सौ. माधुरी गाडगीळ (वय ७८ वर्षे) आणि श्री. माधव गाडगीळ (वय ८४ वर्षे) यांच्यामध्ये त्यांचे सुपुत्र सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि नात सौ. सायली करंदीकर यांना जाणवलेले चांगले पालट
‘माझी आई सौ. माधुरी आणि वडील श्री. माधव गाडगीळ १७ मार्च २०१९ या दिवशी गोव्यातील नागेशी येथे रहायला आले. माझ्या आई-वडिलांमध्ये पुढीलप्रमाणे चांगले पालट जाणवत आहेत. त्यांना सर्व साधक गाडगीळ आजी-आजोबा म्हणतात.
१. पहाटे लवकर उठून नामजप करणे
वडील पहाटे ३ वाजता उठून नामजप करतात. आईला झोप येत नसल्याने तिचाही नामजप चालू असतो. यानंतर आई-बाबांचा दिनक्रम पहाटे साडेचार वाजता आरंभ होतो.
२. आईच्या बोलण्यातून आणि तोंडवळ्यावर भाव जाणवणे आणि वडिलांमध्ये अव्यक्त स्वरूपात असलेला भाव त्यांच्या कृतींतून दिसून येणे
पूर्वी आईकडून प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त व्हायची; पण ती तेवढी आतून व्हायची नाही. आता तिच्यामधील भाव वाढला आहे. त्यामुळे आता ‘तिची प्रार्थना आणि कृतज्ञता आतून होते’, असे वाटते. तिचा परात्पर गुरु डॉक्टरांप्रतीही भाव वाढला आहे आणि तो तिच्या तोंडवळ्यावरून दिसून येतो. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली याही बाबांना म्हणाल्या, ‘‘आता आईंच्या बोलण्यातूनही भाव जाणवतो. तुम्हाला तो जाणवतो का ?’’ वडिलांमध्ये पूर्वी भाव होता; पण तो अव्यक्त होता. आता तो व्यक्त स्वरूपात दिसून येतो आणि त्यामध्ये वृद्धी झाल्याचे जाणवते. याचे एक उदाहरण म्हणजे, ऑक्टोबर २०१९ मध्ये त्यांच्या उजव्या डोळ्याच्या मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रियेच्या १ घंटा आधी त्यांना रुग्णालयात बोलावले होते. त्या १ घंट्याच्या कालावधीमध्ये ते सतत प्रार्थना आणि नामजप करत होते. त्यांना त्यांची शस्त्रक्रिया कधी पूर्ण झाली, हे कळलेच नाही.
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ जानेवारी २०२० मध्ये नागेशीला गेल्या असतांना आई-वडिलांना भेटल्या. तेव्हा त्याही म्हणाल्या, ‘‘आता तुमचे तोंडवळे चांगले दिसतात.’’
३. आईने तिला व्याधींमुळे होत असलेला त्रास स्वीकारलेला असणे, आता तिने तिच्या त्रासांची वाच्यता न करणे, तसेच वडिलांना आईचे करावे लागत असूनही तेही त्याची वाच्यता करत नसणे आणि सेवाही नियमित करत असणे
पूर्वी आईला तिच्या दुखण्यांची सतत जाणीव असायची. त्यामुळे ती त्याविषयी सांगायची. तिला झोप न येण्याचा त्रास असल्याने झोप आली नाही की, ती सतत त्याचाच विचार करायची. त्यामुळे तिला आणखी त्रास व्हायचा. आता ती स्वतःच्या व्याधींविषयी फारसे बोलत नाही. तिने ‘ते प्रारब्धानुसार आहे’, हे स्वीकारले आहे. आईची प्राणशक्ती पुष्कळ अल्प असल्याने वडिलांना आईला अंघोळ घालण्यापासून ते वेणी घालून देण्यापर्यंत तिचे प्रतिदिन सर्व करावे लागते. तसेच तिला उठता-बसतांना साहाय्य करावे लागते. या सर्व गोष्टींचा ते कधीही उल्लेख करत नाहीत. आईचे एवढे करत असूनही ते संगणकावर हिंदु जनजागृती समितीची आंदोलने, सभा, पत्रकार परिषदा इत्यादींचा आढावा भरणे, मजकुराचे टंकलेखन करणे आणि समष्टीसाठी मंत्रजप करणे या सेवा नियमित करतात.
४. आई-वडिलांमधील अपेक्षांचे प्रमाण पुष्कळ अल्प झाले असल्याने त्या दोघांमध्ये पोकळी निर्माण झाल्याचे जाणवणे
पूर्वी आई-वडिलांना ‘मी, तसेच श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली यांनी दूरभाष करावा, मी आणि सौ. सायली यांनी आपल्याकडे यावे’, असे वाटायचे. आता सेवेच्या व्यस्ततेमुळे आम्हाला कधी कधी ४ – ५ दिवस त्यांच्याकडे जाता येत नाही, तरीही ते त्याविषयी काही बोलत नाहीत. त्यांच्या अपेक्षा पुष्कळ अल्प झाल्या असल्याने त्या दोघांमध्ये पोकळी निर्माण झाल्याचे जाणवते.
५. आई-वडिलांमधील दोष-अहं यांचे प्रमाण अल्प झाले असून त्यांच्यामधील भाव आणि प्रेमभाव वाढला असल्याने आता त्यांना ‘सर्व जण आपले आहेत आणि सर्वांना प्रेम देऊया’, असे वाटणे
मागील वर्षीपेक्षा आई-वडिलांमधील स्वभावदोष आणि अहं यांचे प्रमाण अल्प झाले असून त्यांच्यामधील भाव आणि प्रेमभाव वाढला आहे. त्यामुळे त्यांच्या वागण्या-बोलण्यामध्ये सहजता आली आहे. आई-वडिलांना आता ‘सर्व जण आपले आहेत. सर्वांना प्रेम देऊया’, असे वाटते. साधक त्यांना करत असलेल्या साहाय्याविषयी त्यांना कृतज्ञता वाटते. रामनाथी आश्रमात काही यज्ञयाग असला की, आईला तेथे जावेसे वाटते; पण साधकांना आपल्याला आसंदीतून (खुर्चीतून) खाली न्यावे लागते, चारचाकी गाडीत उचलून बसवावे लागते; म्हणून ती तेथे जायला नकार देते.
६. सर्व साधक-संत यांच्याशी चांगली जवळीक निर्माण करणे
नागेशी येथे सर्व साधकांचे ते आजी-आजोबा झाले आहेत. सर्व साधक त्यांची आपुलकीने विचारपूस करतात, त्यांना भेटायला येतात. देवद आश्रमातील कुणी साधक किंवा संत आले की, तेही त्यांना आवर्जून भेटतात. वडिलांनी सर्वांशी चांगली जवळीक निर्माण केली आहे.’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल माधव गाडगीळ (मुलगा) आणि सौ. सायली करंदीकर (नात), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.२.२०२०)