कोल्हापुरात शाही दसरा उत्साहात : श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते शमीपूजन
कोल्हापूर, १७ ऑक्टोबर – छत्रपतींची राजधानी असणार्या करवीरनगरीत पारंपरिक विजयादशमीचा सण ऐतिहासिक दसरा चौकात शाही थाटात आणि उत्साहात पार पडला. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते शमीपूजन झाले. यानंतर छत्रपतींच्या कुटुंबातील खासदार छत्रपती संभाजीराजे, छत्रपती मालोजीराजे, छत्रपती शहाजीराजे, छत्रपती यशराजराजे आणि छत्रपती यशस्विनीराजे यांनी सोने लुटताच करवीरवासियांनी अपूर्व उत्साहात सीमोल्लंघन करून सोने लुटले.
तत्पूर्वी करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवी, जुन्या राजवाड्यातील तुळजाभवानी आणि गुरु महाराज यांच्या पालख्यांचे लवाजम्यासह आगमन झाले. यानंतर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि त्यांच्या कुंटुंबातील सदस्य यांचे दसरा चौकात आगमन झाले. दसरा महोत्सव समितीच्या वतीने शाही कुटुंबातील सदस्यांचे स्वागत करण्यात आले. पारंपरिक पद्धतीने पुरोहितांच्या मंत्रोच्चारात विधीवत् पूजा केल्यानंतर देवीची आरती करण्यात आली. यानंतर कोल्हापूरच्या जनतेने उत्साहात सोने लुटले.