उन्मत्तपणा !
गुंड प्रवृत्तीच्या लोकप्रतिनिधींना निवडणूक लढवण्यास आजन्म बंदी घालणे आवश्यक !
आपल्या देशात लोकशाहीचे कितीही गुणगान गायले जात असले, तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळी आहे, याचा प्रत्यय पंजाबमध्ये नुकताच सर्वांना आला. पंजाबमधील पठाणकोट जिल्ह्यातील भोआ येथे सत्ताधारी काँग्रेसचे आमदार जोगिंदर पाल हे एका सभेला संबोधित करत होते. त्या वेळी पाल यांच्याच मतदारसंघातील एका युवकाने त्यांना ‘तुम्ही गावासाठी काय काम केले ?’, असा प्रश्न विचारला. यावर त्या युवकाला उत्तर देण्याऐवजी भडकलेल्या पाल यांनी त्याला अमानुष मारहाण केली. हे प्रकरण येथेच थांबले नाही, तर या सभेस बंदोबस्तासाठी असणारे पोलीस आणि पाल यांचे सुरक्षारक्षक यांनीही त्या युवकाला अमानुष मारहाण केली. लोकशाहीत जनता किंवा मतदार हा ‘राजा’ मानला गेला आहे, तर त्यांनी निवडून दिलेल्या उमेदवारांना ‘सेवक’ मानले गेले आहे. अशात हा प्रसंग राजाला, म्हणजे जनतेला अंतर्मुख करणारा आहे. लोकशाहीमध्ये निवडून येणार्यांमध्ये मुळातच सेवकभाव नसतो. त्यांच्यात असते ती गुंडगिरी, भ्रष्ट प्रवृत्ती आणि धनलोभीपणा; किंबहुना हे दुर्गुणच जणू त्यांच्या निवडीचे मुख्य निकष बनले आहेत. त्याचा प्रत्यय मग जोगिंदर पाल यांच्यासारखे लोकप्रतिनिधी वेळोवेळी देत असतात. वास्तविक पाल यांनी त्यांना निवडून देणार्या मतदारांना मतदारसंघातील कामांचा आढावा स्वतःहून द्यायला हवा होता. ते तर दूरच; पण त्याविषयी विचारणा करणार्याला थेट मारहाण करणे, ही गुंडगिरी आहे. ‘मी काही करणार नाही, मला कुणी काही विचारायचे नाही आणि विचारलेच, तर त्याला सोडणार नाही’, ही पाल यांची मानसिकता उन्मत्तपणाची आहे. वास्तविक लोकप्रतिनिधींना ‘तुम्ही गावासाठी काय काम केले ?’, असा प्रश्न मतदारांना विचारावाच का लागतो ? कारण जनतेला काम झाल्याचे कुठेही दिसत नाही. अशात पाल यांना जाब विचारणारा युवक अभिनंदनास पात्र ठरतो. अशी जागरूकता सर्वच मतदारांनी दाखवायला हवी. लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याचा अधिकार जर मतदारांना नसेल, तर पाल यांच्यासारख्यांचे चांगलेच फावते. मतदार हा राजा जरी असला, तरी तो केवळ निवडणुकीपुरताच असतो. लोकशाहीत मतदार, म्हणजेच जनता हा कागदी वाघ आहे. त्यामुळे त्याला कुणीही घाबरत नाही. आतापर्यंत निवडणूक पार पडेपर्यंत तरी लोकप्रतिनिधी जनतेशी चांगले वागत. आता तर निवडणुकांच्या तोंडावरच ते जनतेला मारहाण करू लागले आहेत. निवडणुकीपूर्वी उमेदवार मतदारासमोर जे हात जोडतो, नंतर त्याच हातांनी त्याला मारहाण करतो, हेच पंजाबमधील घटना सांगते. अशांना निवडून द्यायचे का ? हे आता जनतेने ठरवले पाहिजे. निवडणूक आयोगानेही अशांवर निवडणूक लढवण्यास आजन्म बंदी घातली पाहिजे. यासह संबंधित राजकीय पक्षांनीही अशा गुंड आणि उन्मत्त प्रवृत्तीच्या लोकप्रतिनिधींना घरचा रस्ता दाखवला पाहिजे. अशा प्रकारे उन्मत्त लोकप्रतिनिधींना जर चोहोबाजूंनी जेरीस आणले गेले, तरच ते वठणीवर येतील अन्यथा पाल यांच्यासारखे मदोन्मत्त लोकप्रतिनिधी निपजत रहातील आणि जनता त्यांच्या हातून मार खात राहील !