कणकवली नगरपंचायत भरवणार ‘दिवाळी बाजार’
मातीपासून वस्तू बनवण्याचे प्रात्यक्षिक पहाता येणार
कणकवली – दिवाळीच्या निमित्त कणकवली नगरपंचायतीच्या वतीने ‘दिवाळी बाजार’ भरवण्यात येणार आहे. बचत गटांच्या माध्यमातून बनवण्यात येणारा फराळ, मेणबत्त्या, आकाश कंदील, हस्तकलेतून साकारणार्या वस्तू यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या वेळी ‘युथ वेल्फेअर सिंधुदुर्ग’ या संघटनेच्या माध्यमातून कुंभार समाजाकडून बनवण्यात येणार्या मातीच्या विविध वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री या ठिकाणी होणार आहे. (स्थानिक व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासह कुंभार समाजाच्या पारंपरिक कलेला प्रोत्साहन देणार्या कणकवली नगरपंचायतीचे अभिनंदन ! अशा प्रकारे पारंपरिक कलांना प्रोत्साहन दिले गेल्यास भारताच्या प्राचिन आणि विविध कलांना ऊर्जितावस्था प्राप्त होईल. – संपादक)
कुंभार समाजाकडून केल्या जाणार्या पणत्या, भांडी, मातीचे आकाश कंदील आदी मातीपासून विविध वस्तू सिद्ध करण्याच्या पारंपरिक कलेची जोपासना व्हावी, यासाठी ‘युथ वेल्फेअर सिंधुदुर्ग’ या संघटनेने पुढाकार घेतला आहे. या बाजारात कुंभार समाजासाठी १५ स्टॉल असणार आहेत. या वेळी कुंभार मातीच्या वस्तू कशा सिद्ध करतात याचे प्रात्यक्षिकही दाखवले जाणार आहे. कणकवली शहरातील उड्डाणपुलाच्या खाली असणार्या जागेत २८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत हा बाजार भरणार आहे, अशी माहिती नगरसेविका मेघा गांगण यांनी दिली.