राज्याची आर्थिक स्थिती पूर्ववत् होण्यासाठी किमान ६ मास करभरणा असाच रहावा लागेल ! – राजगोपाल देवरा, प्रधान सचिव, वित्त विभाग
कोल्हापूर – राज्याची आर्थिक स्थिती सुधारत आहे. कराचा भरणा वाढत आहे. प्रत्येक वर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये हा भरणा वाढतो. आर्थिक स्थिती पूर्ववत् होण्यासाठी किमान ६ मास ही आवक अशीच रहावी लागेल. आर्थिक स्थिती सुधारत असल्यामुळेच जिल्हा नियोजन समितीतील ५० टक्के निधी व्ययाची अनुमती दिली आहे. याचा आढावा घेऊन हा निधी दिला जाईल, अशी माहिती वित्त विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीमध्ये आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
राजगोपाल देवरा पुढे म्हणाले, ‘‘तिसर्या लाटेची शक्यता होती; मात्र सध्यातरी संसर्ग दिसत नाही. म्हणून कोल्हापूरकरांनी मुखपट्टी वापरायचे सोडले आहे काय ? कोरोनासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. ‘वर्ल्ड बँके’ने काही रस्ते उंच आणि सिमेंटचे करण्याचे सुचवले होते. प्रत्यक्षात अधिक व्यय आणि स्थानिक स्थिती पहाता ते शक्य नाही. त्यामुळे सध्या तरी त्यांनी सुचवलेल्या उपायांना ‘जैसे थे’ ठेवले आहे.’’