कोजागरीच्या रात्री भगवान श्रीकृष्णाने केलेल्या रासक्रीडेचे महत्त्व !

१९.१०.२०२१ या दिवशी असलेल्या कोजागरी म्हणजेच शरद पौर्णिमेच्या निमित्ताने…

रासक्रीडेविषयी आक्षेप घेणारे कथित बुद्धीवादी त्यामागील आध्यात्मिक अर्थ जाणून घेतील का ?

 

‘श्रीमद्भागवतानुसार कोजागरी पौर्णिमेच्या रात्री पूर्णपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाने वृंदावनामध्ये गोपींसह रासक्रीडा केली. भक्तीशास्त्रामध्ये या रात्रीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रीमद्भागवतामध्ये दशम् स्कंधामध्ये ‘रासपंच्याध्यायी’ नावाने ५ अध्यायांमध्ये आहेत, जे भागवताचे ५ प्राण मानले जातात. या ५ अध्यायामध्ये रासक्रीडेची कथा येते.

भगवान श्रीकृष्णाशी अनंत रसांनी एकरूप होऊन केली जाते ती ‘रासक्रीडा’ !

रसो वै स: ! (तैत्तिरीयोपनिषद्, ब्रह्मवल्ली, अनुवाक ७, वाक्य २) म्हणजे ‘तो (परमेश्वर) रसरूप आहे.’

भगवान श्रीकृष्ण आत्मा आहे. आत्माकार वृत्ती रासरासेश्वरी श्रीराधा आहे आणि इतर गोपी या आत्माभिमुख वृत्ती आहेत. भगवान श्रीकृष्ण स्वतः रसपूर्ण आहेत. या रासरासेश्वर भगवान श्रीकृष्णाशी अनंत रसांनी एकरूप होऊन जी दिव्य क्रीडा केली जाते, तीच ‘रासक्रीडा’ आहे. भागवत संप्रदायामध्ये या लीलेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. रासलीलेचा अर्थ आध्यात्मिकदृष्ट्या समजून घेण्यासारखा आहे. शरद पौर्णिमेच्या रात्री भगवान श्रीकृष्णांनी गोपींसमवेत रासलीला केली. ‘गोपी’ शब्दाचा अर्थ ‘गोभि: इन्द्रियैः भक्तिरसं पिबति इति गोपी ।’ म्हणजे ‘इंद्रियांनी जी भक्तीरस प्राशन करते ती गोपी.’ ‘गो’ म्हणजे इंद्रिये.

भगवान श्रीकृष्णाच्या बासरीचा स्वर ऐकून सर्व काही सोडून आलेल्या गोपींना त्याने पुन्हा घरी जाण्यास सांगणे

रासलीलेमध्ये भगवान श्रीकृष्णाने स्वतःच्या अधरांनी (ओठांनी) बासरीचे स्वर छेडले आणि त्या मधुर निनादाने गोपी धावत श्रीकृष्णाला भेटायला आल्या. श्रीकृष्णाच्या बासरी वादनाने सर्व अचेतन वस्तूही सचेतन झाल्या. कुणी गोपी भोजन करत होत्या, कुणी पतीला जेवू घालत होत्या, कुणी बाळाला दूध पाजत होत्या, कुणी श्रृंगार करत होत्या, कुणी थोरांची सेवा करत होत्या, तर कुणी इतर काही कामे करत होत्या. बासरीचा स्वर ऐकताच त्या घाईघाईने हातातील सर्व काम तशीच बाजूला ठेवून भगवंताला भेटायला निघाल्या. भगवंताला म्हणजेच श्रीकृष्णाला भेटताच त्याने त्यांना येण्याचे कारण विचारले आणि रात्रीची वेळ झाल्याचे सांगून अन् पातिव्रत्य धर्माचे पालन करण्याचा उपदेश देऊन परत जायला सांगितले. गोपींची परीक्षा पहाण्यासाठीच श्रीकृष्णाने त्यांना परत जायला सांगितले.

गोपींच्या भक्तीमय उत्तरामुळे भगवंताने रासक्रीडेला अनुमती देणे

ज्यांनी स्वतःची मने पूर्णतः गोविंदाच्या चरणारविंदावर (कमळासारख्या असणार्‍या चरणावर) समर्पित केली होती, त्या गोपी सर्वस्वाचा त्याग करून रासक्रीडेसाठी आल्या होत्या आणि श्रीकृष्णाचे असे स्वर ऐकून त्या निराश झाल्या; पण ईश्वरप्राप्तीच्या उद्देशाने आलेल्या गोपी मात्र तिथेच थांबल्या. या वेळी गोपींनी जे उत्तर दिले, ते अतिशय समर्पक आहे. त्या म्हणाल्या, ‘‘तुम्ही परपुरुष नसून परमपुरुष आहात. सर्व वेदांचा, धर्माचा आणि व्रतांचा सार काय आहे, तर ईश्वरप्राप्ती त्यामुळे तुम्ही आमचा त्याग करूच शकत नाही.’’ गोपींच्या अंतःकरणातील ही परम शुद्ध आणि सर्वश्रेष्ठ अशी भक्ती पाहून श्रीकृष्णाचे हृदय दयेने भरून आले आणि त्यांनी रासक्रीडेला अनुमती दिली अन् रासलीलेला प्रारंभ झाला.

रासक्रीडेच्या आधी भगवान श्रीकृष्णाने अंतर्धान होण्यामागचे कारण

खरेतर भगवंताची वंशीध्वनी (वंशी म्हणजे बासरी) ऐकून केवळ गोपींनाच यायची इच्छा झाली. भगवान श्रीकृष्णाने जेव्हा गोपींचा अशा प्रकारे सन्मान केला, तेव्हा गोपींच्या मनात ‘समस्त पृथ्वीवर केवळ आम्हीच सर्वश्रेष्ठ आहोत की, ज्यांनाच केवळ श्रीकृष्णाशी अशा प्रकारे क्रीडा करण्यास संधी मिळाली’, असा विचार आला. गोपींच्या मनातील निर्माण झालेला हा दर्प म्हणजे अहंकार पहाताच सर्वज्ञ असे भगवान श्रीकृष्ण तिथून अंतर्धान पावले. जिथे मन परमेश्वराला सोडून देह धारणेत संलग्न होते, तेथून परमेश्वर अंतर्धान पावतो हे निश्चित ! आता भगवान श्रीकृष्णांनी अंतर्धान होण्याचे कारण हे आहे की, विरह हाच संयोगाचा पोषक आहे; कारण विरहामध्येच प्रिय व्यक्तीचे चिंतन तीव्रतेने होते. ज्याच्या हृदयामध्ये शेषमात्र अहंकार आहे, तो भगवंतांच्या समोर उभा रहाण्यास पात्रच नाही. अचानक श्रीकृष्ण अंतर्धान पावल्याचे पाहून गोपींची मने विरह वेदनेने व्यथित झाली आणि यातूनच ‘गोपीगीत’ या भक्तीरसाने परिपूर्ण अशा गीताचा उदय झाला.

श्रीकृष्णमय झालेल्या सर्व गोपींच्या एकमुखाने बाहेर पडले ‘गोपीगीत’ !

श्रीमद्भागवतामध्ये जी काही गीते आहेत, त्यामध्ये ‘गोपीगीत’ हे सर्वश्रेष्ठ आहे. विरहवेदनेने व्याकुळ आणि थकलेल्या गोपींच्या तोंडून बाहेर पडलेले हे गोपीगीत म्हणजे भक्तीची पराकाष्ठा आहे. गोपी श्रीकृष्णाला शोधता शोधता इतक्या श्रीकृष्णमय झाल्या की, त्या स्वतःलाच श्रीकृष्ण समजून क्रीडा करू लागल्या. यमुनेच्या तीरावर येऊन सगळ्या गोपींनी एकमुखाने गोपीगीत गायले; कारण सगळ्यांची मने पूर्णतः श्रीकृष्णमय झालेली होती. त्यामुळे त्यांच्या तोंडून एकमुखाने एकच गीत बाहेर पडेल, यात शंका ती कोणती ?

या गोपीगीतामध्ये २९ श्लोक असून हे गोपीगीत ‘कनक मंजिरी’ छंदामध्ये आहे. गाण्यास अतिशय गेय आणि भक्तीरसाने ओतप्रोत असे आहे. या गोपीगीताच्या माध्यमातून भगवंताशी एकरूपता साधण्याची अलौकिक अशी जी काही भक्ती गोपींनी दाखवली आहे, त्याला इतिहासामध्ये तोड नाही.

रासक्रीडा ही ‘कामलीला’ नव्हे, तर ‘कामविजयलीला’ !

रासलीलेचा आध्यात्मिक अर्थ ‘वृंदावन म्हणजे आपले अंतःकरण. श्रीकृष्ण म्हणजे आपला आत्मा. श्रीकृष्णाच्या बासरीचा स्वर म्हणजे आपल्या अंतःकरणात निघणारा अनाहत ध्वनी जो योगी लोकांना ऐकू येतो. या ध्वनीने निर्माण होणार्‍या अंतःकरणातील भावना आणि तरंग म्हणजे गोपी. या तरंगांच्या आत्म्याशी होणार्‍या मिलनाचे साधर्म्य रासलीलेशी आहे; कारण जीवन एक महारास आहे आणि भगवान श्रीकृष्णाशी होणारी ही रासक्रीडा हीच मनुष्य जीवनाची अंतिम पराकाष्ठा आहे, परम ध्येय आहे’, असा आहे.

भागवतामध्ये शुकाचार्यांनी श्रीकृष्णाला ‘साक्षात्मन्मथमन्मथ:’ म्हणजे ‘प्रत्यक्ष कामदेवांचे मन मथवू (नमवू) शकणारा’, असे म्हटले आहे. ही ‘कामक्रीडा’ नसून ‘कामविजयलीला’ आहे. अंतःकरणातील कंदर्प म्हणजे जो काम, तो नष्ट करण्याचे सामर्थ्य या कथेमध्ये असून ही कथा भक्तीरस वाढवणारी असून ईश्वरप्राप्तीचा मार्ग सुकर करणारी आहे. ‘गोपीगीत’ हे नित्य पठण करायचे असून त्याने अवश्य भक्ती वाढवता येते. तेव्हा भक्तीरसाचे परमरहस्य अशा या रासक्रीडेचे पठण करून आपणही भगवान श्रीकृष्णाच्या कृपेस पात्र होऊया.’

(संदर्भ : संकेतस्थळ)

रासक्रीडेमागील आध्यात्मिक अर्थ

रात्रीच्या वेळी परस्त्रियांसमवेत भगवान श्रीकृष्णाने अशी ही क्रीडा कशी केली ? असा आक्षेप बर्‍याच जणांच्या मनात येतो; पण आधी हे सांगणे आवश्यक आहे की, ही रासक्रीडा ही सामान्य नसून त्याला एक आध्यात्मिक अर्थ आहे. भगवान श्रीकृष्णाचा देह हा साधारण मानवासारखा सामान्य देह नसून तो सच्चिदानंद असा परिपूर्ण आहे.

ईश्वर: परम: कृष्ण: सच्चिदानन्दविग्रह: ।
अनादिरादिर्गाेविन्द: सर्वकारणकारणम् ।।
– ब्रह्मसंहिता, अध्याय ११, श्लोक ५४

अर्थ : जो ईश्वर सर्व जगताचा परमात्मा, सच्चिदानंदमूर्ती, अनादि असूनही सर्व कारणांचे आदिकारण आहे, तो गोविंदच श्रीकृष्ण आहे.

आपली मानवी इंद्रिये ही मर्यादित आहेत, म्हणजे हाताचे काम केवळ हातच करू शकतात. डोळ्याचे काम पहाण्याचे, जे डोळेच करू शकतात. इथे मानवी इंद्रियांची मर्यादा लक्षात येते; पण भगवान श्रीकृष्ण यांच्याविषयी असे नाही. त्यांची कोणतीही इंद्रिये कोणतीही कार्ये करू शकतात, म्हणजे डोळे हाताचे कार्य करू शकतात आणि हात डोळ्याचे पहाण्याचे कार्य करू शकतात. याची पुष्टी खालीलप्रमाणे आहे.

अङ्गानि यस्य सकलेन्द्रियवृत्तिमन्ति पश्यन्ति पान्ति कलयन्ति चिरं जगन्ति ।
आनन्दचिन्मयसदुज्ज्वलविग्रहस्य गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि ।।
– ब्रह्मसंहिता, अध्याय ५, श्लोक ३२

अर्थ : ज्याच्या दिव्य स्वरूपाच्या प्रत्येक अवयवामध्ये जो स्वतः पूर्णत्वाने समाविष्ट आहे, ज्याची इंद्रिये सदासर्वकाळ भौतिक आणि आध्यात्मिक अशी अनंत ब्रह्मांडे पहातात, सांभाळतात आणि प्रकट करतात, अशा तेजस्वी सच्चिदानंदस्वरूपाचे, त्या श्री गोविंदाचे म्हणजेच आदिपुरुषाचे मी पूजन करतो.