६१ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली डोंबिवली (ठाणे) येथील चि. श्रिया अमोल पाटील (वय २ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. श्रिया अमोल पाटील एक आहे !
चि. श्रिया पाटील हिची आत्या सौ. दीपा मछिंद्र म्हात्रे यांना कु. श्रियाची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. जन्मापूर्वी : ३ ते ४ मास
१ अ. आधुनिक वैद्यांनी बाळाच्या (श्रियाच्या) मेंदूला थोडा त्रास असल्याने तिच्या आई-वडिलांना ‘गर्भ ठेवायचा कि नाही ?’, हे ठरवण्यास सांगणे : ‘माझी वहिनी म्हणजे श्रियाची आई सौ. सुजाता अमोल पाटील, ही सनातनच्या ५७ व्या संत पू. आनंदी पाटीलआजी यांची नातसून (पू. आनंदी पाटील यांच्या मुलाची सून आहे.) आहे. वहिनीला गर्भधारणा होऊन ३ मास झाले होते. ती पडताळणीसाठी गेल्यावर आधुनिक वैद्यांनी ‘बाळाच्या मेंदूला थोडा त्रास आहे’, असे सांगितले. प्रथम सोनोग्राफी केल्यावर निदान झाले नाही. त्यानंतर पुन्हा सोनोग्राफी केल्यावरही व्यवस्थित निदान झाले नाही. आधुनिक वैद्यांनी ‘‘आता मी काही सांगू शकत नाही. बाळ डोक्याने मंद असू शकते. तेव्हा ‘तुम्ही गर्भ ठेवायचा कि नाही, ते ठरवा’’, असे सांगितले.
१ आ. सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांना विचारल्यावर त्यांनी ‘तुम्ही दुसर्या एखाद्या चांगल्या आधुनिक वैद्यांना विचारून निर्णय घ्या’, असे सांगणे : त्या वेळी वहिनी ‘गर्भपात करायचा का ?’, असा विचार करत होती. ‘श्रियाच्या वडिलांनी (म्हणजे माझ्या भावाने) सांगितले, ‘‘आपण सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांना विचारूया आणि नंतर निर्णय घेऊया.’’ मी सद्गुरु (कु.) अनुराधाताईंना विचारल्यावर त्यांनी ‘‘तुम्ही आणखी एखाद्या चांगल्या आधुनिक वैद्यांना विचारून घ्या’’, असे सांगितले. नंतर आम्ही वहिनीला मुंबईच्या वाडिया रुग्णालयात (हॉस्पिटल) घेऊन गेलो. तिथे तिच्या काही चाचण्या (टेस्ट) करण्यात आल्या. त्या वेळी आधुनिक वैद्यांनी अहवाल पाहून सर्व काही व्यवस्थित असल्याचे सांगितले.
२. जन्मानंतर
३ मास ते ९ मास
२ अ. श्रियाला प्रथमच मंदिरात नेल्यावर तिने देवीला हात जोडून नमस्काराची मुद्रा करणे : श्रिया झोपेतही मुद्रा करते. ती ३ – ४ मासांची असल्यापासून तिची आई तिला ज्यांच्याकडे ठेवेल, त्यांच्याकडे ती रहाते. जेव्हा श्रियाला पहिल्यांदा देवीच्या मंदिरात नेले, तेव्हा तिने देवीला दोन्ही हात जोडून नमस्काराची मुद्रा केली.
२ आ. देवाची आवड असणे : श्रिया ७ मासांची असतांना कुणी ‘भगवान श्रीकृष्णाचा विजय असो’, असे म्हटले की, तीही हात वर करून ‘जय’ करते. ती ८ – ९ मासांची असतांनाच ‘भगवान श्रीकृष्ण की जय’, असे म्हणते.
२ इ. ती पू. पाटीलआजीच्या मांडीवर बसून ‘ॐ’ असा नामजप करते.
३. वय १ वर्ष
३ अ. ती कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेते. ती खाण्याचे सर्व पदार्थ आवडीने खाते.
३ आ. संतांप्रतीचा भाव : चि. श्रिया १ वर्षाची असल्यापासून ती पू. पाटीलआजींना तुळशीला पाणी घालण्यासाठी पेल्यात पाणी आणून देते. ती पू. आजीना साष्टांग नमस्कार करते.
३ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव
१. श्रिया परात्पर गुरु डॉक्टरांचे घरात असलेले छायाचित्र अचूक ओळखते. एकदा तिने माझ्या भ्रमणभाषमध्ये परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र पाहिले आणि तिने भ्रमणभाषला संपूर्ण दंडवत घातला. तिने असे २ – ३ वेळा केले.
२. ती दैनिकात प्रसिद्ध झालेले परात्पर गुरुदेवांचे छायाचित्रही अचूक ओळखते. ‘बाबा (प.पू. डॉक्टर) कुठे आहेत ?’, असे विचारल्यावर ती परात्पर गुरुदेवांचे छायाचित्र दाखवते.
३ ई. देवाप्रतीचा भाव
१. श्रियाला कुणी ‘नमस्कार’ असे म्हटले की, तीही लगेच दोन्ही हात जोडून नमस्काराची मुद्रा करते. ती घरातून बाहेर जातांना आणि बाहेरून घरात आल्यावर देवाला नमस्कार करते.
२. ती १ वर्षाची झाल्यापासून ‘साई बाबा की जय’, असे म्हटल्यावर तीसुद्धा ‘जय’, असे म्हणून दोन्ही हात उत्स्फूर्तपणे वर उंचावते.
मला हे सर्व गुरुदेवांच्या कृपेमुळे लिहिता आले, त्यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. दीपा मछिंद्र म्हात्रे (पू. आनंदी पाटीलआजी यांची नात (पू. आजींच्या मुलाची मुलगी) आणि चि. श्रियाची आत्या), डोंबिवली (पश्चिम), ठाणे. (५.६.२०२०)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता |