वेंगुर्ले शाळा क्रमांक २ च्या इमारतीवर पडलेले झाड ६ मासांनंतरही न हटवल्याने मुलांवर शाळेच्या व्हरांड्यात बसण्याची वेळ !
|
शाळेच्या इमारतीवर पडलेले झाड काढण्यासाठी प्रशासनाकडे निधी नसणे लज्जास्पद ! संबंधितांवर कडक कारवाई व्हायला हवी !
वेंगुर्ले – ६ मासांपूर्वी जिल्हा परिषद शाळा क्रमांक २ च्या इमारतीवर वडाचे झाड पडून इमारत धोकादायक बनली होती; मात्र येथील ग्रामीण रुग्णालय प्रशासन आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्रशासन या शासनाच्या २ विभागांत समन्वय नसल्याने हे झाड अद्याप त्याच स्थितीत आहे. हे झाड हटवण्याविषयी पालकांनी प्रशासनाला निवेदन देऊनही त्यावर कार्यवाही न झाल्याने पालकांनी आता शाळेच्या व्हरांड्यात शाळा भरवण्यास प्रारंभ केला आहे; मात्र येत्या ८ दिवसांत याविषयी कार्यवाही न झाल्यास मुलांना घेऊन वेंगुर्ले पंचायत समितीच्या कार्यालयात शाळा भरवू, अशी चेतावणी पालकांनी दिली आहे. त्यामुळे प्रशासन आता काय भूमिका घेते ? याकडे लक्ष लागून आहे. (या इमारतीत शाळा भरवून अपघात होण्याची वाट प्रशासन बघत आहे का ? नागरिकांना चेतावणी का द्यावी लागते ? शाळेच्या इमारतीवर झाड पडून ते ६ मास काढले न जाणे यातून प्रशासन आहे कि नाही ? असा प्रश्न पडतो ? – संपादक)
मे मासात झालेल्या तौक्ते चक्रीवादळात वेंगुर्ले शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळा क्रमांक २ च्या इमारतीवर मोठे वडाचे झाड कोसळले होते. ४ ऑक्टोबरला शाळा चालू करण्याचा शासनाचा निर्णय होण्यापूर्वी शिक्षक-पालक संघाने इमारतीवर पडलेले झाड काढून इमारत सुस्थितीत करण्याविषयी गटविकास अधिकार्यांना निवेदन दिले होते. त्या वेळी झाड वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात आहे; मात्र ते शाळेवर पडले असले, तरी ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने ते तोडले पाहिजे, असे गटविकास अधिकार्यांनी सांगितले, तर ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने ते झाड शाळा जिल्हा परिषदेची असल्याने जिल्हा परिषदेने तोडावे, अशी भूमिका घेतली. (यातून गटविकास अधिकारी आणि रुग्णालय प्रशासन यांची जनतेप्रतीची असंवेदनशीलताच दिसून येते ! यांच्यावर कारवाई व्हायला हवी ! – संपादक) अखेर हा विषय पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे गेल्यावर त्यांनी ग्रामीण रुग्णालय प्रशासनाला झाड तोडण्याची सूचना केली. त्यानंतर निधी नसल्याचे कारण सांगत केवळ शाळेवर पडलेल्या झाडाच्या काही फांद्या ग्रामीण रुग्णालयाकडून तोडण्यात आल्या; मात्र इमारतीवर पडलेले मूळ झाड तसेच आहे. (शाळेच्या इमारतीवर पडलेले झाड काढायला शासनाकडे निधी नसणे, यासारखी नामुष्की नाही ! – संपादक) त्यामुळे अशा धोकादायक इमारतीत मुलांना न पाठवण्याचा निर्णय पालकांनी घेतला होता; परंतु शाळेत न पाठवल्यास मुलांची होणारी हानी टाळण्यासाठी पालकांनी मुलांना व्हरांड्यात बसवून शाळा चालू केली आहे; मात्र येत्या ८ दिवसांत सकारात्मक निर्णय न झाल्यास पंचायत समितीच्या कार्यालयात शाळा भरवण्याची चेतावणी पालकांनी दिली आहे.