६१ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली अमरावती येथील चि. अन्वी अमोल वानखडे (वय २ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. अन्वी अमोल वानखडे ही एक आहे !
‘अमरावती येथील चि. अन्वी अमोल वानखडे (वय २ वर्षे) हिचा आज आश्विन कृष्ण पक्ष प्रतिपदा (२१.१०.२०२१) या दिवशी दुसरा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तिचे आई-वडील आणि आजी यांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
चि. अन्वी अमोल वानखडे हिला सनातन परिवाराच्या वतीने दुसर्या वाढदिवसानिमित्त अनेक शुभाशीर्वाद !
१. गरोदरपण
१ अ. दत्ताच्या मंदिरात नामजप करण्यासाठी गेल्यावर साधिकेला स्वत:च्या उदरी चैतन्यशक्ती जाणवून गरोदरपणाचे विचार येणे आणि दोन दिवसांनी गर्भधारणा झाल्याचे समजणे : ‘३.२.२०१९ या दिवशी एका धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला दोन दिवस बाकी असतांना मी सकाळी आवरून जवळच असणार्या एका दत्ताच्या मंदिरात नामजप करण्यासाठी गेले. त्या वेळी जप करतांनाच मला जाणवले, ‘माझ्या उदरी चैतन्यशक्ती आहे. जी दत्त प्रभूंकडून येत आहे.’ त्यानंतर माझ्या मनात गरोदरपणाचे विचार आले. मी तो विचार तिथेच देवाला अर्पण केला आणि सेवेला लागले. सभा झाल्यानंतर दोन दिवसांनी मला त्रास व्हायला लागला आणि मास पूर्ण होण्यापूर्वीच मला कळले, ‘मला गर्भधारणा झाली आहे.’ त्यानंतर मला त्रास होतच होता. तेव्हा सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी उपाय म्हणून पिंपळाच्या झाडाखाली प्रतिदिन एक घंटा जप करायला सांगितला. तेव्हा पहाटे पाच वाजता उठून मी जपाला जायचे. त्या वेळी मन पुष्कळ प्रसन्न असायचे. ‘माझ्यात साक्षात् चैतन्यशक्तीच आहे’, असे मला आतूनच जाणवायचे.
२. जन्मापूर्वी
२ अ. ‘शस्त्रकर्माच्या वेळी इंजेक्शन दिल्यावर देवीलोकात आहे’, असे वाटणे, प्रसुतीनंतर तेथील आधुनिक वैद्यांनी तुम्हा लोकांकडे बघून वेगळे वाटत असल्याचे सांगणे अन् जिज्ञासेने साधनेविषयी विचारणे : ‘९ व्या मासाच्या सोनोग्राफीनंतर आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘शस्त्रकर्म करावे लागेल.’’ आधुनिक वैद्य आमच्या खोलीत आल्यावर त्यांना पुष्कळ प्रसन्न वाटले. ते म्हणाले, ‘‘तुम्ही तर खोलीचे सर्व रूपच पालटले आहे. तुम्ही काय करता ?’’ सकाळी ९.३० वाजता त्यांनी मला शस्त्रकर्मासाठी नेले. मला ‘इंजेक्शन’ दिल्यानंतर ‘मी देवीलोकात आहे’, असे मला वाटत होते. शुद्धीवर येईपर्यंत मी देवीलोकातच भ्रमण करत होते. प्रसुतीनंतर वैद्यांनी माझ्याकडे जिज्ञासेने साधनेविषयी विचारणा केली आणि आश्रमात येण्याची इच्छा व्यक्त केली आणि म्हणाले, ‘‘तुम्हा लोकांकडे बघून वेगळे वाटते. तुम्ही किती छान जीवन जगत आहात.’’
२ आ. रुग्णालयातील परिचारिका म्हणायच्या, ‘‘तुमच्या खोलीत आल्यावर मनाला वेगळी शांती मिळते आणि प्रसन्न वाटते.’’ त्यांच्या समवेत स्वच्छता करण्यास येणार्या कर्मचारी महिला म्हणायच्या, ‘‘तुमच्या खोलीत स्वच्छता करतांना आम्हाला वेगळाच आनंद मिळतो.’’
३. जन्मानंतर
३ अ. पहिला मास – जन्मल्यावर बाळ अतिशय आकर्षक दिसणे अन् बाळाच्या अंगावर सोनेरी-चंदेरी दैवी कण दिसणे : बाळाचा जन्म झाल्यावर ते अतिशय आकर्षक आणि चपळ दिसत होते. बाळाच्या तोंडवळ्यावर, तर कधी अंगावर सोनेरी-चंदेरी दैवी कण दिसत होते. बाराव्या दिवशी नामकरण पूजा विधी करत असतांना बाळ अतिशय शांत होते.
३ आ. दुसरा मास – गुरुदेवांच्या जन्मदिनानिमित्त झालेला सोहळा शांतपणे ऐकणे आणि कुठलाही त्रास न देता झोपणे अन् त्या वेळी अन्वी ध्यानातच असल्याचे जाणवणे : उपाय करतांना आणि आवरण काढतांना अन्वी अगदी शांत रहाते अन् एकटक बघते. या मासात गुरुदेवांच्या जन्मदिनानिमित्त झालेला सोहळा तिने शांतपणे ऐकला. चि. अन्वी शांत झोपली होती. तेव्हा तिच्याकडे बघून वाटायचे, ‘ती ध्यानातच आहे.’ सोहळा संपल्यावर परत तिच्या हालचाली चालू झाल्या.
३ इ. तिसरा मास – पू. अशोक पात्रीकरकाका साधकांशी बोलत असतांना त्यांच्या बोलण्यावर हुंकार देणे आणि त्या वेळी पू. काकांचे बोलणे ऐकत असल्याचे जाणवणे : एकदा पू. अशोक पात्रीकरकाका दिवसभर आमच्या घरी होते. तेव्हा पू. काका साधकांशी बोलत असतांना ती पू. काकांकडे एकटक बघत त्यांच्या बोलण्यावर हुंकार देत होती. ‘त्या वेळी ती जणू पू. काकांचे बोलणे ऐकत आहे’, असे जाणवले.
३ इ १. तिला प्रथमच देवदर्शनाला देवळात घेऊन गेलो. तेव्हा ती रेणुकामातेच्या मूर्तीकडे एकटक बघत होती. त्या वेळी ‘ती देवीशी बोलत आहे’, असे वाटत होते.
३ इ २. नामजपाचे यंत्र आणि भजनाची ध्वनीफित (टेप) यांकडे बघून ती हसते. भजनांचा किंवा नामजपाचा मोठा आवाज असला तरी, ती शांत झोपते. इतर कुठलाही आवाज झाल्यास लगेच उठते.
३ ई. सहावा मास – नामजप होईपर्यंत शांत रहाणे : या मासात कोरोनासाठी प्रतिबंधक नामजप करायला सांगितला होता. तेव्हा आमचा नामजप होईपर्यंत चि. अन्वी शांत असायची. तिची झोपण्याची वेळ साडे आठ होती; परंतु ती त्या वेळी शांत राहून नामजप करू द्यायची. जप करतांना बराच वेळ ती मांडीवर बसून रहायची.
– सौ. आनंदी वानखडे (चि. अन्वीची आई)
३ उ. सातवा मास – सहनशील असणे : चि. अन्वी पुष्कळ सहनशील आहे. एकदा तिच्या पोटात दुखत होते. उन्हाळ्याचा त्रास आणि उलटीही झाली होती, तरीसुद्धा ती हसतच समोरच्याला प्रतिसाद द्यायची. – श्री. अमोल वानखडे
(चि. अन्वीचे बाबा)
३ ऊ. आठवा मास
३ ऊ १. परिस्थिती स्वीकारणे : या मासात ती सकाळी चार वाजताच उठायची. जणू ती मला जप करायला उठवायची. तिला भूक लागल्यावर ती आवाज करून हुंकार काढून सांगते. मी जर कुठल्या कामात असेन किंवा तिला घ्यायला मला उशीर झाला, तर ती शांत रहाते.
३ ऊ २. देवाची आवड : अंघोळ झाल्यानंतर मी तिला सिद्ध करून देवघरात दर्शनाला घेऊन जाते. त्या वेळी ती श्री भवानी आईच्या चरणांवरचे फूल हातात घेते आणि बाकी सर्व देवतांकडे दृष्टी फिरवत हसते.
३ ए. नववा मास
३ ए १. गुरुपौर्णिमा प्रवचनाची सेवा करत असतांना शांत रहाणे : मी गुरुपौर्णिमेच्या प्रवचनाची सेवा करत असतांना ती १ ते १.३० घंटा शांत रहायची. मला तिने सेवेत किंवा व्यष्टी आढाव्यात कधी अडथळा आणला नाही.
३ ए २. चि. अन्वी झोपेतून हसतच उठते. उठल्यावर गुरुदेवांच्या छायाचित्राकडे वळून बघते. दोन्ही हात जोडून नमस्कार करते आणि हसून संवाद साधण्याचा प्रयत्न करते.
३ ऐ. दहावा मास
३ ऐ १. तिच्या हसर्या तोंडवळ्याकडे पाहिल्यावर माझा सर्व थकवा निघून जातो आणि मन आनंदी अन् उत्साही होते.
३ ऐ २. लस घेतांना ती शांत रहाणे आणि तिला पाहून इतर मुलांनीही रडणे थांबवणे ः या मासात तिला लस द्यायला घेऊन गेले. इतर मुले लस घेण्यापूर्वीच रडायची; परंतु ती शांत होती. ती रडली नाही. याउलट ती रडणार्या मुलांकडे बघायची, तेव्हा ती मुलेसुद्धा तिच्याकडे बघून रडणे थांबवायची.’
– सौ. आनंदी वानखडे (चि. अन्वीची आई)
३ ओ. चि. अन्वीला घेतल्यावर भाव जागृत होऊन नामजप करण्याची आठवण होणे : अन्वीला घेतल्याने पुष्कळ हलकेपणा जाणवतो. मी तिला घेऊन फिरते, तेव्हा माझा पुष्कळ भाव जागृत होतो आणि आपोआपच नामजप करायची आठवण होते. तिचा सहवास हवाहवासा वाटतो. तिला प्रार्थना करायला सांगितल्यावर ती हसून लगेच हात जोडते आणि प्रार्थना पूर्ण होईपर्यंत शांत रहाते. – सौ. महानंदा चोरे (चि. अन्वीची आजी, अन्वीच्या आईची आई)
४. चि. अन्वीच्या सहवासात शिकायला मिळालेली सूत्रे
४ अ. अन्वीला अंघोळ घालणे, मर्दन करणे या कृती करतांना आपोआपच गुरुदेवांशी बोलले जाणे आणि त्यामुळे त्या कृती भावपूर्ण होणे : अन्वीला अंघोळ घालणे, मर्दन करणे, जेवण भरवणे या कृती करतांना आपोआपच माझे गुरुदेवांशी बोलणे व्हायचे. त्यामुळे त्या कृती भावपूर्ण व्हायच्या. एखाद्या दिवशी जर मी भाव ठेवण्यात न्यून पडले, तर पुष्कळ चुका व्हायच्या, उदा. अन्वी लवकर झोपायची नाही किंवा अंघोळ घालतांना तिला काहीतरी लागायचे. त्यानंतर तिची क्षमायाचना करण्यासाठी कान पकडल्यावर ती स्मितहास्य करायची, जणू ती मला क्षमा करत आहे.
४ आ. अन्वीकडे पाहिले किंवा तिला घेतले, तरी मनावरील सर्व ताण निघून जाणे : जेव्हा माझ्या मनात नकारात्मक विचार यायचे किंवा मला परिस्थिती स्वीकारता यायची नाही. तेव्हा तिच्याकडे पाहिले किंवा तिला घेतले, तरी मनावरचा सर्व ताण निघून जायचा.
४ इ. कधी कधी त्रासामुळे देवाला अपेक्षित असे साधनेचे प्रयत्न होत नसल्याचे वाटणे आणि अन्वीत गुरुमाऊलींचे रूप दिसल्याने मनाची नकारात्मकता जाऊन देवाने आनंदी करणे : कधी कधी त्रासामुळे मला वाटायचे, ‘देवाला अपेक्षित असे साधनेचे प्रयत्न माझ्याकडून होत नाहीत. असे वाटून मन दुःखी व्हायचे; परंतु काही क्षणांनी चि. अन्वीत गुरुमाऊलींचे रूप दिसायचे आणि मनाची नकारात्मकता जाऊन देव मला आनंदी करायचा. पूर्वी नकारात्मक विचारांत माझा दिवस जायचा. त्यामुळे मी अस्वस्थ व्हायचे; परंतु ती आल्यापासून देवाने मला सकारात्मक केले. परिस्थितीतील आनंद घ्यायला शिकवले. त्यासाठी गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.
– सौ. आनंदी अमोल वानखडे (चि. अन्वीची आई), अमरावती
५. अनुभूती
चि. अन्वीच्या लिखाणाचे संकलन करतांना मला देवीच्या गुणांचे वर्णन करत असल्याचे जाणवत होते.’ – श्री. लहू खामणकर, यवतमाळ