मराठवाडा मध्य रेल्वेला जोडावे ! – संभाजीनगर येथील खासदारांची मागणी
संभाजीनगर – ‘मराठवाड्यात रेल्वेचे विविध प्रकल्प रखडलेले आहेत. छोट्या रेल्वे स्थानकांवर सुविधा मिळत नाहीत, तसेच कोरोनापूर्वी बंद झालेल्या रेल्वे पुन्हा चालू करण्यात आलेल्या नाहीत. मराठवाड्यात गेल्या ७० वर्षांत केवळ ८२ किलोमीटर रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम झाले असून त्यातील केवळ ३५ किलोमीटर विद्युतीकरण करण्यात आलेले आहेत. यावरून नांदेड विभागावर अन्याय होत असल्याचे स्पष्ट होत आहे. मराठवाडा मध्य रेल्वेशी जोडण्याची कार्यवाही करण्यात यावी’, अशी मागणी खासदार संजय जाधव, खासदार फौजिया खान आणि खासदार इम्तियाज जलील यांनी रेल्वे अधिकार्यांच्या बैठकीत केली.
दक्षिण-मध्य रेल्वेच्या विभागाच्या वतीने मराठवाड्यातील खासदारांची संभाजीनगर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयात २० ऑक्टोबर या दिवशी ‘मिटींग हॉल’ येथे रेल्वे प्रश्नांविषयीची बैठक पार पडली. या वेळी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि वरील ३ खासदार उपस्थित होते. या बैठकीत खासदारांनी विविध प्रश्न मांडले. ‘अनेक वर्षांपासून दक्षिण-मध्य रेल्वेच्या विभागात असलेल्या नांदेड विभागाच्या प्रकल्पाकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. या दुर्लक्षामुळेच मराठवाडा दक्षिण-मध्य रेल्वे विभागातून वेगळे करा. हा भाग मध्य रेल्वेला जोडा’, अशीही मागणी खासदारांनी केली.