सांप्रदायिक साधनेत न अडकता प्रकृतीनुसार साधना करा !
‘एखाद्या आधुनिक वैद्याला (डॉक्टरला) एकच औषध ज्ञात असल्यास त्या औषधाने सर्व रुग्ण बरे होणार नाहीत; कारण काही रुग्णांना त्यांच्या आजारानुसार दुसरे औषध आवश्यक असते. साधनेतही असेच असते. सर्वांना एकच साधनामार्ग उपयोगी नसतो. प्रारब्ध, गेल्या जन्मीची साधना, साधना करण्याची क्षमता यांसारख्या विविध घटकांनुसार प्रत्येकाचा साधनामार्ग ठरलेला असतो. बहुतांश संप्रदायांना एकच साधनामार्ग ज्ञात असल्याने ते त्यांच्याकडे येणार्या प्रत्येकाला एकच साधना सांगतात. त्यामुळे कालांतराने त्या साधनापद्धतीमुळे पालट न झाल्याने अनेक जण साधना सोडून देतात किंवा ते सांगितलेली साधना करत राहिले, तरी त्यांची साधनेत प्रगती होत नाही. हे टाळण्यासाठी सर्व संप्रदायांनी ‘व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग’, हा नियम लक्षात ठेवला पाहिजे. त्यांच्याकडे येणार्या जिज्ञासूला त्याला आवश्यक ती साधना शिकवली पाहिजे. सनातनच्या सहस्रो साधकांपैकी कुणाही दोघांची साधना एकसारखी नसल्याचे हे एक कारण आहे.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (७.९.२०२१)
‘सर्वसाधारण जिवाने ‘मायेत अडकू नये’, यासाठी साधना करणे आवश्यक असते. साधनेने मायेतून बाहेर पडल्यावर जिवाने साधनेत अडकू नये; यासाठी ईश्वराने निर्गुण स्थिती निर्माण केली आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (८.९.२०२१)