धाराशिव येथे धर्मांधांकडून दगडफेक !

  • औरंगजेबाविषयीच्या ‘फेसबूक पोस्ट’मुळे धार्मिक भावना दुखावल्याचे निमित्त

  • ४ पोलीस घायाळ

शहरातील विजय चौक येथे दगडफेक करतांना धर्मांध 

धाराशिव – सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित झालेल्या औरंगजेबाविषयीच्या ‘फेसबूक पोस्ट’वरून धार्मिक भावना दुखावल्याचे कारण पुढे करत धर्मांधांनी शहरातील विजय चौक येथे १९ ऑक्टोबरच्या रात्री दगडफेक केली. या दगडफेकीमध्ये विजय चौक येथे बंदोबस्तासाठी असलेले ४ पोलीस घायाळ झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत. (धर्मांधांकडून कायद्याच्या रक्षकांनाच जिथे मार खावा लागतो, तिथे सर्वसामान्य हिंदूंची स्थिती काय असेल ? – संपादक)

या प्रकरणी शहर पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत म्हणाले, ‘‘दोन तरुणांनी फेसबूकवर एका ‘पोस्ट’विषयी प्रतिक्रिया (कमेंट) दिली होती. दुसर्‍या गटाने या प्रतिक्रियेमुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला. या प्रतिक्रियेवरून तक्रार आल्यानंतर आम्ही त्यावर कारवाई करणार आहोत; मात्र पोलीस कायदेशीर कारवाई करत असतांना शांत रहाणे आवश्यक होते. त्यांनी विनाकारण चौकात येऊन हुल्लडबाजी करून आणि दगडफेक करून कायदा हातात घेण्यात आला आहे.’’

अफवांवर विश्वास ठेवू नका ! – पोलिसांचे नागरिकांना आवाहन

ज्यांना या घटनेविषयी माहिती असेल, त्यांनी पोलिसांना ही माहिती गुप्तपणे द्यावी. अशा माहितीचे आम्ही स्वागत करू. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. पोलीस त्यांचे काम करतील. ज्यांनी गुन्हा केला आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. फेसबूकवर आक्षेपार्ह प्रतिक्रिया देऊन वाद घालणारे आणि दगडफेक करून कायदा हातात घेणारे, अशा दोन्हींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती धाराशिव पोलिसांनी दिली.