५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली फार्मागुडी, फोंडा (गोवा) येथील चि. शिवाली (सात्त्विका) अजय पाटील (वय ४ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. शिवाली (सात्त्विका) अजय पाटील ही एक आहे !
‘फार्मागुडी, फोंडा (गोवा) येथील येथील चि. शिवाली (सात्त्विका) अजय पाटील हिचा आज आश्विन कृष्ण पक्ष प्रतिपदा (२१.१०.२०२१) या दिवशी चौथा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तिच्या आई-वडिलांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
चि. शिवाली (सात्त्विका) अजय पाटील हिला सनातन परिवाराच्या वतीने चौथ्या वाढदिवसानिमित्त अनेक शुभाशीर्वाद !
१. जन्मापूर्वी
१ अ. देवघरातील शंखावर पिंजर आलेली पाहून ‘देवीचे रूप जन्माला येणार’, असे वाटणे : ‘ज्या दिवशी ‘मी गरोदर आहे’, हे मला समजले, त्याच दिवशी सकाळी देवपूजा झाल्यावर नुकत्याच धुऊन ठेवलेल्या शंखावर पिंजर आली. तेव्हा मला वाटले, ‘देवीचेच रूप जन्माला येणार आहे.’
१ आ. पहिल्या आणि दुसर्या मासात श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याविषयीची स्वप्ने पडणे : पहिल्या मासात मला सतत श्रीचित्शक्ति गाडगीळकाकू (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ) आणि श्रीसत्शक्ति बिंदाताई (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ) या दोघींविषयी स्वप्ने पडत असत. मला सतत ‘मी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकू यांच्या समवेत दौर्यावर आहे’, असे दिसायचे. काही वेळा मला दिवसाही स्वप्ने पडत.
१ इ. स्वप्नात श्रीचित्शक्ति(सौ.) अंजली गाडगीळ यांच्या समवेत दैवी दौर्यावर गेल्याचे दिसणे, एका डोंगरावर गेल्यावर अनेक पिंडी वर आलेल्या दिसणे, तेथे दत्तगुरु प्रगट होणे आणि त्यांच्या सांगण्यानुसार श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी आशीर्वादस्वरूप एक पिंडी देणे : एकदा मला स्वप्न पडले, ‘मी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकू यांच्या समवेत दौर्यावर गेले आहे. महर्षींच्या आज्ञेनुसार श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकू एके ठिकाणच्या छोट्या डोंगरावर गेल्या आहेत. तेव्हा तेथे अनेक पिंडी वर आल्या. त्यांचे दर्शन घेत असतांनाच तेथे दत्तगुरु प्रगट झाले. ते श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकूंना म्हणाले, ‘सुप्रियावर कृपा करा आणि तिला आशीर्वाद द्या.’ त्या वेळी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकूंनी तेथील एक पिंडी मला दिली.’
१ ई. गर्भारपणी नामजपापेक्षा सेवा करायला आवडणे : गर्भारपणी मला नामजपापेक्षा सेवा करतांना वेगळाच हुरूप यायचा. कधी कधी ‘मी जेवले कि नाही ?’, याचेही मला भान नसायचे. ‘ही सेवेची सुवर्णसंधी आहे’, असे मला वाटायचे. त्यामुळे ‘किती मन लावून सेवा करू आणि किती नको ?’, असे मला व्हायचे.
१ उ. मधुमेह असतांनाही केवळ औषधांनी जखम बरी होणे : बाळाच्या जन्मापूर्वी माझ्या एका बोटाला ‘इन्फेक्शन’ झाले होते. मला मधुमेह असल्यामुळे ते काढण्यासाठी छोटे शस्त्रकर्म करावे लागणार होते; पण नेमके त्या वेळी आधुनिक वैद्यांना वेळ नसल्याने शस्त्रकर्म करता आले नाही आणि औषधांनीच माझी ती जखम बरी झाली.
२. जन्मानंतर
२ अ. जन्म झाल्यावर बाळाच्या २ भुवयांच्या मध्यभागी लाल रंगाचा गोल टिळा होता. अजूनही कधी कधी तो दिसतो.
२ आ. जन्म झाल्यापासून वडिलांचा आवाज ओळखणे आणि वडिलांनी घेतले की, शांत होणे : मी गरोदर असतांना बाळाचे वडील बेंगळुरूला नोकरीला होते आणि ते मासातून २ – ३ वेळा १ – २ दिवसांसाठी घरी यायचे, तरी जन्म झाल्याच्या पहिल्याच दिवसापासून बाळ तिच्या वडिलांचा आवाज ओळखत होते. ती रडायला लागल्यावर परिचारिका तिला घ्यायला यायची; पण बाळ तिच्याजवळ शांत होत नसे. बाळाच्या वडिलांनी तिला घेतले की, ती लगेच शांत होत असे.
३. जन्म ते ५ मास
३ अ. बोललेले समजणे
३ अ १. ‘शिवाली म्हणजे देवी आहे’, असा भाव ठेवण्यास पतीने सांगितल्यावर त्या भावाने प्रार्थना करणे, ती प्रार्थना समजल्याप्रमाणे शिवालीने हसणे आणि तसा प्रतिसाद देणे : चि. शिवालीला सांभाळतांना मी कधी कधी फार थकायचे. तेव्हा तिच्या वडिलांनी मला सांगितले, ‘‘तिला देवीचे रूप मानून तू तिच्यातील देवीतत्त्वाला शरण जा. ‘ती दुर्गादेवीच आहे’, असा भाव ठेव.’’ तसा भाव ठेवून मी तिचे पाय माझ्या कपाळाला लावायचे आणि ‘हे दुर्गामाते, हे भवानीमाते, मला आशीर्वाद दे. या बाळाला सांभाळायला तूच मला साहाय्य कर’, अशी प्रार्थना केल्यावर शिवाली लगेच हात वर करायची किंवा माझ्या डोक्यावर ३ वेळा हात मारून हसायची. ‘मी मनातून केलेली प्रार्थना तिला समजली होती’, असे भाव तिच्या डोळ्यांत आणि हसण्यात असायचे.
३ अ २. ‘भावजागृतीच्या विविध प्रयोगांपैकी कोणता प्रयोग करूया ?’, असे शिवालीला विचारल्यावर तिने त्यांतील एका प्रयोगाला ‘हूं हूं’, असा आवाज करून प्रतिसाद देणे : शिवाली ४ थ्या मासापासूनच परात्पर गुरुदेवांचे छायाचित्र ओळखते. त्यांचे नाव घेतले की, ती श्रीकृष्णाचे चित्र शोधत असे. परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्राकडे बघून ती कधी लाजत असे, कधी हात पुढे करून त्यांना बोलावत असे, तर कधी त्यांना हात लावण्याचा प्रयत्न करत असे. तिच्याशी बोलतांना मी तिला भावजागृतीचा प्रयोग विचारायचे, ‘‘श्रीकृष्णाला भेटायला जाऊया का कि त्याच्या समवेत खेळूया कि त्याची पाद्यपूजा करूया ?’ तेव्हा ती त्यांतील एकाला ‘हूं, हूं’, असा आवाज करून आणि हात-पाय हलवून प्रतिसाद द्यायची.
४. वय ६ ते १२ मास
४ अ. सहनशील : ती ६ मासांची असतांना तिचे पोट बिघडून तिला हगवण (डायरिया) लागली होती. त्याचा तिला पुष्कळ त्रास होत होता, तरी ती हसत-खेळत होती. ‘तिच्यात पुष्कळ सहनशीलता असून ती सतत वर्तमानात रहाते’, असे मला वाटते.
४ आ. आवाज मोठा असूनही त्यात माधुर्य जाणवणे : तिचा आवाज मोठा आहे; पण जेव्हा ती गाते किंवा बोलायचा प्रयत्न करते, तेव्हा तो आवाज कानांना मधुर जाणवतो. हा विरोधाभास आहे. आम्हालाही ‘हे असे कसे ?’, असे वाटते.
४ इ. ‘शिवाली एक वर्षाची असतांना तुळशीजवळ जाऊन नमस्कार करायची’, हे मला आमच्या शेजार्यांनी सांगितले.
४ ई. ती ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथातील प्रत्येक पान निरखून बघायची.’
– सौ. सुप्रिया पाटील (आई), फार्मागुडी, गोवा.
५. वय १ ते २ वर्षे
५ अ. उत्तम निरीक्षणक्षमता : ‘मी वास्तूशुद्धी करतांना शिवाली माझे निरीक्षण करत असते. मी घरी नसतांना ती न पेटवलेली उदबत्ती घेऊन घराच्या कोपर्यांत जाऊन वास्तूशुद्धी करते.
५ आ. व्यवस्थितपणा : ती पुस्तक चाळते, तेव्हा त्यांतील पाने व्यवस्थितपणे पालटते. तिने अजून एकही पुस्तक फाडले नाही किंवा कुठे फेकले नाही.
५ इ. उत्तम आकलनक्षमता : तिला वेगवेगळ्या भाषा समजतात. कामवाली मावशी हिंदीमध्ये बोलते किंवा आम्ही घरात अंिहराणी (मराठीतील एक भाषा) भाषेत बोलतो. ते सर्व तिला कळते.’
– श्री. अजय पाटील (वडील), फार्मागुडी, गोवा. (१०.१०.२०१९)
५ ई. निर्भय : ‘शिवालीला कशाचीही भीती वाटत नाही. पुष्कळ अंधारातही ती सहज चालत जाते.’ – सौ. सुप्रिया पाटील
५ उ. सात्त्विकतेची ओढ
१. ‘शिवालीला खेळण्यासाठी बाजारात बाहुली घ्यायला गेलो होतो. तेव्हा विचित्र रूपातील बाहुल्या दाखवल्यावर ‘ती बाहुली नको’, असे ती म्हणाली.
२. तिला सनातनचे सर्व ग्रंथ आवडतात.
५ ऊ. देवाची ओढ
१. घरातील व्यक्ती नामजपाला बसल्यावर शिवालीही देवघरात येऊन नामजपाला बसते आणि नामजप करते. ती कधी कधी खेळत-खेळत घरातील ध्यानमंदिरात जाऊन नामजप करत बसते.’ – श्री. अजय पाटील
२. ‘शिवाली झोपेत बर्याच वेळा नमस्कार करते. जणू झोपेत तिला कुणी देवता तिला दिसतात.
६. अनुभूती
अ. ‘शिवालीचा जन्म झाल्यावर आमच्या आर्थिक अडचणी न्यून झाल्या.
आ. घरातील माझे आई-वडील, इतर कुटुंबीय आणि आम्ही या सर्वांचे आरोग्य सुधारले.’
– श्री. अजय पाटील
७. स्वभावदोष
हट्टीपणा, मोठ्याने ओरडणे, मनाप्रमाणे हवे असणे आणि ‘स्वतःला प्राधान्य द्यायला हवे’, असे वाटणे’ – सौ. सुप्रिया पाटील (१०.१०.२०१९)