५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चि. दीक्षा श्रीपाद सामंत (वय ४ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. दीक्षा श्रीपाद सामंत ही एक आहेत !

चि. दीक्षा सामंत

चि. दीक्षा सामंत हिची जन्मापूर्वी आणि जन्मानंतर तिची आई, तसेच अन्य नातेवाईक यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

१. जन्मापूर्वी

गरोदर असतांना काही त्रास न होणे आणि नेहमी सत्मध्ये रहाता येणे : ‘पहिल्या बाळंतपणात मला पुष्कळ काळजी घ्यावी लागली होती; परंतु या वेळी गर्भवती असतांना मला कोणताही त्रास झाला नाही. अगदी ९ व्या मासापर्यंत मी प्रवास आणि घरातील सर्व कामे करू शकत होते. या नऊ मासांमध्ये अनेक वेळा मला रामदासस्वामींच्या पादुकांचे दर्शन, तसेच त्यांचे पूजन करायला मिळाले. त्याचप्रमाणे भजने-कीर्तनेही ऐकायला मिळाली.

२. जन्मानंतर

२ अ. जन्म ते १ वर्ष

२ अ १. शांत स्वभाव : ‘चि. दीक्षा जन्मापासूनच पुष्कळ शांत आहे. दीक्षा अगदी लहान असतांना मला कामानिमित्त बाहेर जावे लागायचे. तेव्हा तिला सांभाळायला येणा‍र्‍या बाईंशी, तसेच ती सात मासांची झाल्यावर तिला पाळणाघरात ठेवावे लागले असतांना तेथेही तिने लगेच जुळवून घेतले.

२ अ २. अनेकदा तिच्या तोंडवळ्यावर सोनेरी आणि चंदेरी रंगाचे दैवी कण दिसत.’

– सौ. अदिती श्रीपाद सामंत (चि. दीक्षाची आई), मालाड, मुंबई.

२ आ. वय – १ ते २ वर्षे

२ आ १. सहनशील

२ आ १ अ. ‘डेंग्यू’ ताप आल्याने वरचेवर रक्ताची तपासणी करतांना सर्व शांतपणे सहन करणे : ‘एकदा दीक्षाला ‘डेंग्यू’मुळे ताप आला होता. २ – ३ दिवसांनी तिची रक्ताची तपासणी करावी लागत होती. तिने कधीही रडून त्रास दिला नाही. सर्व शांतपणे सहन केले.’ – सौ. अदिती श्रीपाद सामंत आणि श्रीमती अनुराधा आनंद माळगावकर (चि. दीक्षाची आजी (आईची आई)), सनातन संकुल, पनवेल.

२ आ १ आ. कितीही लागले, तरी थोडेसे रडून थांबणे आणि ‘औषध लावल्यावर बरे होईल’, असे दीक्षाने सांगणे : ‘एकदा तिला गरम ‘कूकर’ लागून पुष्कळ भाजले होते, तरीही ती थोडेसेच रडून थांबली. आम्ही तिचे सांत्वन करायला गेलो, तर ‘मला आता बरं वाटणार आहे. मला हे औषध लाव, म्हणजे बरे होईल’, अशा प्रकारे तीच आमची समजूत घालते.

सौ. अदिती सामंत

२ आ २. श्रीनाथजी येथे गेल्यावर श्रीकृष्णाचे दर्शन घेण्यासाठी पहाटे उठून सिद्ध होणे आणि डोळे भरून दर्शन घेऊन परत झोपी जाणे : दीक्षा सवा वर्षाची असतांना आम्ही राजस्थानमध्ये नाथद्वाराला, म्हणजे श्रीनाथजी येथे गेलो होतो. तिथे दिवसभरात श्रीकृष्णाचे आठ वेळा दर्शन असते. अगदी पहाटेच्या प्रथम दर्शनाच्या आधी (पहाटे ४ वाजता) उठून दीक्षा सिद्ध होत असे आणि दर्शनाला येत असे. प्रत्येक वेळी श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर उभे राहून डोळे भरून दर्शन घेतल्यावर ती परत झोपी जायची. पूर्ण प्रवासात प्रत्येक वेळी ती खाणे, झोपणे आदी आधीच पूर्ण करून घेऊन देवदर्शनासाठी वेळेत सिद्ध होई.’

– सौ. अदिती श्रीपाद सामंत

२ आ ३. दीक्षाचा तोंडवळा हसरा आणि डोळे बोलके असल्यामुळे ती इतरांना आपल्याकडे आकर्षित करून घेते.’ – श्रीमती अनुराधा माळगावकर आणि कु. योगिनी श्रीपाद सामंत, मालाड, मुंबई. (चि. दीक्षाची मोठी बहीण, वय ७ वर्षे)

२ इ. वय – २ ते ३ वर्षे

२ इ १. व्यवस्थितपणा : ‘दीक्षाला स्वतःच्या वस्तू जागेवर ठेवण्याची सवय आहे. मी तिची एखादी गोष्ट नीट जागेवर ठेवली नाही, तर ती मला त्याची जाणीव करून देते.

२ इ २. घरकामांत साहाय्य करणे : घरात पाणी किंवा इतर काही पडले असले, तर स्वतः कापड आणून पुसणे, जेवणाची सिद्धता करणे, कचरा काढणे इत्यादी घरातील कामे करायला दीक्षाला आवडतात. तिची निरीक्षणक्षमताही अत्यंत चांगली आहे. स्वयंपाकघरात येऊन ताक घुसळणे, पोळ्यांचे पीठ मळणे, पोळ्या लाटणे’ इत्यादी कृती ती स्वतः करण्याचा प्रयत्न करते.

२ इ ३. अभ्यासू वृत्ती : तिला शाळेत विलंबाने घातले होते. शाळेत आरंभी ‘कविता, गाणी पाठ करणे’, यांत पुष्कळ अडचण यायची; परंतु तरीही ती शाळेतील विविध उपक्रमांमध्ये प्रयत्नपूर्वक आनंदाने सहभागी होत होती. एकदा तिने अभ्यास केला नव्हता आणि तिची कविताही पाठ होत नव्हती. तेव्हा दुपारी झोपून उठल्यावर ती मला म्हणाली, ‘‘आई, आज साईबाबा मला ‘अभ्यास करत नाहीस’, असे म्हणून ओरडले.’’ (आमच्या घरातील साईबाबांच्या चित्राविषयी ती बोलत होती.)

– सौ. अदिती श्रीपाद सामंत

२ इ ४. स्वावलंबी : ‘दीक्षा ‘स्वतःच्या हाताने जेवणे, कपडे स्वतः घालणे, केस विंचरणे’ या कृती करण्याचा प्रयत्न करते.

२ इ ५. उंची वाढण्यासाठी स्वतःहून उंच उड्या मारणे : ‘दीक्षाचे वजन आणि उंची वयाच्या मानाने अल्प आहे’, असे आमचे बोलणे झाले. त्यानंतर ‘उड्या मारल्यावर उंची वाढते’, हे तिला कळले. त्या दिवसापासून तिने उंची वाढवण्यासाठी स्वतःहून उंच उड्या मारण्यास चालू केले. ‘देवघरातील गणपतिबाप्पाची पूजा करायची आहे. त्यामुळे मला माझी उंची वाढवायची आहे’, असे ती सांगते.’

– सौ. अदिती श्रीपाद सामंत आणि श्री. श्रीपाद अरुण सामंत (चि. दीक्षाचे आई-वडील)

श्री. श्रीपाद सामंत

२ इ ६. प्रेमभावामुळे इतरांचा विचार करणे : ‘मी जर रडत असेन, तर दीक्षा मला जवळ घेऊन माझे सांत्वन करते. ती स्वतःला औषध देण्याची, तसेच इतरांनाही औषध घेण्याची आठवण करते. घरात कुणी मोठ्या आवाजात बोलत असेल किंवा चिडले असेल, तर ती विभूती लावून त्या व्यक्तीला शांत करण्याचा प्रयत्न करते.’ – कु. योगिनी सामंत

२ इ ७. सातत्य : ‘प्रतिदिन रामरक्षा म्हणून झाल्यावर ‘सर्वांना विभूती लावणे, उपाय करायला कापूर आणून देणे, तीर्थ आणि प्रसाद देणे, तसेच घरातून बाहेर पडतांना प्रार्थनेची आठवण करणे’, या गोष्टी ती सहजपणे अन् नियमित करते.’ – श्री. श्रीपाद अरुण सामंत

२ इ ८. सात्त्विक गोष्टींची आवड

अ. भ्रमणभाषवर शास्त्रीय गायन लावल्यावर दीक्षा भ्रमणभाष हातात घेते आणि गाणे तल्लीन होऊन ऐकते. गाणे ऐकतांना ती मान डोलावून त्याला दाद देते. ‘या गायनात ती हरवून गेली आहे आणि तिला त्यातून वेगळाच आनंद मिळत आहे’, हे पहाणार्‍याला जाणवते.

आ. ‘दीक्षाला पूजा करण्याची आवड आहे; पण देवघरापर्यंत तिचे हात पोचत नसल्याने खाली ठेवलेल्या प.पू. भक्तराज महाराज यांच्या (प.पू. बाबांच्या) छायाचित्राची ती षोडशोपचारे पूजा करते.’

– सौ. अदिती श्रीपाद सामंत

इ. ‘एकदा मी ‘श्रीपाद श्रीवल्लभ’ यांचे चरित्र वाचत होते.  कुणीही तिला सांगितले नसतांनाही तिने हे चित्र ‘श्रीपाद श्रीवल्लभ’ यांचे आहे’, असे अचूकपणे सांगितले.

२ इ ९. स्वतः नामजप करून इतरांनाही तो करायला सांगणारी दीक्षा !

अ. एक दिवस पूजा झाल्यावर दीक्षाने जपमाळ घेतली आणि मलाही माळ घेऊन जप करायला लावला. ‘नामजप पूर्ण करूनच जेवायला जायचे’, असे तिने मला निक्षून सांगितले.

आ. एकदा रात्री मला झोपेतून उठवून तिने नामजप करायला बसवले. ‘आज दिवसभरात आपण नामजप केला नाही. तेव्हा आता नामजप करूया’, असे तिने मला सांगितले.

इ. एकदा तिने ‘आई नामजप का करत नाही ?’, असे मला विचारून आईला जपमाळ देऊन नामजप करायला सांगितले.

२ इ १०. ऐकण्याची वृत्ती : २१.६.२०२० या दिवशी झालेल्या सूर्यग्रहणाच्या कालावधीत दीक्षाने ग्रहणाचे सर्व नियम अतिशय सहजपणे पाळले. त्या काळात तिने पाणीही मागितले नाही.’

– श्रीमती निशा अरुण सामंत, मालाड, मुंबई. (चि. दीक्षाची आजी (वडिलांची आई))

२ इ ११. प.पू. बाबांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त ‘ऑनलाइन’ कार्यक्रम पहातांना प.पू. भक्तराज महाराज यांची इंदूर आश्रमातील मूर्ती पाहून ‘हे मला प्रतिदिन परात्पर गुरु डॉक्टरांना भेटायला घेऊन जातात’, असे सांगणे : ७.७.२०२० या दिवशी आम्ही प.पू. बाबांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त ‘ऑनलाईन’ कार्यक्रम पहात होतो. तेव्हा त्यांची इंदूर आश्रमातील मूर्ती पाहून ‘‘हे मला प्रतिदिन परात्पर गुरु डॉक्टरांना भेटायला घेऊन जातात. तिथे जाऊन मी त्यांना प्रश्न विचारते, फुले वहाते आणि नमस्कार करते’’, असे तिने मला सांगितले.’ – कु. योगिनी

२ इ १२. दीक्षाचे आणि तिच्या बहिणीचे छायाचित्र पाहून एका संतांनी ‘मुले सात्त्विक वाटतात’, असे म्हणणे : जानेवारी २०२० मध्ये आम्ही रामनाथी आश्रम बघायला गेलो होतो. तेथे एका संतांची भेट झाली. त्या वेळी त्यांना माझी मोठी बहीण, सौ. अदितीताईच्या कुटुंबाचे छायाचित्र दाखवले. छायाचित्र बघताच ते म्हणाले, ‘‘ताईला सात्त्विक मुलांशी बोलायला मिळते. मुले सात्त्विक वाटतात.’’ – श्री. आल्हाद आनंद माळगावकर

(चि. दीक्षाचे मामा), सनातन संकुल, पनवेल.

३. चि. दीक्षामधील स्वभावदोष

अ. ती काही वेळा (क्वचित) खोटे बोलते.

आ. हातातून तिची आवडती वस्तू घेतल्यास मोठ्याने ओरडते.

कृतज्ञता आणि प्रार्थना

‘हे  श्रीकृष्णा आणि परात्पर गुरु डॉक्टर, तुम्ही अशी बालसाधिका आम्हाला दिली. त्यासाठी आम्ही तुमच्या चरणी शतशः कृतज्ञ आहोत. तिच्याकडून आम्हाला शिकता येऊ दे आणि तुम्हाला अपेक्षित असा तिचा सांभाळ करून तिला घडवता येऊ दे’, हीच तुमच्या कोमल चरणी प्रार्थना !’

– सौ. अदिती श्रीपाद सामंत, मालाड, मुंबई. (१०.७.२०२०)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता