आरक्षण हा केवळ राजकारणाचा विषय ! – नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री
नागपूर – आपल्या देशात प्रत्येकाला नोकरी हवी असते. चौकटीबाहेरचा विचार कुणी करत नाही, समजून घेत नाही. मुळात सरकारी नोकर्याच नाहीत, तर त्यात आरक्षण कुठून देणार ? आरक्षण हा केवळ राजकारणाचा विषय झाला आहे. आपल्याकडील राजकारण्यांची दृष्टीच वेगळी आहे. मागास असणे ही पूर्णपणे राजकीय गोष्ट झाली आहे, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी १६ ऑक्टोबर या दिवशी येथे व्यक्त केले. ‘वनराई फाऊंडेशन’च्या वतीने ‘कमानी ट्यूब्ज’च्या अध्यक्षा पद्मश्री डॉ. कल्पना सरोज यांना ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, तंत्रज्ञानामुळे रोजगार आणि पैसा मिळतो. येणारा काळ हा ‘ड्रोन’ तंत्रज्ञानाचा आहे. तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करणारा उद्योजक होऊ शकतो. त्याचा कोणतीही जात, पंथ, धर्म आणि भाषा यांच्याशी संबंध नाही. व्यक्तीचा चांगुलपणा आणि गुणवत्ता यांचा कशाशीही संबंध नाही. आपल्याकडे महाविद्यालये आहेत; पण उद्योजकता शिकवणार्या संस्था नाहीत. प्रत्येकाला शाळा किंवा महाविद्यालये हवी असतात; मात्र दुसरा व्यवसाय करण्याची सिद्धता नसते. डॉ. सरोज यांच्यासारख्या यशस्वी उद्योजिकेने एका समाजातील १०० तरुणींना उद्योजक घडवले आहे. अशा प्रयत्नांतूनच आर्थिक आणि सामाजिक समता प्रस्थापित होईल.