‘हिल रायडर्स ॲडव्हेंचर फाऊंडेशन’च्या वतीने जुना राजवाडा कमानीस तांब्याचे तोरण
कोल्हापूर, १७ ऑक्टोबर (वार्ता.) – ‘हिल रायडर्स ॲडव्हेंचर फाऊंडेशन’ या इतिहासप्रेमी संस्थेच्या वतीने गेली ३२ वर्षे दसर्याच्या दिवशी जुना राजवाडा कमानीस तांब्याच्या कलशाचे मंगल तोरण बांधण्यात येते. ‘या वास्तूचे जतन व्हावे’, या उद्देशाने हा सोहळा प्रत्येक वर्षी आयोजित केला जातो. जुन्या राजवाड्याच्या ऐतिहासिक कमानीस बांधण्यात येणार्या मंगल कलशाचे पूजन जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, महापालिका आयुक्त आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या वास्तूंनी वेळप्रसंगी आपले रक्षण केले. आपल्या वैभवात भर घातली. या ऐतिहासिक वास्तूंचे आपण काहीतरी देणे लागतो. त्यामुळे त्यांचे रक्षण करणे, संवर्धन करणे आपले कर्तव्य आहे या भावनेतूनच ‘हिल रायडर्स ॲडव्हेंचर फाऊंडेशन’च्या वतीने ही परंपरा जतन करण्यात येत आहे. या प्रसंगी कोरोना संसर्गाच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, तसेच महापूर, भूकंप यांत काम करणार्या संस्था, व्यक्ती यांचा जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, आयुक्त कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी ‘हिल रायडर्स ॲडव्हेंचर फाऊंडेशन’चे अध्यक्ष श्री. प्रमोद पाटील, विनोद कंबोज, ऋषि केसकर, सागर बगाडे, युवराज सालोखे, सचिन नरके, सूरज ढोली, शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय देवणे, भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांसह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर, विविध क्षेत्रांतील संस्था, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.