ईश्वरप्राप्तीच्या तीव्र तळमळीमुळे बासरीवादनातून संतपद प्राप्त केलेले सुप्रसिद्ध बासरीवादक पुणे येथील पू. पंडित केशव गिंडे (वय ८० वर्षे) !
‘२० ऑक्टोबर २०२१ या दिवशीच्या भागात श्रीचित्शक्ति् (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी साधलेल्या संवादातून पू. पंडित केशव गिंडे यांना बासरीवादनाची आवड कशी निर्माण झाली ? पंडित पन्नालाल घोष यांचे बासरीवादन ऐकून त्यांची भावजागृती होऊन त्यांच्यासारखी बासरी वाजवायला शिकण्याचा ध्यास कसा निर्माण झाला ? त्यासाठी त्यांनी तळमळीने कसे प्रयत्न केले ? आणि त्यांच्या आध्यात्मिक प्रवासातील काही भाग पाहिला. या भागात ‘ईश्वराची अनुभूती घेण्यासाठी पू. पं. केशव गिंडे यांनी कसे प्रयत्न केले ?’, ते पाहूया.’ – कु. तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) (संगीत विशारद), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.
(भाग २)
भाग १ पहाण्यासाठी येथे क्लिक करा ः https://sanatanprabhat.org/marathi/520532.html
सुरांमधून देवाची प्राप्ती होण्यासाठी ‘ईश्वरासाठीच करत आहे’, असा भाव ठेवून सूर आळवायला हवेत, तरच आपण परमेश्वरप्राप्ती साध्य करू शकतो. नाहीतर शेवटी ‘नरजन्मा येऊन काय मिळवले ?’, असे वाटेल. – श्रीचित्शक्ति् (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ |
२ आ. प.पू. क्षीरसागर महाराज (पारनेर, नगर) यांच्याशी झालेली भेट !
२ आ १. चिंचवडच्या मोरया गोसावी यांच्या समाधीस्थानी बासरीवादनाची सेवा करायचे ठरवणे; परंतु ते विसरून जाणे, मोरया गोसावींनी स्वप्नदृष्टांताद्वारे त्याची आठवण करून दिल्यावर तिथे जाण्यात अडचणी येणे आणि प.पू. क्षीरसागर महाराज यांना त्याविषयी सांगितल्यावर त्यांनी उपाय सांगणे : एकदा मी चिंचवडच्या मोरया गोसावी यांच्या समाधीस्थानी दर्शनाला गेलो होतो. तेव्हा ‘आकाशवाणीवर बासरीवादनासाठी निवड झाली, तर येथे येऊन बासरीवादनाची सेवा करूया’, असे मी मनातच म्हणालो आणि पुढे ते विसरून गेलो. काही दिवसांनी पहाटेच्या वेळी मोरया गोसावी यांनी स्वप्नात दर्शन देऊन त्यांच्यासमोर करणार असलेल्या बासरीवादनाची मला आठवण करून दिली. त्यानंतर मी तिकडे सेवेसाठी जायचे ठरवले की, मला घंटाभर आधी ३-४ पर्यंत ताप यायचा आणि जाणे रहित करावे लागायचे. असे ३-४ वेळा झाले. वर्ष १९८१ मध्ये माझी प.पू. क्षीरसागर महाराज यांच्याशी भेट झाली. मी त्यांना माझी ही अडचण सांगितली. तेव्हा त्यांनी मला सांगितले, ‘‘तुम्ही माझ्या कानावर घातले आहे. मी त्यांच्या (मोरया गोसावींच्या) कानावर घालतो. आता तुम्हाला काळजी करायचे काही कारण नाही. तुम्ही आता तुमच्या कुलदेवीची १००८ तुळशीपत्रांनी पूजा करा आणि त्यानंतर तुम्ही तेथे जाऊन वादन करा, म्हणजे हे सगळे निर्विघ्नपणे पार पडेल.’’
२ आ २. प.पू. क्षीरसागर महाराज यांनी साधनेत येणारे अडथळे आणि त्यांवर मात करण्यासाठीचे उपाय सांगून ‘भगवान दत्तात्रेयांचे दर्शन बासरीच्या माध्यमातूनच होणार आहे’, असे सांगणे
पू. पंडित केशव गिंडे : त्यानंतर प.पू. क्षीरसागर महाराज मला म्हणाले, ‘‘माझ्यासमोर येऊन बसा.’’ त्यांनी ‘मला काय अनुभव येतात ? माझी प्रगती कशी होत आहे ? मी साधनेत कुठे थांबलो आहे आणि मला साधनेत येणार्या अडचणी’ इत्यादींविषयी जवळजवळ १५ मिनिटे मला सांगितले. माझ्या प्रश्नांची उत्तरेसुद्धा त्यांनीच दिली. मग ते मला म्हणाले, ‘‘आता तुम्हाला काय विचारायचे आहे, ते विचारा.’’ तेव्हा मी त्यांना विचारले, ‘‘महाराज, आपणास भगवान दत्तात्रेयांचे दर्शन झाले आहे. मला ते होईल का ?’’ मग ते म्हणाले, ‘‘अजून काय विचारायचे आहे ?’’ मी म्हणालो, ‘‘मी ही बासरी वाजवत आहे; पण त्यात माझी काहीच प्रगती होत नाही. या ६ आणि ७ छिद्रांच्या बासरीतसुद्धा मला काही त्रुटी जाणवतात. त्या दूर केल्याविना मला चैन पडत नाही. त्यामुळे मी ‘बासरी सोडून द्यावी’, असा विचार करत आहे; कारण त्यासाठी मला २-४ घंटे द्यावे लागतात. त्यापेक्षा ध्यानधारणा आणि नामस्मरण यांना वेळ दिला, तर कसे होईल ?’’ त्यांनी दोन मिनिटे डोळे मिटले आणि म्हणाले, ‘‘तुम्हाला भगवान दत्तात्रेयांचे दर्शन हवे आहे ना ? ती भेट निश्चितच होईल आणि ती बासरीच्या माध्यमातूनच होईल. मी प्रतिवर्षी कार्तिक मासात ८ दिवस गाणगापूरला जातो. तिथे माझे परम गुरु श्री नृसिंह सरस्वती यांच्यासमोर तुम्ही बासरी वादन करा. ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. मी त्यांना तशी करुणा भाकतो (त्यांना प्रार्थना करतो).’’
२ आ ३. गाणगापूरला श्री नृसिंह सरस्वती यांच्यासमोर सलग ६ वर्षे बासरीवादन आणि श्री रामरक्षेचे अनुष्ठान केल्यावर बासरीतील अमूल्य ज्ञान होणे
पू. पंडित केशव गिंडे : वर्ष १९८१ पासून माझी गाणगापूरला श्री नृसिंह सरस्वती यांच्यासमोर बासरीवादन सेवा चालू झाली. त्या सेवेत मी पहाटे ३.३० वाजता बासरीवादन करायला आरंभ करायचो. प.पू. क्षीरसागर महाराज थंड पाण्याने अंघोळ करून सकाळी ६-६.३० वाजता काकड आरतीने पूजेला आरंभ करायचे. त्यानंतर घंटाभर, म्हणजे साधारण सकाळी ७.३०-८ वाजेपर्यंत मी बासरीवादन करायचो. अशा प्रकारे मी जवळजवळ ६ वर्षे सेवा केली. एकदा माझ्या बासरीवर एका छोट्या किटकाने भोक पाडले. ते मला ठाऊक नव्हते; पण मी ती बासरी वाजवल्यावर चांगली वाजली. पाहिले, तर ते मला बासरीवर छिद्र दिसले. ‘ते छिद्र मोठे करून पाहूया’, असा विचार देवानेच सुचवला आणि त्यातून पंचम (सप्तस्वरांतील पाचवा स्वर ‘प’) वाजायला लागला. या बासरीतून अती खर्ज (मंद्र सप्तकाहूनही खालचे स्वर) आणि अती तार (अती उंच पट्टीतील) असे स्वरही सहजतेने वाजवता येऊ शकतात. अशा प्रकारे मला माझ्या ‘केशववेणू’ (पू. गिंडे यांनी संशोधन केलेली बासरी) या बासरीचे ज्ञान झाले.
त्याच वर्षी प.पू. महाराजांनी मला श्रीरामरक्षेचे अनुष्ठानसुद्धा करायला सांगितले होते. ‘देवासमोर दिवा लावून शुद्ध प्रतिपदेला एकदा, द्वितीयेला दोनदा असे नवमीपर्यंत नऊ वेळा श्रीरामरक्षेचे पठण करायचे’, असे ते अनुष्ठान होते. ते मी आजपर्यंत करत आहे. त्या अनुष्ठानाच्या विधानात असे आहे की, ‘तुम्ही असे पठण केले, तर जगालाही गवसणी घालू शकता.’
२ आ ४. ‘केशववेणू’च्या नावावर तीन विक्रमांची नोंद होणे : या ‘केशववेणू’च्या नावावर ‘गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’, ‘लिम्का बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ आणि आता ‘गोल्डन बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ असे ३ विक्रम आहेत. माझ्या या संशोधनाची अनेक जणांनी नोंद घेतली आहे. ‘हे विश्वविक्रम होणे’, ही देवाचीच कृपा आहे. या विश्वविक्रम (‘वर्ल्ड रेकॉर्ड’) झालेल्या माझ्या संशोधनाची नोंद होणे, म्हणजे ‘जगाला गवसणी घालणेच’ आहे. यामुळेच मला अनेक सद्गुरूंच्या भेटीही झाल्या. हे श्रीरामरक्षेचे फळ आहे.’
वर्ष १९९९ मध्ये प.पू. क्षीरसागर महाराज यांनी देहत्याग केला. त्यानंतर मी गाणगापूरला जायचे बंद केले.
२ इ. शृंगेरी येथे शंकराचार्य भारतीतीर्थ यांची भेट आणि त्यांच्यासमोर केलेली वादनसेवा
पू. पंडित केशव गिंडे : वर्ष २००३ मध्ये आमच्या गुरुबंधूंनी एक सहल काढली आणि त्यांनी मला सांगितले, ‘‘आम्ही मोठ्या देवस्थानांमध्ये सेवा करत जाणार आहोत. तुम्ही येणार का ?’’ मी जायचे ठरवले. एकदा आम्ही संध्याकाळी शृंगेरी मठाचे शंकराचार्य भारतीतीर्थ यांच्याकडे गेलो. तेथे जो माणूस तबला वाजवत होता, त्याने शंकराचार्यांना सांगितले, ‘‘आम्ही (मी व माझे सोबती) बासरीवादनाची सेवा करू इच्छितो.’’ शंकराचार्यांनी अनुमती दिल्यानंतर आम्ही सेवेला बसलो. घंटा-दीड घंटा आम्हीच वाजवले; परंतु त्यामुळे इतरांच्या सेवा थांबल्या. त्यामुळे दुसर्या दिवशी त्यांना प्रथम सेवा करण्यास सांगितले; पण त्यांचे काहीतरी बेसूर झाले. त्यामुळे शंकराचार्यांनी त्यांना मध्येच थांबवून मला सांगितले, ‘‘तुम्ही या.’’ असे २-३ दिवस झाल्यानंतर शंकराचार्य मला उद्देशून म्हणाले, ‘‘ये ‘वेणू विद्वान’ हैं ।’’ (म्हणजे पू. पंडित केशव गिंडे ‘वेणू विद्वान’ आहेत.)
२ इ १. बासरीवादनाच्या शेवटच्या दिवशी शंकराचार्य भारतीतीर्थ यांनी १००-२०० लोकांमधून पू. पंडित केशव गिंडे यांना बोलावून शाल-श्रीफळ देऊन सत्कार करणे आणि ‘याच साधनेतून परमेश्वराचे दर्शन होणार आहे’, असे त्यांना सांगणे
पू. पंडित केशव गिंडे : बासरीवादनाच्या शेवटच्या दिवशी १००-२०० लोक होते. त्यांच्यात मी साधारणपणे दूर उभा होतो. तेवढ्या दुरूनही शंकराचार्यांनी मला बोलावले. मी त्यांच्यासमोर गेलो. तेव्हा ‘‘ये ‘वेणू विद्वान’ है ।’’, असे म्हणून त्यांनी शाल आणि श्रीफळ देऊन माझा सत्कार केला. ते म्हणाले, ‘‘तुमच्या बासरीवादनाने मी फार प्रसन्न झालो आहे.’’ (‘‘आपके बांसुरी वादन से हम बहुत प्रसन्न हैं ।’) त्यानंतर आमच्यात पुढील संवाद झाला.
शंकराचार्य भारतीतीर्थ : अजून काही विचारायचे राहिले आहे का ? (अभी कुछ रहा है क्या ?)
पू. पंडित केशव गिंडे : मी बासरीवादनाची सेवा करतो. यातून मला परमेश्वराचे दर्शन होईल का ?
शंकराचार्य भारतीतीर्थ : इतक्या सगळ्या लोकांमधून मी तुम्हालाच बोलावले. याचा अर्थ काय आहे ? (इन सब लोगोमें आपको ही बुलाया ना ! इसका क्या अर्थ है ?)
पू. पंडित केशव गिंडे : आपणच सांगावे. मी अज्ञानी आहे. (आप ही बोल सकते हो । मैं बहुत अनजान हूँ । )
शंकराचार्य भारतीतीर्थ : यावरूनच कळते की, ‘तुम्हाला ईश्वराचे दर्शन नक्कीच होईल.’ (आप इसमे ही समज लो की आपको दर्शन होगा ।)
पू. पंडित केशव गिंडे : याची प्रचीती मला केव्हा येईल ?
शंकराचार्य भारतीतीर्थ : मी तुम्हाला केवळ याच जन्मात ओळखत नाही, तर तुमच्या या आधीच्या अनेक जन्मांपासून मी तुम्हाला ओळखत आहे. यातच सर्वकाही आले. तुम्ही तुमची साधना चालू ठेवा, त्यातूनच सर्व होईल. (मैं आपको केवल इस जन्म मे नहीं जानता हूँ, इसके पहले बहुत जन्म मे आपको देख चुका हूँ और आपको जानता हूँ । इसमेही सब आ गया । आप अपनी साधना चालू रखिये, उसमेही सब हो जायेगा ।)
३. आपण केवळ नामस्मरण केल्याने गुरु आपल्या जीवनात आपोआप येत असणे
श्रीचित्शक्ति् (सौ.) अंजली गाडगीळ : तुमच्या जीवनामध्ये आध्यात्मिक गुरु पुष्कळ आणि आपणहून आले. प्रकृतीला आवश्यक असे गुरुतत्त्व येऊन त्यांचे आपल्याशी संवाद झाले.
पू. पंडित केशव गिंडे : तुम्ही केवळ नामस्मरण करत रहायचे. जीवनात गुरु आपोआप येतात. गुरुतत्त्व काय आहे ? परमेश्वर कधी गुरु होऊ शकत नाही; म्हणून त्याने सद्गुरु निर्माण केले. सद्गुरूंनी शिष्यांना सांभाळून त्यांचे हृदय, मन पूर्णपणे शुद्ध करायचे. हृदय, मन शुद्ध करायचे, म्हणजे तुमच्या मनात जे मायेचे विचार आहेत, ते काढून टाकायचे. मन पूर्णपणे विरक्त झाले पाहिजे. ‘वैराग्य म्हणजे कुणाविषयी असुया नाही आणि प्रेमही नाही’, अशा स्थितीत गेले पाहिजे. ते शुद्ध झाले की, मनात पोकळी निर्माण होते आणि परमेश्वर तेथे येऊन बसतो. तोपर्यंत तो बसत नाही. तो मन शुद्ध व्हायची वाट पहात रहातो.
४. पू. पंडित केशव गिंडे यांचे बासरीवादन सूक्ष्म स्तरावर परिणामकारक असल्यामुळे तो भेद केवळ सद्गुरूंच्याच लक्षात येऊ शकणे
श्रीचित्शक्ति् (सौ.) गाडगीळ : इतर लोकांनी बासरी वाजवणे आणि आपण बासरी वाजवणे यांतील भेद सर्वसामान्य लोकांच्या लक्षात आला होता का ?
पू. पंडित केशव गिंडे : जे आपल्यासारखे साधक आहेत किंवा गुरु आहेत, त्यांना हा भेद लक्षात येतो; कारण बाहेरून सर्व सारखेच दिसते. त्यातील बारकावे किंवा स्पंदने सद्गुरुच सांगू शकतात.
श्रीचित्शक्ति् (सौ.) गाडगीळ : स्वरांमध्ये एवढे सामर्थ्य आहे. यातून ‘साधकत्व आणि देवत्वाचे सामर्थ्य किती आहे ?’, हे लक्षात येते. हे म्हणजे देवत्व आणि स्वर यांचा सुवर्ण संगमच !
पू. पंडित केशव गिंडे : प.पू. दादाजी ठाकूर आहेत. त्यांना ‘माझ्यात (पू. पंडित केशव गिंडे यांच्यात) वेगळीच शक्ती आहे’, हे लक्षात आले. याविषयी मलाही काही ठाऊक नव्हते; पण ते दुसर्या कुणाला बासरी वाजवायला द्यायचे नाहीत. ते म्हणायचे, ‘‘बासरी वाजवायची असेल, तर पू. पंडित केशव गिंडेच पाहिजेत. त्यांच्या बासरीचा स्वर लागल्याविना वादनाला पूर्णत्व येत नाही.’’ हे जे सद्गुरूंच्या लक्षात येते, ते दुसर्या कुणाच्याही लक्षात येत नाही.
५. पू. पंडित केशव गिंडे यांनी संगीत साधनेविषयी केलेले मार्गदर्शन
५ अ. राग प्रसन्न होणे, म्हणजे त्या रागाची अनुभूती येणे, त्या रागाच्या स्वरांतून शक्ती आणि आध्यात्मिक बळ निर्माण झाल्यामुळे त्या स्वरांचा लोकांवर प्रभाव पडणे
श्रीचित्शक्ति् (सौ.) गाडगीळ : ‘राग प्रसन्न होतो’ म्हणजे काय होते ?
पू. पंडित केशव गिंडे :
५ अ १. रागाचा स्वर वाजवल्यावर शक्ती आणि आध्यात्मिक बळ निर्माण होणे अन् त्याचा प्रभाव इतरांवर पडणे : राग प्रसन्न होतो, म्हणजे त्या रागातील संपूर्ण बारकाव्यांसह तुम्हाला त्या रागाची अनुभूती येते. तुम्ही पहिला स्वर लावला की, तो राग तुमचे मन आणि चित्त यांवर नियंत्रण मिळवतो. त्या वाद्याचा पहिला स्वर लावला की, एक आकर्षण निर्माण होते. आकर्षण म्हणजे त्या स्वरांचा लोकांवर प्रभाव पडतो. त्या स्वरांतून शक्ती आणि आध्यात्मिक बळ निर्माण होते.
५ अ २. राग ‘चालीसा’ वाजवल्यावर तो राग वाजवण्यातील शक्ती नंतर उरलेल्या सगळ्या रागांत येत असणे
श्रीचित्शक्ति् (सौ.) गाडगीळ : काका, आता तुम्ही जे बारकावे सांगत आहात, ते या काळात कुणाला ठाऊकच नसतील. लोकांना केवळ वाद्य वाजवणे, एवढेच ठाऊक आहे.
पू. पंडित केशव गिंडे : वाद्य नुसते वाजवून चालत नाही. एक राग ४० दिवस सलग वाजवण्यात जी शक्ती आहे, तीच शक्ती नंतर उरलेल्या सगळ्या रागांत येते.
श्रीचित्शक्ति् (सौ.) गाडगीळ : अलीकडे ईश्वरासाठी वाजवण्याचा भाग अल्प झाला आहे आणि आता लोकांमध्ये तेवढी चिकाटीसुद्धा नाही. लोकांना हे काहीच ठाऊक नाही.
पू. पंडित केशव गिंडे : परमेश्वरासाठी वादन करणे आणि सामान्य माणसासाठी वाजवणे यांत पुष्कळ भेद आहे.
६. अनुभूती
६ अ. वर्ष २००४ मध्ये गाणगापूरला बासरीवादनाच्या कार्यक्रमासाठी गेल्यावर चतुर्थीच्या दिवशी वादन चालू असतांना एक उंचीपुरी विभूती समोर येऊन बसणे, तिने वादनाला दाद देऊन ‘महाराज तुमच्यावर फार प्रसन्न आहेत’, असे सांगणे आणि नंतर तिने चरणांवर मस्तक ठेवून नमस्कार ठेवण्यास अनुमती देणे : वर्ष २००४ मध्ये मला गाणगापूरला बासरीवादनासाठी बोलावणे आले होते. माघ कृष्ण पक्ष चतुर्थीच्या दिवशी पहाटे आम्ही वादनाला बसलो आणि अर्ध्या पाऊण घंट्याने भगव्या रंगाचे दुटांगी धोतर नेसलेली, वरती राखाडी रंगाचा स्वेटर, थोडीशी कुरळी दाढी, वय साधारण ३० वर्षे आणि उंची साधारण सात साडेसात फूट अशी एक व्यक्ती माझ्यासमोर येऊन बसली. ती अजानबाहू (दोन्ही हात गुडघ्यापर्यंत असलेली व्यक्ती) होती. मी डोळे बंद करून वादन करत होतो. ती व्यक्ती मधूनमधून ‘वा ऽ वा ऽ ! आज महाराज प्रसन्न आहेत’, असे म्हणत होती. आम्ही अर्धा ते पाऊण घंटा राग ‘बिहारी’ वाजवला. त्यानंतर काही भजने वाजवली आणि नंतर ‘धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची…’, ही आरती वाजवायला घेतली. ती वाजवत असतांना ते डोलायला लागले. आम्ही वादन संपवल्यावर ते म्हणाले, ‘‘अहो, महाराज तुमच्यावर फार प्रसन्न आहेत.’’ मी त्यांना म्हणालो, ‘‘तुमचा चरणस्पर्श पाहिजे. तो देऊ शकाल का ?’’ विभूती म्हणाली, ‘‘मी कुणाचा स्पर्श करून घेत नाही.’’ मी पुन्हा म्हणालो, ‘‘आम्हाला दर्शन हवे आहे.’’ तेव्हा ते आमच्या दर्भासनाच्या मध्ये येऊन माझ्या तबलजींसमोर (श्री. नंदकुमार तिवारी यांच्यासमोर) उभे राहिले. त्यांनी नंदकुमारजींना दर्शन दिले. (श्री. नंदकुमार तिवारी माझ्या समवेत गेली २५ वर्षे साथीला येतात. ते त्रिकाल स्नान-संध्या करतात आणि स्नान-संध्या केल्याविना कुठलीच गोष्ट करत नाहीत. त्या मानाने मी थोडा अल्प कर्मठ आहे.) त्यांच्याकडे मोठे चांदीचे तबक होते. त्यात भरपूर तुळशी, बेल, अष्टगंध इत्यादी चांदीच्या वाट्यांत घेऊन ते उभे राहिले. त्यांनी नंदकुमारजींना फुले आणि अक्षता दिल्या. नंदकुमारांचे दर्शन झाल्यावर ते माझ्याकडे वळले आणि अष्टगंधाची सगळी वाटी मोकळी केली. त्यांनी मला लावलेले ते अष्टगंध टपटप माझ्या अंगावर पडले. नंतर त्यांनी मला फुले आणि बेल दिला अन् म्हणाले, ‘‘चरणांवर डोके ठेवा.’’ मी त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवले. त्यानंतर ते तिथून निघून गेले.
नंतर आम्ही जाऊन पाहिले, तर ‘कुठे कोण ? कुणीच नव्हते !’ माघ कृष्ण चतुर्थीला आम्हाला हे दर्शन झाले. दर्शन झाल्यानंतर आम्ही ज्या ठिकाणी उतरलो होतो, त्या गोविंदगुरुजींना आम्ही त्या विभूतीचे वर्णन सांगितले. तेव्हा गोविंदगुरुजी म्हणाले, ‘‘इथे अशी कुणी व्यक्ती नाही. तुम्ही केलेल्या सर्व वर्णनावरून ते ‘महास्वामी’ (म्हणजे चिदंबर स्वामी) असावेत.’’
६ आ. एका व्यक्तीच्या तुटलेल्या बोटात ३५ वर्षे शक्ती नसणे, पू. पंडित केशव गिंडे यांनी बनवून दिलेली खर्ज्याची बासरी वाजवण्यास आरंभ केल्यापासून त्या बोटात शक्ती येणे : एका व्यक्तीचे बोट तुटल्यामुळे त्यातील शक्ती गेली होती. ती व्यक्ती जवळजवळ ३५ वर्षे ते बोट वापरत नव्हती. मी त्यांना एक मासापूर्वी बासरी करून दिली होती. आज त्या व्यक्तीचा दूरभाष आला होता. तिने सांगितले, ‘‘तुमच्याकडून घेतलेली खर्ज्याची बासरी वाजवण्याचा सराव केल्याने त्या बोटात शक्ती आली आहे.’’
७. अलीकडच्या संगीत कलाकारांसाठी पू. पंडित केशव गिंडे यांनी केलेले दिशादर्शन
श्रीचित्शक्ति् (सौ.) गाडगीळ : कलाकारांमध्ये लोकेषणा आणि विकृती येत आहे; म्हणून त्यांना आध्यात्मिक मार्गदर्शनाची अत्यंत आवश्यकता आहे.
पू. पंडित केशव गिंडे : पैसा, प्रसिद्धी, पुरस्कार आदी सर्वांपासून दूर जाऊन पूर्णपणे परमेश्वर प्राप्तीसाठी संगीत केले, तरच त्यातून आत्मिक समाधान, आनंद आणि परमेश्वरप्राप्ती होऊ शकेल; अन्यथा काहीही होऊ शकणार नाही.
श्रीचित्शक्ति् (सौ.) गाडगीळ : हे मात्र खरे आहे काका ! आजच्या पिढीला जे सांगायला हवे होते, ते तुम्ही एका वाक्यात सांगितले. (समाप्त)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |