प्राथमिक समस्या दूर करण्याच्या मागणीसाठी नगर येथील महापालिका आयुक्तांच्या दालनात नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन !
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही रस्ते, पाणी या मूलभूत सुविधा पुरवण्यात प्रशासकीय अधिकार्यांची अनास्था दिसून येणे हे लज्जास्पद ! अशा कामचुकार अधिकार्यांचे निलंबनच व्हायला हवे ! – संपादक
नगर – येथील प्रभाग क्रमांक १ मधील ढवण वस्ती आणि तपोवन हडको परिसरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, जागोजागी पडलेले खड्डे, अवेळी होणारा पाणीपुरवठा अशा अनेक प्रश्नांसाठी नगरसेवकांसह नागरिकांनी आयुक्त शंकर गोरे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. ‘पुढील १५ दिवसांत प्रश्न न सुटल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल’, अशी चेतावणी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी दिली. ‘वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही अधिकार्यांच्या हलगर्जीपणामुळे पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यांचा प्रश्न गंभीर असल्याने आयुक्तांनी या समस्या सोडवण्यासाठी लक्ष घालावे’, असे बारस्कर यांनी सांगितले. ‘नागरिकांवर आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. अधिकार्यांची बैठक घेऊन तातडीने प्रश्न मार्गी लावले जातील’, असे आश्वासन आयुक्त शंकर गोरे यांनी दिले.