साधकांवर निरपेक्ष प्रेम करणारे देवद आश्रमातील सनातनचे १०२ वे संत पू. शिवाजी वटकरकाका (वय ७५ वर्षे)!
देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील पू. शिवाजी वटकरकाका यांचा आज आश्विन शुक्ल पक्ष चतुर्दशी (१९.१०.२०२१) या दिवशी ७५ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने साधकाला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
पू. शिवाजी वटकरकाका यांना ७५ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
‘गुरुमाऊलीच्या कृपेने मला काही मास (महिने) पू. वटकरकाकांच्या खोलीत रहाण्याची संधी प्राप्त झाली होती. त्या काळात पू. वटकरकाकांच्या निरपेक्ष प्रीतीने मी भारावून गेलो. विविध प्रसंगांतून त्यांनी आम्हा साधकांवर भरभरून प्रेम केल्याचे माझ्या लक्षात आले. त्याविषयीची कृतज्ञता म्हणून हे लिखाण मी त्यांच्याच चरणी अर्पण करत आहे.
१. रुग्ण साधकांची सेवा करणे
१ अ. डेंग्युने रुग्णाईत असलेल्या साधकाला विविध प्रकारे केलेले साहाय्य
१. नोव्हेंबर २०१९ मध्ये देवद आश्रमात प्रसारातील एक साधक डेंग्युने रुग्णाईत होता. तेव्हा पू. वटकरकाकांनी त्याची स्वतः काळजी घेतली. त्यांनी वेळोवेळी त्या साधकाची प्रेमाने विचारपूस केली. त्याला ‘काय हवे-नको’, ते विचारले. तो साधक खोलीत एकटाच रहात असल्याने आणि त्याची स्थिती अत्यंत गंभीर असल्याने त्याच्या सोबत साधक देण्याविषयी उत्तरदायी साधकांकडे त्यांनी विचारणा केली.
२. साधकाला ‘रुग्णालयात काही आर्थिक सवलत मिळू शकते का ?’, हे विचारण्यासाठी ते त्या रुग्णालयात स्वतः गेले होते.
३. ‘आध्यात्मिक स्तरावरील उपायांच्या दृष्टीने त्या साधकाची रुग्णालयातच दृष्ट काढू शकतो का ?’, हे पू. काकांना विचारल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘तो साधक रुग्णालयात वेगळ्या खोलीत असल्याने दृष्ट काढू शकतो.’’ दृष्ट काढायला ते स्वतःहून सिद्ध झाले आणि त्यांनी त्या साधकाची दृष्ट काढली.
४. त्या रुग्ण साधकाच्या प्लेटलेट्स वाढवण्यासाठी त्यांनी त्याला परात्पर गुरु पांडे महाराज यांचे मंत्रोपायही दिले होते.
१ आ. साधक (श्री. सुरेश सावंत) स्वतः रुग्ण असतांना पू. काकांनी केलेले साहाय्य
१. मी पू. काकांच्या खोलीत रहात होतो, तेव्हा मला ४ – ५ दिवस ताप आला होता. मी रुग्णाईत असतांना त्यांनी माझीही पुष्कळ काळजी घेतली. त्या काळात खोलीतील केर काढणे आणि लादी पुसणे या सेवा माझ्याकडे असतांना माझी स्थिती लक्षात घेऊन त्यांनी त्या दोन्ही सेवा स्वतः केल्या.
२. थकवा असल्यामुळे मला चिकित्सालयात जाण्यास जमत नव्हते. तेव्हा त्यांनी आधुनिक वैद्यांना माझी स्थिती सांगून खोलीत येण्याविषयी विचारले. त्यामुळे आधुनिक वैद्य स्वतः खोलीत येऊन मला तपासून गेले.
३. मी रुग्णाईत असतांना पू. काकांनी मला त्यांच्याजवळच्या फळांच्या फोडी करून त्या एका डब्यात घालून दिल्या आणि मला त्या हळूहळू खाऊन संपवण्यास सांगितले.
२. खोलीतील साधकांप्रती असलेल्या निरपेक्ष प्रेमामुळे त्यांना शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर साहाय्य करणे
अ. खोलीतील दोन साधकांच्या स्वच्छता सेवांचे नियोजन त्यांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘मलाही तुम्ही या सेवा देऊ शकता.’’
आ. खोलीत झालेल्या एका सत्संगात त्यांनी ‘खोलीतील साधकांची येत्या गुरुपौर्णिमेपर्यंत प्रगती व्हायला हवी’, असा मनोदय व्यक्त केला.
इ. खोलीतील साधकांसाठी त्यांनी प्रतिदिन सकाळी ७.४५ वाजता भावप्रयोग चालू केला. यामध्ये ते श्री गुरुमाऊलीला सूक्ष्मातून येण्यासाठी प्रार्थना करतात. ‘गुरुमाऊलीच्या सूक्ष्मातून खोलीत येण्याने खोलीतील रज-तमाचे आवरण नष्ट होत आहे, साधकांचे स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन होत आहे’, असे ते सांगतात. तेव्हा त्यांच्या वाणीतील चैतन्यामुळे ‘प.पू. गुरुदेव खोलीत सूक्ष्मातून आले आहेत, खोलीतील चैतन्य वाढले आहे आणि साधकांना हलके अन् उत्साही वाटत आहे’, असे जाणवते.
त्यानंतर अपराधीभाव आणि शरणागतभाव यांच्या प्रार्थना एक साधक सांगतो अन् इतर साधक त्या साधकासमवेत त्या प्रार्थना म्हणतात. या भावप्रयोगामुळे आम्हा साधकांना दिवसभर उत्साह वाटतो आणि आमच्यातील तळमळ टिकून रहाते.
ई. त्यांनी आठवड्यातून एकदा खोलीतील साधकांकडून झालेल्या चुका सांगण्यास सांगितले आहे.
३. पू. काकांच्या निरपेक्ष प्रीतीमय सहवासात असतांना माझ्या मनात एकदाही नकारात्मक किंवा निराशेचे विचार आले नाहीत.
४. कृतज्ञता
प.पू. गुरुमाऊली, आमची काहीच पात्रता नसतांना आपण आम्हाला संत सहवास दिलात. याविषयी मी आपल्या आणि पू. काकांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– श्री. सुरेश सावंत, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (नोव्हेंबर २०१९)