अहेरी (जिल्हा गडचिरोली) येथे ‘कोंबडा बाजारा’सह अवैध धंद्यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष !
|
गडचिरोली – येथील अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा येथे प्रतिरविवारी आणि राजाराम खांदला येथे प्रतिगुरुवारी अवैध ‘कोंबडा बाजार’ (बाजारात कोंबड्यांची शर्यत लावून त्यावर जुगार खेळणे, याला ‘कोंबडा बाजार’ असे म्हणतात.) मोठ्या जोमाने चालू आहे. परिसरातील शेकडो नागरिक त्यात जुगार खेळत असून यामध्ये अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.
जिल्ह्यात सर्वत्र ‘कोंबडा बाजारा’वर बंदी घालण्यात आली आहे; मात्र बेधडकपणे हा बाजार भरवला जात असून तेथे लाखो रुपयांचा जुगार खेळला जात आहे. पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे जुगारासह अनेक अवैध धंदे जोरात चालू आहेत. या परिसरात खुलेआम देशी-विदेशी मद्याची विक्री केली जाते. ‘‘कोंबडा बाजार’ भरत असतांना स्थानिक पोलिसांच्या ही गोष्ट लक्षात का येत नाही ?’, असे संतप्त नागरिकांनी विचारले आहे. (जी गोष्ट नागरिकांच्या लक्षात येते, ती गोष्ट सर्व यंत्रणा हाताशी असणार्या पोलिसांच्या लक्षात का येत नाही ? – संपादक) यापूर्वी ‘कोंबडा बाजार’ चालू असतांना नक्षलवाद्यांनी एका पोलीस अधिकार्याची हत्या करून दुचाकी जाळली होती. (इतकी मोठी घटना घडूनही पोलीस ‘कोंबडा बाजार’ बंद का करत नाहीत ? – संपादक)