‘ट्विटर’वर अवमानकारक ट्वीट करून ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना माकडापेक्षा न्यून लेखण्याचा प्रकार !
विरोधानंतर ‘ट्वीट’ पुसून टाकले !
काँग्रेस राष्ट्रपुरुषांचा अवमान करणार्या मंत्र्यांची हाकालपट्टी करील, याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे अशांना जनतेनेच मतदानाच्या वेळी जागा त्यांची दाखवावी ! – संपादक
मुंबई, २२ ऑक्टोबर (वार्ता.) – महाविकास आघाडी सरकारमधील ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी २२ ऑक्टोबर या दिवशी एका ट्वीट करून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना माकडापेक्षा न्यून लेखण्याचा घृणास्पद प्रकार केला. याविषयी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर काही वेळातच डॉ. राऊत यांनी स्वतःचे आक्षेपार्ह ‘ट्वीट’ पुसून (डिलीट) टाकले.
डॉ. नितीन राऊत यांनी ट्वीटमध्ये भारत सरकारने प्रकाशित केलेली दोन टपाल तिकिटे दाखवत म्हटले होते, ‘इंदिरा गांधी यांच्या काळात ही टपाल तिकिटे छापण्यात आली होती. माकडाची किंमत पाचपटींनी अधिक आहे.’ या तिकिटांमध्ये एका ‘सुनहरा लंगूर’ या जातीच्या माकडाचे १०० पैश्यांचे तिकीट दाखवले होते. त्याखाली त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे चित्र असलेले २० पैश्यांचे तिकीट दाखवले होते. माकडाच्या तिकिटाचे मूल्य स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तिकिटापेक्षा पाचपट अधिक असल्याचे दाखवत डॉ. नितीन राऊत यांनी अप्रत्यक्षपणे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना माकडापेक्षा न्यून लेखून स्वत:चा सावरकरद्वेष दाखवून दिला.