आर्यन खान याच्यासह तिघांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला !
मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याच्यासह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या तिघांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळून लावला आहे. ‘कॉर्डेलिया क्रूझ’वर धाड टाकल्यानंतर केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने या सर्वांना अटक केली होती.
केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने न्यायालयात आर्यनच्या भ्रमणभाषमधील अमली पदार्थांविषयीचे संभाषण (चॅट) सादर केले. आर्यन खान याच्या अधिवक्त्यांनी ‘आता उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करणार आहे’, असे म्हटले आहे. सध्या हे तिघेही न्यायालयीन कोठडीत आहेत.
न्यायालयात गेल्या सुनावणीच्या वेळी केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने म्हटले की, आर्यन खान गेल्या काही वर्षांपासून नियमितपणे अमली पदार्थ घेत होता, याविषयीचे पुरावे आहेत. आर्यन खान याने एका नवोदित अभिनेत्रीसमवेत २ ऑक्टोबर या दिवशी क्रूझवरील अमली पदार्थांविषयी संभाषण केले आहे. आर्यनकडे काहीही सापडले नसले, तरी त्याच्या भ्रमणभाषमधील संभाषणामधून त्याचा आंतरराष्ट्रीय अमली पदार्थांच्या जाळ्याशी संबंध असल्याचे उघड होत आहे.