‘मिथिनेल’च्या निर्मितीसाठी केंद्रशासन साखर कारखान्यांना निधीची तरतूद करणार ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा
राज्यातील साखर कारखान्यांच्या विविध प्रश्नांविषयी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी घेतली केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांची भेट !
मुंबई – साखर कारखान्यांमध्ये ‘मिथिनेल’चे प्रकल्प चालू झाल्यास साखर कारखान्यांना लाभ होईल; मात्र त्यासाठी भांडवल नाही. ‘मिथिनेल’च्या निर्मितीसाठी तेल आस्थापनांशी ठराव करण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी केंद्रशासन निधी उपलब्ध करून देईल. यामुळे साखर कारखान्यांच्या भांडवलाचा प्रश्नही सुटेल, असे वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. राज्यातील साखर कारखान्यांच्या विविध समस्यांविषयी देवेंद्र फडणवीस यांसह भाजपचे नेते रावसाहेब दानवे, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील यांनी १९ ऑक्टोबर या दिवशी केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.
या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘मागील २-३ वर्षांत राज्यातील साखर कारखाने अडचणीत आले आहेत. आर्थिक संकटात असलेल्या साखर कारखान्यांचा पुनर्विकास होणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात भेदभावाचे राजकारण चालू आहे. केवळ सत्तापक्षातील नेत्यांच्या साखर कारखान्यांना नियमबाह्य साहाय्य केले जात आहे. राज्यातील शेतकरी ऊसासाठी एकरकमी ‘एफ्आर्पी’ (ऊसाला देण्यात येणारा लाभदायी दर. एकूण उत्पादनासाठी येणारा व्यय आणि त्यावर १५ टक्के नफा, अशा प्रकारे न्यूनतम उसासाठीची रक्कम शासनाने कायदा करून निश्चित केली आहे.) मिळावा, अशी शेतकर्यांची मागणी आहे. राज्यात काँग्रेसचे शासन असतांना आणि शरद पवार हे केंद्रीय कृषीमंत्री असतांना याविषयीचा कायदा झाला आहे. त्यानुसार शेतकर्यांच्या ऊसाला दर मिळायला हवा.’’