नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात २ डोस घेतलेले आणि ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी केलेले यांनाच प्रवेश !
आमदारांचे स्वीय साहाय्यक आणि प्रेक्षक यांना प्रवेश नाही !
नागपूर – महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन येथे ७ डिसेंबरपासून प्रस्तावित आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनासाठी विशेष प्रतिबंधात्मक सिद्धता करण्यात आली आहे. मुंबई येथे पुढील आठवड्यात विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे. त्यादृष्टीने १८ ऑक्टोबर या दिवशी येथे पार पडलेल्या विधीमंडळ समितीच्या बैठकीत सर्व विभागांनी केलेल्या प्राथमिक सिद्धतेचा आढावा घेण्यात आला. अधिवेशनात सहभागी विधीमंडळ सदस्य, सर्व अधिकारी-कर्मचारी, वृत्तसंकलनासाठी येणारे माध्यमांचे प्रतिनिधी, सुरक्षेसाठी तैनात असणारे पोलीस, राज्यभरातून येणारे वाहन चालक या सर्वांनी २ डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आणि ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ची चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ची चाचणी अधिवेशन चालू होण्यापूर्वी करावयाची आहे, अशी सूचना विधीमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी आरोग्य विभागाला केली आहे. विधीमंडळ परिसरात आमदारांचे स्वीय साहाय्यक आणि प्रेक्षक यांना प्रवेश दिला जाणार नाही.