कुडाळ तालुक्यात अवैधरित्या वाळूचे उत्खनन करण्यासाठी बनवलेले ३९ ‘रॅम्प’ महसूल विभागाकडून उद्ध्वस्त
३९ ‘रॅम्प’ निर्माण होईपर्यंत महसूल विभागातील अधिकारी काय करत होते ?
(‘रॅम्प’ म्हणजे नदीतून काढलेली वाळू नदीच्या किनारी एकत्र करणे सोयीचे जावे, यासाठी केलेले बांधकाम)
कुडाळ – कुडाळ तालुक्यातील सोनवडे, वालावल, कवठी या गावांत कर्ली नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळूचे उत्खनन करण्यासाठी उभारण्यात आलेले एकूण ३९ रॅम्प तहसीलदार अमोल पाठक आणि त्यांच्या पथकाने उद्ध्वस्त केले. १८ ऑक्टोबरला ही कारवाई करण्यात आली.
कुडाळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळूचे उत्खनन आणि वाहतूक केली जात आहे. वाळूचे व्यावसायिक प्रशासनाला जुमानत नाहीत, तसेच दिवसाढवळ्या अवैधरित्या वाळूचे उत्खनन करून गोवा राज्यात वाळू पाठवली जाते. यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहेत, तरीही प्रशासन यावर कारवाई करत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदार पाठक यांनी १८ ऑक्टोबरला पूर्ण दिवस कारवाई करत सोनवडे येथे १४, वालावल येथे १२, तर कवठी येथे १३, असे एकूण ३९ रॅम्प उद्ध्वस्त केले.
याविषयी तहसीलदार पाठक म्हणाले, ‘‘आता रॅम्प उद्ध्वस्त केले आहेत. पुढील कारवाई वाळू काढण्यासाठी वापरल्या जाणार्या होड्यांवर केली जाईल अन् अवैधरित्या होणारे वाळूचे उत्खनन बंद करण्याचा प्रयत्न केला जाईल.’’
कारवाई स्वागतार्ह, तरीही संशयास्पद ! – मनसे
अवैधरित्या वाळूचे उत्खनन करणार्यांवर महसूल विभागाने केलेली कारवाई स्वागतार्ह आहे; मात्र वाळूचे उत्खनन करण्यासाठी वापरण्यात आलेल्या होड्या, तसेच येथे काम करणारे परप्रांतीय कामगार या कारवाईतून सुटल्याने ही कारवाई संशयास्पद आहे. महसूल विभागाचे काही अधिकारी आणि वाळू माफिया यांच्या संगनमतामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी केला आहे.