सास्मीरा मार्ग सार्वजनिक नवरात्रोत्सवात सनातन संस्थेचे ऑनलाईन प्रवचन !
मुंबई – वरळी येथील सास्मीरा मार्ग सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने सनातन संस्थेचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. ‘झूम’ या सामाजिक माध्यमातून १२ ऑक्टोबर या दिवशी हे प्रवचन झाले. या प्रवचनात सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये नवरात्रीचा इतिहास, महत्त्व, नवरात्रीमध्ये देवीपूजनाचे केले जाणारे धार्मिक उपचार या संदर्भातील अध्यात्मशास्त्रीय विवेचन सौ. नयना भगत यांनी सोप्या शब्दांत केले. कोरोनाच्या नियमांमुळे प्रत्यक्ष प्रवचन घेणे शक्य नसल्याने ऑनलाईन पद्धतीने हे प्रवचन घेण्यात आले. हे प्रवचन झाल्यानंतर प्रवचनाचा लाभ अन्य जिज्ञासूंना व्हावा, यासाठी प्रवचनाची ‘लिंक’ (मार्गिका) सास्मीरा मार्ग सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांच्या यू-ट्युब वाहिनीवर ठेवण्यात आली आहे.
देवीच्या उत्सवाच्या ठिकाणी व्यासपिठावरून वक्त्यांनी प्रवचन घ्यावे, अशी मंडळाच्या पदाधिकार्यांची इच्छा होती; मात्र कोरोनाच्या नियमावलीत ते शक्य नव्हते. त्यामुळे ते ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे पदाधिकार्यांकडून सुचवले गेले. प्रवचनाचे आयोजन करण्यात मंडळाचे श्री. आशीर्वाद पाटील आणि श्री. ब्रिजेश नाबर यांनी पुढाकार घेतला. तसेच विद्यार्थांना पारितोषिक देण्यासाठी सनातनचे ‘गुण जोपासा आणि दोष घालवा’ या ग्रंथाच्या प्रती घेतल्या.