सर्वच तालुक्यांतील पोलीस ठाण्यांमध्ये ‘महिला तक्रार निवारण कक्ष’ स्थापन करण्याची मागणी !

पुणे, १७ ऑक्टोबर – राज्यात दिवसेंदिवस महिला, मुली यांवर अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. पुण्यातही एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन कबड्डी खेळाडूवर कोयत्याने आक्रमण करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. महिला आणि मुली यांवरील अत्याचाराविषयी कायदे कडक करून त्यांची कार्यवाही करण्यासाठी सर्वच तालुक्यांतील पोलीस ठाण्यामध्ये ‘महिला तक्रार निवारण कक्ष’ स्थापन करावेत, असे निवेदन ‘प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटने’च्या प्रदेशाध्यक्षा सुरेखा ढवळे यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना समक्ष भेटून दिले.

महिला, अल्पवयीन मुली यांच्या झालेल्या हत्या संतापजनक आणि दु:खद आहेत. अशा घटनांनंतर चर्चासत्रे होतात, राजकीय आरोप-प्रत्यारोप होतात; पण पुढे काहीच ठोस होत नाही. अशा प्रकारचे गुन्हे करणार्‍या आरोपींची माहिती एकत्र करून त्यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे, असेही निवेदनात नमूद केले आहे.