हिंदूंवरील अत्याचार थांबत नसतील, तर भारताने बांगलादेशवर आक्रमण करावे ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी
एकतरी भारतीय राजकीय नेता किंवा हिंदु लोकप्रतिनिधी अशी मागणी करण्याचे धाडस करतो का ? – संपादक
नवी देहली – भारताचा शेजारी देश असणार्या बांगलादेशमध्ये हिंदूंवरील अत्याचार थांबत नसतील, तर भारताने बांगलादेशवर आक्रमण करून तेथील प्रदेश कह्यात घ्यावा, असे मत भाजपचे नेते आणि राज्यसभा खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी पुन्हा एकदा व्यक्त केले आहे. यापूर्वी म्हणजे वर्ष २०१८ मध्ये त्यांनी त्रिपुरामध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये बोलतांना असे वक्तव्य केले होते. सध्या बांगलादेशातील हिंदूंवर होणार्या आक्रमणांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी या वक्तव्याचा पुनरुच्चार केला आहे.
१. डॉ. स्वामी यांनी त्या वेळी म्हटले होते की, भारत बांगलादेशला कायमच समर्थन देत राहील; मात्र बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी तेथील हिंदूंच्या मंदिरांची विटंबना करणार्यांना, मंदिरांचे रूपांतर मशिदींमध्ये करणार्यांना आणि हिंदूंचे धर्मांतर करून त्यांना मुसलमान करणार्या वेड्या लोकांना थांबवले पाहिजे.
२. डॉ. स्वामी पाकवर टीका करतांना म्हणाले होते की, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान केवळ शिपाई असून पाकची गुप्तचर यंत्रणा आय.एस्.आय., पाक सैन्य आणि आतंकवादी हेच पाकिस्तानचा कारभार चालवत आहेत. याच कारणामुळे पाकिस्तानशी चर्चा करण्याची आवश्यकता नाही.