदा-सुव्यवस्थेचा काहीही धाक राहिलेला नाही, हेच दिसून येते ! – संपादक
जळगाव – जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील लोणी येथे अतिक्रमण निर्मूलन पथकाची कारवाई चालू असतांना पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे आणि त्यांचे सहकारी पोलीस नाईक कर्मचारी दिनेश मारवडकर यांना ग्रामस्थांनी मारहाण केली. ही घटना २१ ऑक्टोबर या दिवशी १०.३० वाजता घडली. मारहाण करणार्यांना पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेत पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांना दुखापत झाली.
लोणी या गावात जिल्हा परिषदेच्या वतीने प्राथमिक आरोग्य उपकेंद्र उभारण्यात आले आहे. काही ग्रामस्थांनी त्याच्या आवारात गावातील अतिक्रमण करून बांधकाम केले होते. स्थानिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे याविषयी तक्रारी केल्या. त्या संदर्भात ग्रामपंचायत प्रशासनाने जामनेर आणि जळगाव येथील न्यायालयांत याचिका प्रविष्ट केली होती. ग्रामपंचायत प्रशासनाच्या बाजूने त्याचा निकाल लागला. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्याची कारवाई चालू होती. तेव्हा पोलीस निरीक्षक अरुण धनवडे आणि पोलीस नाईक दिनेश मारवडकर यांच्याशी अतिक्रमण करणार्या ग्रामस्थांनी वाद घातला आणि पोलिसांवरच हात उगारला.