कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिराच्या किरणोत्सवाच्या दिवशी देहली सेवाकेंद्रातील साधकाने अनुभवलेला किरणोत्सव !
‘३१.१.२०२१ या दिवशी सकाळी मी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या किरणोत्सवाबद्दल सामाजिक माध्यमांवर (सोशल मिडियावर) पोस्ट वाचली. त्या वेळी मी देवीला नमस्कार केला. महालक्ष्मीमाता आमची कुलदेवता आहे.
दुपारी ३ ते ५ या कालावधीत देहली सेवाकेंद्राच्या तळघरात (बेसमेंटमध्ये) अगदी आतमध्ये जेथे सूर्यकिरण क्वचित् पोचू शकतील, अशा ठिकाणी मी आणि कु. कृतिका खत्री, असे दोघे अधिवक्त्यांची ‘ऑनलाईन’ कार्यशाळा घेत होतो.
सायंकाळी ४.५५ वाजता आम्ही कृतज्ञता व्यक्त करत असतांना सहज माझे लक्ष ताईकडे गेले आणि पहातो, तर ताईच्या पायावर किरणोत्सवाप्रमाणे सूर्यकिरण पडले होते. त्या वेळी मला ‘आज महालक्ष्मी मंदिरात किरणोत्सव आहे आणि देवीने ही प्रचीती या माध्यमातून दिली’, असे वाटले. मी ही भ्रमणभाषवरील छायाचित्रे सद्गुरु डॉ. पिंगळेकाकांना दाखवली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘साक्षात् महालक्ष्मीमाताच आज आश्रमात किरणोत्सवाच्या माध्यमातून प्रकट झाली.’’
– श्री. नरेंद्र सुर्वे, देहली सेवाकेंद्र, देहली. (५.२.२०२१)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |