बांगलादेशी हिंदूंना वाली कोण ?
संपादकीय
काश्मीरमधील वंशविच्छेदाच्या वेळी भारत शांत राहिला; त्याची पुनरावृत्ती बांगलादेशी हिंदूंच्या संदर्भात नको !
असुरांचा वध करणार्या आदिशक्तीच्या आराधनेसाठी एकत्र येणार्या बांगलादेशी हिंदूंवर धर्मांधांनी आसुरी आक्रमणे केल्याने तेथील शेकडो हिंदूंची अत्यंत दयनीय आणि हालाखीची स्थिती झाली आहे. नौआखालीच्या दंगलींची आठवण व्हावी, तसा भयंकर उच्छाद धर्मांधांनी बांगलादेशमध्ये गेल्या १५ दिवसांत मांडला आहे. हिंदू, मंदिरे आणि हिंदु स्त्रिया यांच्यावरील आक्रमणांनी तेथील हिंदूंना ‘दे माय धरणी ठाव’ केले आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या विजयानंतर आतंकवाद्यांचे बळ सर्वार्थाने वाढल्याचा हा एक परिणाम आहे. तालिबानचे समर्थक असलेल्या आणि बांगलादेशात बंदी असलेल्या जमात-ए-इस्लामी या आतंकवादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हिंदूंची ६५ घरे पेटवून दिली. ऑगस्टमध्ये संपूर्ण जम्मू-काश्मीरमधील या संघटनेशी संबंधित असलेल्यांच्या घरांवर भारतीय सुरक्षायंत्रणांनी पुष्कळ मोठ्या प्रमाणावर धाडी टाकल्या. त्यामुळे कदाचित् ‘तेथील हिंदू अशा घटनेपासून वाचले’, असे म्हणण्यास आता वाव आहे. धर्मांधांनी ‘हिंदूंवर आक्रमण करायचेच’ असे ठरवले असल्यामुळे काहीतरी फुटकळ कारणाचे निमित्त ते शोधतात. कधी कुराणाचा, नाहीतर त्यांच्या श्रद्धास्थानाचा कथित अवमान होतो. ‘२०० धर्मांध नमाजानंतर नौआखाली येथील इस्कॉनच्या मंदिरावर आक्रमण करतात, तेव्हा अर्थात्च ते सुनियोजित असते’, हे सांगण्यासाठी कुठल्याही पुराव्याची आवश्यकता नाही. ‘तेथील फेनी गावात हिंदूंवरील आक्रमणाच्या निषेधार्थ आंदोलन करणार्या हिंदूंवर आक्रमण करणार्यांचा निषेध मानवतावादी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी गळे काढणारा एकही माईचा लाल करत नाही’, हे प्रकर्षाने लक्षात येते. चित्रपटसृष्टी आणि समस्त बुद्धीजीवी लेखकजन यांची आता दातखिळी बसली आहे. ‘हिंदूंवर आक्रमणे झाली, तर यांना बरेच वाटते कि काय ?’ अशी शंकाही यामुळे येते.
बांगलादेशी हिंदू पोरके !
बांगलादेशमध्ये धर्मांध हे हिंदूंवर आक्रमण करत असतांना पोलीस केवळ अश्रूधुराच्या नळकांड्या फोडतात. धर्मांध हिंदूंवर गावठी बाँब टाकतात; पण तेथील पोलीस बंदुका चालवत नाहीत. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी यापूर्वी ‘हिंसाचार करणार्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल’, असे म्हटले होते; परंतु धर्मांधांना ‘त्यांच्यावर काहीही कारवाई होणार नाही’, याची निश्चिती असल्यामुळेच त्यांनी हिंदूंवर सातत्याने आक्रमणे चालू ठेवली आहेत. हसीना किंवा बांगलादेशचे गृहमंत्री असदुज्जमां खान कमाल यांनी हिंदूंवरील आक्रमणाविषयी कितीही सारवासारव केली, तरी शेवटी पीडित हे हिंदु आहेत आणि आक्रमणकर्ते त्यांच्याच धर्माचे आहेत; त्यामुळे ‘बांगलादेशकडून हिंदूंच्या रक्षणासाठी काही ठोस उपाय केले जातील’, या आशेवर भारतियांनी राहू नये.
आता शौर्य जागरण हवेच !
नौआखालीच्या दंगलीच्या वेळी मोहनदास गांधींनी ‘मुसलमान बलात्कार करत असतील, तरी हिंदु महिलांनी त्यांना प्रतिकार करू नये’, असे हिंदूंच्या तळपायाची आग मस्तकात नेणारे विधान केले होते. हिंदु महिलांच्या नशिबाने आता असे बोलणारे कुणी नाही; परंतु त्यांच्यावरील अन्यायाच्या विरोधात ठोस उपाययोजना निघत नसतील, तर ‘या अत्याचाराचे मूकसंमतीदार बनणार्या हिंदूंनाही तेवढेच पाप लागेल’, हे लक्षात घ्यायला हवे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या परराष्ट्रनीतीसाठी प्रसिद्ध आहेत; परंतु बांगलादेशमधील हिंदूंचे अत्याचार अद्याप अल्प न होता आता वाढतच असतांना हसीना यांना तेथील हिंदूंचे रक्षण करण्यासाठी भारताने तंबी दिली पाहिजे. तसे होत नसेल, तर बांगलादेशला कोंडित पकडून त्याला हिंदूंच्या रक्षणार्थ भाग पाडले पाहिजे. ‘हिंदूंच्या रक्षणासाठी भारत बांगलादेशमध्ये सैन्यही घुसवू शकतो’, याची जाणीव बांगलादेशला झाली पाहिजे’, असे वातावरण निर्माण झाले पाहिजे. ‘बांगलादेशला भारताने स्वातंत्र्य मिळवून देण्यास साहाय्य केले’, हे तो विसरला आहे. ‘चीनपासून सुरक्षिततेसाठी तो भारतावर अवलंबून आहे’ याची जाणीव त्याला सातत्याने करून दिली पाहिजे. बलाढ्य हिंदु देश जवळ असूनही बांगलादेशमध्ये हिंदूंचा एवढ्या मोठ्या प्रमाणात वंशविच्छेद होत आहे; कारण भारतामधील काश्मीरमध्ये हिंदूंचा संहार हिंदूंनी खपवून घेतला आहे. बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी बांगलादेशवर दबाव आणण्यासाठी भारतातील हिंदूंनी भारत सरकारला लक्षावधींच्या संख्येने पत्रे पाठवली पाहिजेत; नाहीतर काश्मीरच्या वेळी ‘जसा उर्वरित भारत शांत राहिला’, तसेच आताही होईल. बांगलादेशमध्ये काही मासांपूर्वी ‘बलात्कार्यांना फाशीची शिक्षा होणार’ असल्याचा कायदा आला आहे. त्यानुसार ‘गेल्या काही दिवसांत हिंदु स्त्रियांवर बलात्कार करणार्यांना हसीना फाशी देण्याचे धैर्य दाखवणार का ?’, असा प्रश्न भारतातील हिंदूंनी संघटित होऊन विचारला पाहिजे. धर्मांधांनी गेल्या काही दिवसांत दुर्गादेवीच्या मंडपातील ज्या शेकडो मूर्ती फोडल्या त्यांच्या हातातील शस्त्र आता बांगलादेशातील हिंदूंनी त्यांच्या अस्तित्वाच्या रक्षणासाठी त्यांच्या हातात घेण्याची वेळ आली आहे. भारताचा प्रत्येक नेता जेव्हा डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांच्याप्रमाणे ‘हिंदूंवरील अत्याचार थांबत नसतील, तर त्याच्यावर आक्रमण करा’, असे सांगेल, तेव्हा हसिना यांना हिंदूंच्या रक्षणाचा विचार करणे भाग पडेल. ‘आधी हिंदूंना मरू द्यायचे आणि नंतरही तात्पुरत्या उपाययोजना करायच्या’ ही नीती आता भारताने पालटली पाहिजे. बांगलादेशात हिंदूंची हत्या होण्याचे प्रमाण वाढत आहे. ‘आणखी किती जणांची हत्या झाल्यावर भारत सरकार तेथील हिंदूंच्या रक्षणार्थ पावले उचलणार ?’, हा कळीचा प्रश्न आहे. आता डोक्यावरून पाणी गेले आहे. बांगलादेशी हिंदूंच्या रक्षणासाठी आता भारताकडून एक मोठा ‘दे धक्का’ हवा आहे. भारत सरकारकडून हिंदूंना ही अपेक्षा आहे !