ऊसाला पहिली उचल ३ सहस्र ३०० रुपये द्यावी ! – राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना
जयसिंगपूर, २० ऑक्टोबर – उसाला पहिली उचल ३ सहस्र ३०० रुपये (प्रतिटन ३ सहस्र ३०० रुपये दर द्यावा.) द्यावी. पहिल्या टप्प्यात विनाकपात एकरकमी किमान मूल्य भावाची रक्कम देण्यात यावी. उर्वरित रक्कम जानेवारीपर्यंत न दिल्यास साखर कारखान्यांचा चालू हंगाम बंद करण्याची चेतावणी ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’चे माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे. ते जयसिंगपूर येथे २० व्या ऊस परिषदेत बोलत होते.
१. साखरेला दर असूनही त्याचे तीन तुकडे करण्याचे कारस्थान सरकार करत आहे. या प्रकरणी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी प्रसिद्धीपत्रक काढणे आवश्यक होते; मात्र त्यांनी तसे काही केले नाही.
२. या प्रकरणी कारखाने पहिल्यांदा नीती आयोगाकडे गेले. त्यांनी एकरकमी किमान मूल्य भाव परवडत नसल्याचे सांगितले. यामुळे तो विभागून देण्याची मागणी केली. यावर नीती आयोगाने नोंद घेऊन समिती नेमली आणि अहवाल सिद्ध करण्यास सांगितले. यानंतर नीती आयोगाने साखरेचा किमान मूल्यभाव विभागून देण्यास संमती दिली. याला राज्य सरकारनेही मान्यता दिली. वास्तविक राज्य सरकारने याविषयी आमच्याकडे विचारणा करणे आवश्यक होते; मात्र त्यांनी तसे केले नाही.
३. सरकार जर पैसे नाही असे म्हणते, तर सरकारी कर्मचार्यांना महागाई भत्ता कसा दिला गेला ? त्यामुळे येणार्या दिवाळीत मंत्र्यांचे काळे झेंडे घेऊन स्वागत करा. त्यांची दिवाळी गोड होऊ देऊ नका. महाविकास आघाडीने पूरग्रस्त, वीजग्राहक, ऊस उत्पादक यांची फसवणूक केली आहे; त्यामुळे आघाडी समवेत राहायचे कि नाही ? याचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे.