शासकीय संस्थांना देण्यात येणारी ५० टक्के रकमेची सवलत रहित !

पुणे – कोरोनाच्या संसर्गामुळे येथील महापालिकेच्या उत्पन्नात घट झाली आहे. त्यामुळे विविध सेवा वाहिन्या टाकण्यासाठी शासकीय संस्थांना पुनर्स्थापना दरामध्ये देण्यात येणारी ५० टक्के रकमेची सवलत रहित करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीला दिला आहे. असे झाल्यास एम्.एन्.जी.एल्., महावितरण, बी.एस्.एन्.एल्. या व्यतिरिक्त शासनाच्या अंगीकृत किंवा संलग्न आस्थापनांना व्यावसायिक दराने शुल्क भरावे लागणार आहे.

खासगी आस्थापनांना १२ सहस्र १९२ रुपये प्रति ‘रनिंग मीटर’, तर शासकीय यंत्रणांना प्रति ‘रनिंग मीटर’ २ सहस्र ३५० रुपये प्रमाणे शुल्क आकारले जाते. ५० टक्क्यांची सवलत रहित केल्यास व्यावसायिक दराने शुल्क भरणे अडचणीचे होऊन त्याचा सेवांवर परिणाम होईल, असा दावा शासकीय संस्थांनी केला आहे.