अजित पवार चोरीची मालमत्ता परत करणार का ? – किरीट सोमय्या
सोलापूर – ‘जरंडेश्वर’कारखान्यासह अजित पवारांच्या ७० निनावी मालमत्ता त्यांच्या बहिणीसह मेव्हण्याच्या नावावर आहेत. त्यामुळे चोरीच्या मालमत्ता अजित पवार परत करणार का ? याचे उत्तर महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी द्यावे, असे आव्हान भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिले. ते १७ ऑक्टोबर या दिवशी येथील शांती सागर मंगल कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह भाजपचे नेते उपस्थित होते.
किरीट सोमय्या पुढे म्हणाले, ‘‘शरद पवारांनी माझ्या आरोपाला उत्तर द्यावे. याविषयीचे कागदोपत्री पुरावे मी अंमलबजावणी संचालनालय (ईडी), उच्च न्यायालय, केंद्रीय अन्वेषण यंत्रणा (सीबीआय) यांच्याकडे देणार आहे. पुराव्यातील एकही कागद खोटा असल्याचे पवार कुटुंबियांनी मला सिद्ध करून दाखवावे.’’ यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी होटगी रोड येथील महिला रुग्णालयाजवळ किरीट सोमय्यांसह असणारी वाहने अडवण्याचा प्रयत्न करून सोमय्या यांच्या निषेधार्थ घोषणा दिल्या; मात्र वाहने वेगाने पुढे निघून गेली.